सरकारने ‘हाफकीन’चे पैसे रखडवल्‍याने वर्षभरात सरकारकडून औषध खरेदी नाही !

मुंबई – सरकारने वर्ष २०२२-२३ या काळात एक रुपयाचीही औषध खरेदी केली नसल्‍यामुळे राज्‍यात औषध तुटवडा निर्माण झाला असून एकप्रकारे सरकार जनतेच्‍या जिवाशी खेळत आहे, असा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्‍यांच्‍या शासकीय निवासस्‍थानी आयोजित पत्रकार परिषदेत सरकारवर केला आहे. ‘हाफकीन जीव औषध निर्माण महामंडळा’ला वर्ष २०२२- २३ मध्‍ये १०८ कोटी रुपयांचे औषध खरेदीचे कंत्राट देण्‍यात आले होते; मात्र त्‍यातील फक्‍त ५० कोटीच रुपये ‘हाफकीन’ला देण्‍यात आले आहेत. यामुळे पूर्ण पैसे मिळाल्‍याविना कोणत्‍याही आस्‍थापनाचे औषध खरेदी करणार नाही, अशी भूमिका ‘हाफकीन संस्‍थे’ने घेतल्‍याची माहिती ‘हाफकीन’च्‍या अधिकारी वर्गासमवेत घेतलेल्‍या बैठकीत मिळाल्‍याचे दानवे यांनी पत्रकार परिषदेत म्‍हटले आहे. सरकार १५० कोटी रुपये विज्ञापनासाठी व्‍यय करते; मात्र ‘औषध खरेदीसाठी पैसे देत नाही’, असेही दानवे यांनी म्‍हटले आहे.

सरकार जनतेच्‍या जिवाशी खेळत असल्‍याचा अंबादास दानवेंचा आरोप !