राज्यातील ३५ ‘टॉप’ शाळांमध्ये रत्नागिरीतील २ शाळा
शालेय शिक्षण विभागांतर्गत ‘लेट्स चेंज’ उपक्रम
रत्नागिरी – शालेय शिक्षण विभागांतर्गत ‘लेट्स चेंज’ उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील २ सहस्र १३० शाळेतील ६४ सहस्र ९६७ विद्यार्थी सहभागी झाले आहेत. सहभागी झालेल्या लाखो शाळांमधून उत्तम कामगिरी करणार्या ‘टॉप’ शाळांमध्ये १०० शाळांची निवड करण्यात येणार आहे. आतापर्यंत निवडण्यात आलेल्या ‘टॉप’च्या ३५ शाळांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील २ शाळांचा समावेश आहे. कुडली (गुहागर) आणि भातगाव (खेड) येथील या शाळा आहेत.
शालेय शिक्षण विभागाकडून ‘लेट्स चेंज’ या उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना ‘स्वच्छता मॉनिटर’ बनवण्यात आले आहे. यामध्ये राज्यातील ३८ लाख विद्यार्थी आमूलाग्र पालट घडवून महाराष्ट्राला कचर्याविषयी निष्काळजीमुक्त करणार आहेत. या उपक्रमांतर्गत उत्तम कामगिरी करणार्या राज्यातील लाखो शाळांमधून १०० ‘टॉप’ शाळांची निवड करण्याचे शासनाने घोषित केले होते.
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद कुडली शाळा क्र. ४ आणि खेड तालुक्यातील भडगाव येथील आर्.डी. ज्ञानदीप विद्यामंदिर या शाळांचा समावेश आहे. लवकरच राज्यातील आणखी ‘टॉप’च्या ६५ शाळांची निवड करण्यात येणार आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील आणखी काही शाळांचा समावेश असेल, अशी आशा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.