सौ. भाग्यश्री हणमंत बाबर यांना दत्ताच्या नामजपामुळे आलेल्या काही वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती
‘भगवान श्रीकृष्ण आणि प.पू. गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले) यांना माझा कृतज्ञतापूर्वक दंडवत !
१. ‘श्री गुरुदेव दत्त ।’ या नामजपामुळे स्वप्नात येऊन त्रास देणार्या पितरांचा होणारा त्रास न्यून होणे
‘श्री दत्तगुरु आणि कुलदेवी यांचा नामजप करा’, असे सनातन संस्थेच्या सत्संगात सांगतात’, हे मी नेहमी सर्वांना सांगते. आमच्या घरासमोर काकडेकाकू रहातात. त्यांनी मला सांगितले, ‘‘माझ्या बहिणीचा पती वारल्यानंतर तो मला घेऊन जाणार, असे माझ्या स्वप्नात येऊन म्हणत होता.’’ त्यामुळे काकडेकाकूंची प्रकृती बिघडली होती. त्यांना सारखी भीती वाटत होती. पुष्कळ जणांचे उपचार केले, तरी उपयोग झाला नाही. मी त्यांना सांगितले, ‘‘तुम्हाला भीती वाटत असेल, तेव्हा तुम्ही ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करा.’’
त्यानंतर २ दिवसांनी त्या भेटल्या आणि म्हणाल्या, ‘‘श्री गुरुदेव दत्त ।’ या नामजपामुळे माझा त्रास न्यून झाला. स्वप्नात येणारा बहिणीचा पती आता मला त्रास देत नाही. आता मला काहीच भीती वाटत नाही.’’ हे सर्व गुरुदेवांनीच केले, त्याविषयी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
२. पती पोलीस खात्यात असूनही कोरोनाच्या काळात नामजपामुळे संरक्षण होणे
कोरोनाच्या काळात सर्वत्र भीतीचे वातावरण होते. माझे पती पोलीस खात्यात असूनही नामजपामुळे कोरोनाने आम्हाला स्पर्श केला नाही. आम्ही आनंदात होतो. गुरुदेवांमुळेच हे शक्य झाले. गुरुदेव अखंड माझ्या समवेत असतात. ‘गुरुदेवा, मी त्यासाठी कृतज्ञ आहे.’
३. दत्ताचा नामजप सतत भावपूर्ण केल्याने घराभोवती औदुंबराची पुष्कळ झाडे उगवणे
मी ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप मनापासून एकाग्रतेने करत होते. त्या वेळी आमच्या घराभोवती औदुंबराची ५० रोपे आपोआप आली होती. ‘या सगळ्यामुळे गुरुदेवांचे संरक्षककवच माझ्या भोवती अखंड आहे’, असे मला वाटते.’
– सौ. भाग्यश्री हणमंत बाबर, सोलापूर (२.२.२०२३)