फोंडा (गोवा) येथील सौ. मंगला मराठे यांनी बालपणापासून अनुभवलेली देवीची कृपा !
१. नवरात्रीमध्ये मंगळवारी जन्म झाल्याने आजीने नातीचे नाव ‘मंगला’ ठेवणे
‘माझा जन्म नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी झाला. त्या दिवशी मंगळवार होता. मंगळवार हा देवीचा वार असल्याने आजीने माझे नाव ‘मंगला’ ठेवले.
२. बालपणापासून अन्य देवतांच्या तुलनेत देवीशी जवळीक अधिक वाटणे
लहान असल्यापासून मला कधी भीती वाटली, अडचण आली किंवा काही वाईट वाटले, तर मी देवीशी संवाद साधत असे. रात्री झोपतांना न चुकता डोळे बंद करून देवीला प्रार्थना करून झोपत असे. हे मला कोणीही शिकवले किंवा सांगितले नव्हते. मी उत्स्फूर्तपणे करत असे. सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यावर मला प्रार्थना आणि आत्मनिवेदन हे शब्द कळले.
३. देवी ही दशभुजा आणि शस्त्रधारी असल्याने बालमनाला ती सर्वांत शक्तीशाली वाटून तिच्यावरील श्रद्धा वाढणे
बालपणी मला रात्री झोपतांना जेवढे देव आठवायचे, मी त्या सर्वांना वंदन करून झोपत असे. एखादा देव आठवायचा राहिला, तर दुसर्या दिवशी त्याची क्षमायाचना करत असे; परंतु मला सर्वांत जवळची अन् शक्तीशाली अशी श्री दुर्गादेवी वाटायची. तिच्या दशभुजा आणि हातांमध्ये धरलेली आयुधे याचा मला पुष्कळ आधार वाटायचा. भोळ्याभावाने म्हणा किंवा मागील जन्माचे संस्कार यांमुळे मला देवीशी आतून नाते जाणवत असे.
४. देवीची पालखी बालपणी आजोळी दारात आल्यावर भावजागृती होऊन अखंड भावाश्रू येणे
आम्ही मुंबईला रहायचो आणि वर्षातून २ वेळा सुट्टीत गोव्याला आजोळी यायचो. माझे आजोळ माशेल येथील ‘श्री शांतादुर्गा’ देवस्थान येथे आहे. विशिष्ट तिथींना त्या देवीची पालखी वाजत गाजत पूर्ण गावात फिरवतात. पालखी येणार; म्हणून मी पुष्कळ उत्साहाने नटून थटून वाट बघत असे. पालखी दारात पोेचली की, माझ्या अंगावर रोमांच उभे रहात असत, तसेच मला भरून येत असे आणि माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागत. पालखी आल्यावर ‘कुलाचार’ पूर्ण होत आणि मला पुष्कळ निराळेच वाटायचे. पुढे साधना चालू केल्यावर कळले की, याला ‘भावजागृती’ म्हणतात.
५. नवरात्रीतील पारंपरिक ‘गरबा’ पाहून भावजागृती होणे
मी मुंबईला लहानाची मोठी झाले. महाविद्यालयीन जीवनात माझी मैत्री गुजराथी समाजातील मुलींशी झाली. त्या मला नवरात्रीला घरी बोलावत असत. घटस्थापना, देवीची पूजा आणि रात्रीचा पारंपरिक ‘गरबा’ (डिस्को गरबा नव्हे) पाहून मला पुष्कळ भरून येत असे अन् अश्रू आवरत नसत. ‘मला काय होत आहे ?’, ते कळत नसे, ‘याला भावजागृती म्हणतात’, हे सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करू लागल्यावर मला कळले.
६. वडिलांकडील देवी ‘आर्यादुर्गा’ आणि आईकडील देवी ‘महालसा’ अन् विवाहानंतरची कुलदेवी ‘दुर्गादेवी’ असणे
आमच्या वडिलांकडील देवी ‘आर्यादुर्गा’ आणि आईकडील देवी ही श्री दुर्गादेवीचे रूप ‘महालसा’ आहे. दोन्ही देवींचे कुलाचार पालन माझे आई-वडील व्यवस्थित करत असत. वर्षातून एकदा आम्ही दोन्ही देवींच्या दर्शनाला जात असू. माझा विवाह झाल्यावर मराठे घराण्याची कुलदेवी रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथील श्री दुर्गादेवी आणि कुलदेव व्याडेश्वर असल्याचे कळले. काही कारणास्तव आम्ही कुलदेवीच्या दर्शनाला जाऊ शकलो नाही. वर्ष १९९१ मध्ये आम्ही कुलदेवीच्या दर्शनाला गेलो आणि दोन मासांनी आमच्या जीवनात परात्पर गुरु डॉ. आठवले आले. त्यानंतर त्यांनी आम्हाला व्याडेश्वर आणि श्री दुर्गादेवी यांपैकी श्री दुर्गादेवीचा नामजप करण्यास सांगितले.
७. दुर्गादेवीचा नामजप अखंड होणे आणि शक्ती न पेलवल्याने डोके दुखू लागणे
गुरुदेवांच्या प्रथम भेटीत त्यांनी मला सांगितल्यानंतर श्री दुर्गादेवीचा नामजप प्रचंड वेगाने आणि अखंडपणे होऊ लागला. सलग ३ दिवस नामजप थांबत नव्हता. शेवटी माझे डोके ठणकू लागले. मला त्याचे कारण कळत नव्हते. तेव्हा मी त्या वेळी अध्यात्मप्रसाराचे कार्य पहाणारे श्री. प्रकाश जोशी यांना संपर्क केला. ते मला म्हणाले, ‘‘नामजपामुळे पुष्कळ शक्ती निर्माण झाल्याने ती सहन झाली नाही.’’
८. वर्ष २००० मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वाढदिवसाला श्री दुर्गादेवीची मूर्ती भेट देणे
मी साधना चालू केल्यावर माझी साधनेतील रुची वाढली. मला साधनेचे महत्त्व पटले. मी आणि पती दोघांनी चाकरी अन् अध्यात्मप्रसार यांतील अध्यात्मप्रसार निवडून आम्ही दोघेही पूर्णकालीन साधक झालो. आम्ही सुखसागर, गोवा येथे सेवा करण्यासाठी राहू लागलो. त्या वर्षी गुरुदेवांनी मला माझ्या वाढदिवसाला श्री दुर्गादेवीची मूर्ती भेट म्हणून दिली. विशेष म्हणजे त्यांनी आश्रमातील भेटवस्तूंचा पूर्ण खोका मागवून घेतला आणि त्यातील वेष्टनात असलेल्या एका वस्तूकडे बोट दाखवून म्हणाले, ‘‘मंगलाला ही भेट देऊया.’’ वास्तविक ‘त्या खोक्यात काय आहे ?’, हे त्यांना आणि साधिकेलाही ठाऊक नव्हते. खोका उघडल्यावर कळले की, ‘त्यात दुर्गादेवीची मूर्ती आहे.’
९. परात्पर गुरु डॉक्टरांनी श्री दुर्गादेवीची मूर्ती हातात घेऊन साधिकेला परत दिल्यावर त्यामध्ये पुष्कळ शक्ती आणि चैतन्य येणे
माझ्या वाढदिवसाला गुरुदेवांनी स्वतःच्या हातांनी वेष्टन काढून श्री दुर्गादेवीची मूर्ती माझ्या हातात दिली. त्यानंतर त्यांनी त्यातील स्पंदने पहाण्यास सांगितले. मग त्यांनी ती मूर्ती परत स्वतःकडे घेऊन मूर्तीवरून बोटे फिरवली आणि मूर्ती परत माझ्याकडे दिली. मी मूर्ती हातात घेतल्यावर मला प्रचंड शक्ती जाणवली. गुरुदेवांनी लगेच तेथील सर्व साधकांना, ‘मूर्ती हातात घेऊन काय वाटते ?’ हा प्रयोग करण्यास सांगितला. सर्वांना त्या मूर्तीत पुष्कळ शक्ती आणि चैतन्य जाणवले.
१०. पुढच्या वर्षीच्या वाढदिवसाला चांदीचे फूल देऊन ते दुर्गादेवीच्या मूर्तीला वहाण्यास सांगणे
वर्ष २००१ मध्ये परात्पर गुरु डॉक्टरांनी मला वाढदिवसाच्या दिवशी एक चांदीचे फूल दिले आणि ते दुर्गादेवीला वहाण्यास सांगितले.
११. साधिकेचे रहाते घर सेवाकेंद्रासाठी अर्पण केल्यावर तेथे ध्यानमंदिर निर्माण करून त्यात देवीची स्थापना करणे
वर्ष १९९८ मध्ये आम्ही पूर्णवेळ साधना करण्यास दोनापावला, पणजी, गोवा येथे वास्तव्यास आलो आणि आमच्या धामसे, गोवा येथील रहात्या घरी सेवाकेंद्र चालू झाले. त्या वेळी तेथे रहाणार्या साधकांसाठी गुरुदेवांनी एक ध्यानमंदिर बनवले. तेथे माझ्याकडील श्री दुर्गादेवीची मूर्ती स्थापन करण्यास सांगितली. प.पू. दास महाराज यांच्या हस्ते या मूर्तीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर तेथे येणार्या प्रत्येक साधकाला श्री दुर्गादेवीची अनुभूती येत असे.
१२. श्री दुर्गादेवीची स्थापना झाल्यावर तेच साधिकेच्या कुटुंबाचे कुलदैवत असून जन्मघराण्याचा देवाण-घेवाण हिशोब संपल्याचे परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगणे
धामसे येथे श्री दुर्गादेवीची स्थापना केल्यावर गुरुदेवांनी ‘आम्ही पती-पत्नी आणि आमची २ मुले, यांचा जन्मघराण्याशी देवाण-घेवाण संपला असून यापुढे ‘श्री दुर्गादेवी’ ही तुमची कुलदेवी आहे’, असे सांगितले. आमच्या मूळ घरी व्याडेश्वराची उपासना करतात. अशा प्रकारे गुरुदेवांनी आमच्या कुटुंबाला श्री दुर्गादेवीच्या पदरात घातले.
१३. जीवनात श्री दुर्गादेवीचा अनन्यसाधारण संबंध अनुभवत असल्याने कोणताही नामजप केला, तरी आत्मनिवेदन श्री दुर्गादेवीला होणे
सनातन संस्थेद्वारे वेळोवेळी विविध नामजप अन् काळानुसार उपासना सांगितली जाते. मी नामजप कोणताही केला किंवा कोणत्याही देवतेची उपासना केली, तरी आत्मनिवेदन हे आई जगदंबेलाच होत होते. (मी लहानपणापासून देवीला उत्स्फूर्तपणे ‘आई जगदंबे’, असे संबोधत असे.)
१४. सलग ४ वर्षे सनातन आश्रमातील नवरात्री पूजनात ‘महानैवेद्य सेवा’ करण्याची संधी देवीच्या कृपेने मिळणे
मागील ४ वर्षांपासून सनातन आश्रमात नवरात्रीनिमित्त देवीपूजन आणि सप्तशतीचा पाठ वाचन केले जाते. त्यासाठी मला महानैवेद्य सिद्ध करण्याची सेवा मिळाली. ही सेवा करतांना मला पुष्कळ आनंद मिळतो आणि कितीही धावपळ झाली, तरी थकवा जाणवत नाही.
१५. देवीने ‘स्वयंपाक आवडला; पण विडा दिला नाहीस,’ असे ध्यानात सांगणे
दोन वर्षांपूर्वी मी देवीसाठी महानैवेद्य सेवा पूर्ण करून ध्यानमंदिरात नामजप करण्यासाठी गेले. ‘योगतज्ञ दादाजी वैशंपायन’ यांनी दिलेल्या दुर्गादेवीच्या मूर्तीसमोर मला बसायला मिळाले. ‘माझे लक्ष देवीच्या मुखकमलावर पडताच देवी प्रसन्न मुद्रेने हसत आहे’, असे मला जाणवले. मी देवीच्या चेहर्याकडे पहात प्रार्थना करून डोळे मिटले आणि माझे ध्यान लागले. मला देवीने ध्यानात सांगितले, ‘स्वयंपाक आवडला; पण ‘मला तू विडा दिला नाहीस.’ मी नवरात्रोत्सव साजरा करणार्यांकडे चौकशी केल्यावर कळले की, नवरात्रीमध्ये देवीला ‘तांबूल’ अर्पण करतात. तेव्हापासून नवरात्रीमध्ये देवीला महानैवेद्याच्या समवेत ‘विडा’सुद्धा अर्पण करू लागले.
१६. हे लिखाण करतांना ‘मी सतत श्री तुळजाभवानीदेवीच्या मंदिरात आहे’, असे मला जाणवत होते. मला सूत्रे पुष्कळ शीघ्र गतीने सुचत होती. मध्येच मला कुंकवाचा सुगंध आला.
‘हे गुरुराया, ‘तुमच्याच कृपेने मला आई जगदंबेच्या संदर्भातील या अनुभूतींची जाणीव झाली. मला सतत तिच्या अनुसंधानात रहाता येऊ दे, हीच तुमच्या कोमल चरणी प्रार्थना आहे.’
– सौ. मंगला पांडुरंग मराठे, फोंडा, गोवा. (१३.११.२०२१)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |