परप्रांतीय अनधिकृत मासेविक्रेत्यांच्या विरोधात गुन्हे नोंदवा ! – मनसेची मागणी
नवी मुंबई – परप्रांतीय अनधिकृत मासेविक्रेत्यांच्या विरोधात महानगरपालिकेने येत्या ७ दिवसांत कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे नोंद करावेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने तुर्भे विभागाचे विभाग अधिकारी भरत धांडे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. असे न केल्यास मनसेच्या शिष्टमंडळानेे ‘आमच्या पद्धतीने आंदोलन करून अनधिकृत परप्रांतीय मासे विक्रेत्यांना धडा शिकवू’, अशी चेतावणी दिली आहे. या शिष्टमंडळात वर्षानुवर्षे मासेमारीचा व्यवसाय करणारे स्थानिक आगरी कोळी बांधवसुद्धा उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की,
१. गेल्या अनेक वर्षांपासून सानपाडा पामबीच विभागामध्ये रस्त्यांसह पदपथावर अनधिकृत परप्रांतीय मासेविक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रस्ते आणि पदपथ खराब होत असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
२. निकृष्ट दर्जाची मासळी अल्प किंमतीत विकल्याने येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
३. या विभागात सोनसाखळी चोरी, घरफोडी, रहिवाशांना धमकावणे, शिवीगाळ करणे, मारहाण करणे यांसारख्या गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांची सुरक्षितता धोक्यात आहे.
४. स्थानिक भूमीपुत्र असलेल्या आगरी-कोळी बांधवांचा वर्षानुवर्षे असलेला मासेविक्रीचा व्यवसाय धोक्यात आल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
५. काही जणांकडून या अनधिकृत परप्रांतीय मासेविक्रेत्यांना पाठबळ दिले जात आहे. (अशांना शोधून काढून त्यांच्यावरही कारवाई करायला हवी ! – संपादक)
संपादकीय भूमिकाजे सर्वसामान्यांना कळते, ते सर्व यंत्रणा हाताशी असणार्या प्रशासनाला कळत नाही, हे प्रशासनासाठी लज्जास्पद नव्हे का ? |