सनातन संस्थेच्या १२२ व्या संत पू. (कै.) सौ. शालिनी प्रकाश मराठे यांच्या वर्षश्राद्धानिमित्त सेवेत असलेल्या साधिकांना आलेल्या अनुभूती
‘सनातनच्या १२२ व्या संत पू. (कै.) सौ. शालिनी मराठेकाकू यांचे ४ आणि ५ जुलै २०२३ या दिवशी वर्षश्राद्ध झाले. वर्षश्राद्धाच्या निमित्ताने केलेल्या स्वयंपाकाच्या सेवेत साधिकांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.
१. सौ. श्रद्धा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१ अ. पू. (कै.) सौ. शालिनी मराठे यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने केलेल्या स्वयंपाकाच्या सेवेत साहाय्य करतांना मन निर्विचार आणि शांत असणे : ‘पू. (कै.) सौ. शालिनी मराठे यांच्या वर्षश्राद्धाचे विधी ४ आणि ५ जुलै २०२३ या दिवशी होते. त्या वेळी मी स्वयंपाक करण्याच्या सेवेत साहाय्य करत होते. ती सेवा करतांना दोन्ही दिवस माझ्या मनात कोणतेही विचार नव्हते आणि माझे मन पुष्कळ शांत होते.
१ आ. ‘सेवा केल्यावर स्वतःसह साधिकांच्या चेहर्यात पालट झाला आहे’, असे लक्षात येऊन संतसेवेचे महत्त्व लक्षात येणे : ५.७.२०२३ या दिवशी सेवा झाल्यावर ‘माझ्या समवेत सेवेत असणार्या दोन्ही साधिकांच्या चेहर्यात पालट झाला आहे’, असे माझ्या लक्षात आले. ‘एक सहसाधिका सेवेला आल्यावर आरंभी तिच्या चेहर्यावर दिसणारे काळ्या (त्रासदायक) शक्तीचे आवरण पूर्णपणे निघून गेले आहे आणि तिचा चेहरा स्वच्छ झाला आहे’, असे माझ्या लक्षात आले. दुसर्या साधिकेच्या चेहर्यातही पालट होऊन तिचा चेहरा आधीच्या तुलनेत अधिक चांगला दिसत होता. त्या दोन सहसाधिकांच्या चेहर्यात झालेले पालट पाहून मी आरशात पाहिले. तेव्हा ‘माझ्या चेहर्यातही चांगला पालट झाला आहे’, असे माझ्या लक्षात आले. ही गोष्ट अन्य साधकांच्याही लक्षात आली. मला २ – ३ साधकांनी सांगितले, ‘‘तुझा चेहरा चांगला दिसत आहे.’’ तेव्हा संतसेवेचे महत्त्व माझ्या लक्षात आले आणि माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली.
१ इ. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधक जिवाची मृत्यूनंतरही काळजी घेत आहेत’, या विचाराने कृतज्ञता वाटणे : ही सेवा करतांना ‘सनातन संस्थेमध्ये साधक किंवा संत असो, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले त्या जिवाची मृत्यूनंतरही किती काळजी घेतात !’, या विचाराने मला पुष्कळ कृतज्ञता वाटत होती आणि भरून येत होते. सेवा झाल्यावर ‘मी शारीरिकदृष्ट्या थकले असले, तरीही मनाला पुष्कळ ऊर्जा आणि आनंद मिळत आहे’, असे मला जाणवले.’
२. सौ. वृंदा वीरेंद्र मराठे, फोंडा, गोवा.
२ अ. पू. (कै.) सौ. शालिनी मराठे यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने स्वयंपाक करावयाच्या सेवेत अधिक वेळ शारीरिक सेवा करूनही काही न केल्यासारखे वाटणे आणि पुष्कळ आनंद मिळणे : ‘पू. (कै.) सौ. शालिनी मराठे यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने करावयाच्या स्वयंपाकाच्या सेवेत मला पुष्कळ आनंद मिळाला. ५.७.२०२३ या दिवशी मी पहाटे ४.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सेवा करत होते. मी इतका वेळ शारीरिक सेवा करूनही मला थकायला झाले नाही. ‘मी काही केले आहे’, असे मला मुळीच वाटत नव्हते. माझे मन पुष्कळ उत्साही होते. मी ३५ जणांचे भोजन करण्याची सेवा प्रथमच करत असूनही सर्व सेवा व्यवस्थित झाली. त्यामुळे मला पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.’
३. सौ. जानकी पाध्ये, ढवळी, फोंडा, गोवा.
३ अ. पू. (कै.) सौ. मराठे यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने स्वयंपाक करतांना सूक्ष्मातून त्यांचे अस्तित्व जाणवणे आणि सेवा करतांना पुष्कळ आनंद मिळणे : ‘पू. (कै.) सौ. काकूंच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने करायच्या स्वयंपाकाच्या सेवेत मला पुष्कळ आनंद मिळाला. मला सेवा करतांना पू. मराठेकाकूंचे सूक्ष्मातून अस्तित्व जाणवत होते. ‘मी करत असलेली सेवा त्या पहात आहेत’, असेही मला जाणवत होते.’
४. कु. तृप्ती कुलकर्णी आणि कु. मधुरा गोखले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
४ अ. पू. (कै.) सौ. शालिनी मराठे यांच्या वर्षश्राद्धाच्या दिवशी स्वयंपाकाची पुष्कळ भांडी घासूनही थकवा न जाणवणे : ‘पू. (कै.) सौ. मराठेकाकूंच्या वर्षश्राद्धाच्या दिवशी आमच्याकडे स्वयंपाकाची भांडी घासण्याची सेवा होती. त्या दिवशी पुष्कळ भांडी असल्याने आम्ही ६ घंट्यांमध्ये ४ वेळा भांडी घासली, तरीही आम्हाला थकायला झाले नाही. आम्हाला ही सेवा करतांना पुष्कळ उत्साह जाणवत होता.’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : ८.७.२०२३)
पू. (कै.) सौ. शालिनी मराठे यांच्या वर्षश्राद्धाच्या विधींच्या वेळी सनातन पुरोहित पाठशाळेतील पुरोहित साधकांना आलेल्या अनुभूती
१. श्री. ईशान जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१ अ. ‘श्राद्धाच्या आरंभापासून दाब जाणवत नव्हता. मला वातावरणात पुष्कळ हलकेपणा जाणवत होता.’
२. श्री. सिद्धेश करंदीकर, ढवळी, गोवा.
२ अ. श्राद्धाच्या वेळी पितृस्थानी असलेेल्या ब्राह्मणांच्या ठिकाणी बसल्यावर पूजनाच्या वेळी मन शांत असणे आणि ‘भोजनाच्या वेळी एरव्हीपेक्षा अधिक भोजन ग्रहण केले’, असेे जाणवणे : ‘श्राद्धाच्या वेळी मी पितृस्थानी असलेल्या ब्राह्मणांच्या ठिकाणी बसलो होतो. त्या वेळी माझे पूजन चालू असतांना माझे मन पुष्कळ शांत होते. मी भोजन करण्यास आरंभ केल्यावर अन्य वेळी मी जसा जेवतो, त्यापेक्षा मला पुष्कळ वेगळेपणा जाणवला. ‘मी स्वतः जेवत नाही’, असे मला स्पष्ट जाणवत होते. ‘माझी जेवणाची गती एरव्हीपेक्षा अधिक आहे, तसेच मी अधिक भोजन ग्रहण केले’, असेही मला जाणवले.’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : ८.७.२०२३)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |