सिंधुदुर्ग : पोपट आणि शेकरू अवैधरित्या कह्यात ठेवल्याच्या प्रकरणी कैस बेग वन विभागाच्या कह्यात
सावंतवाडी – शहरातील बाहेरचा वाडा येथे रहाणार्या कैस अब्दुल लतीफ बेग याच्यावर अवैधरित्या पोपट आणि शेकरू यांना पिंजर्यात बंदिस्त करून ठेवल्याच्या प्रकरणी वन विभागाकडून कारवाई करण्यात आली.
बाहेरचा वाडा येथे एका व्यक्तीने अवैधरित्या संरक्षित प्राणी स्वत:च्या कह्यात ठेवले आहेत, अशी माहिती येथील वन विभागाच्या कार्यालयाला प्राप्त झाली. या माहितीच्या अनुषंगाने ११ ऑक्टोबर या दिवशी सकाळी वन विभागाच्या पथकाने धाड घातली असता बेग याच्या घराच्या मागच्या बाजूला पोपट आणि शेकरू हे वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार संरक्षित असलेले प्राणी त्यांनी पिंजर्यात बंदिस्त ठेवल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे वन विभागाच्या पथकाने बेग याला कह्यात घेतले. ही कारवाई उप वनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, साहाय्यक वनसंरक्षक डॉ. सुनील लाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.