नागरिकांना विश्वासात घेतल्याविना आराखडा सिद्ध केला जाणार नाही ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
पेडणे ‘झोनिंग प्लान’ स्थगित ठेवल्याचे प्रकरण
पणजी, ११ ऑक्टोबर (वार्ता.) : नागरिकांना विश्वासात घेतल्याविना पेडण्याचा विभागीय आराखडा (झोनिंग प्लान) सिद्ध केला जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पेडणेवासियांना दिले. पेडणे येथील नागरिकांनी ११ ऑक्टोबर या दिवशी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पणजी येथे सचिवालयात भेट घेऊन पेडण्यासाठीचा ‘झोनिंग प्लान’ कायमस्वरूपी रहित करण्याची मागणी केली. पेडणे येथील स्थानिकांच्या विरोधानंतर सरकारने ‘झोनिंग प्लान’ अनिश्चित कालावधीसाठी स्थगित ठेवला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी पेडणेवासियांना हे आश्वासन दिले.
(सौजन्य :RDXGOA GOA NEWS)
या वेळी पेडणेवासीयांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की, पेडणेसाठीचा ‘झोनिंग प्लान’ आता स्थगित ठेवला आहे; परंतु पुढील वर्षी लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर तो पुन्हा मार्गी लावण्याची शक्यता आहे. आराखडा लवकरात लवकर रहित न केल्यास रस्त्यावर उतरण्याची आमची सिद्धता आहे. पेडणे परिसरातील अनेकांच्या घरांच्या भूमी अजूनही ‘सेटलमेंट’ विभागामध्ये समाविष्ट केलेल्या नाहीत; मात्र पेडणे ‘झोनिंग प्लान’मध्ये १ कोटी ४४ लक्ष चौ.मी. भूमी ‘सेटलमेंट’ विभागात दाखवण्यात आली आहे.
हे वाचा → गोवा : पेडणे विभागीय आराखडा (झोनिंग प्लान) स्थगित !