पुणे शहरातील उच्‍चभ्रू भागात ‘आयुर्वेदिक मसाज सेंटर’च्‍या नावाखाली वेश्‍या व्‍यवसाय !

सामाजिक सुरक्षा विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – शहरातील हडपसर, चंदननगर, वानवडी, कोरेगाव पार्क, विमानतळ येथील अनेक उच्‍चभ्रू भागांत ‘आयुर्वेदिक मसाज सेंटर’ चालू झाले आहेत; परंतु या ठिकाणी ‘मसाज’च्‍या नावाखाली वेश्‍या व्‍यवसाय केला जात आहे. यामुळे सांस्‍कृतिक पुण्‍यात हे काय चालू आहे ? असा प्रश्‍न पडला आहे. एकीकडे शहरात फोफावत जाणार्‍या वेश्‍या व्‍यवसायाला आळा घालण्‍यासाठी सामाजिक सुरक्षा विभागाने कंबर कसली आहे; परंतु ‘याच सामाजिक सुरक्षा विभागाचे या भागात जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे’, असे या परिसरातील नागरिकांनी सांगितले.

कसा चालवला जात आहे वेश्‍या व्‍यवसाय ?

१. पाश्‍चात्त्य देशांमध्‍ये ‘स्‍पा सेंटर’ किंवा ‘मसाज सेंटर’ असतात. गेल्‍या काही वर्षांपासून भारतात याचे प्रस्‍थ वाढत आहे. पुणे शहरात काही ‘मसाज सेंटर’ निवासी संकुलातही थाटले आहेत. यामुळे रहिवाशांना त्रास होत आहे.

२. विविध प्रस्‍ताव देऊन ग्राहकांना आकर्षित करण्‍यासाठी सामाजिक माध्‍यमांवर वेगवेगळ्‍या प्रकारची विज्ञापने केली जातात. यामध्‍ये एका घंट्याला किती पैसे यांसह वेश्‍या व्‍यवसायाचा प्रस्‍तावही दिलेला असतो.

३. सामाजिक माध्‍यमे वापरणारी तरुण पिढी या वाममार्गाकडे वळत आहे. त्‍यामुळे ‘आयुर्वेदिक मसाज पार्लर’च्‍या नावाखाली चालणारे देहविक्रीचे व्‍यसन वाढत आहे.

उच्‍चभ्रू सोसायटीत थाटला जात आहे वेश्‍या व्‍यवसाय !

‘स्‍पा आणि मसाज सेंटर’च्‍या नावाखाली चालू असलेल्‍या वेश्‍या व्‍यवसायाची माहिती पोलिसांना समजू नये; म्‍हणून दलालांकडून उच्‍चभ्रू परिसराची निवड केली जात आहे. ‘आयुर्वेदिक मसाज सेंटर’च्‍या नावाने विज्ञापन करून त्‍याला आकर्षक पद्धतीने सिद्ध केले जाते. अनेकदा त्‍याचा अंदाज येथील नागरिकांनाही येत नाही. सोसायटीमधील सदनिका भाड्याने घेऊन ‘स्‍पा’च्‍या नावाखाली वेश्‍या व्‍यवसायाचा धंदा चालवला जात आहे.

संपादकीय भूमिका

  • या माध्‍यमातून होत असलेले समाजाचे नैतिक अधःपतन थांबण्‍यासाठी सर्वांना धर्मशिक्षण देणे अनिवार्य आहे !
  • संस्‍कृतीचा वारसा असणार्‍या पुणे शहरात असे घडणे लज्‍जास्‍पद ! असे होत असतांना सामाजिक सुरक्षा विभाग आणि प्रशासन काय करते ?
  • नागरिकांनी सतर्क राहून परिसरातील अनैतिक व्‍यवसाय बंद करण्‍यासाठी पुढाकार घेणे आवश्‍यक !