होमिओपॅथी वैद्या (कु.) आरती तिवारी यांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ घेत असलेल्या भावसत्संगात जाणवलेली सूत्रे
(हे लिखाण भावसत्संगाचे भक्तीसत्संगात रूपांतर होण्यापूर्वीचे आहे. त्यामुळे सर्वत्र भावसत्संग असाच उल्लेख केला आहे. – संकलक)
‘ऑक्टोबर २०१६ पासून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ भावसत्संग घेत आहेत. त्या भावसत्संग घेत असतांना मला आलेल्या अनुभूती आणि त्यासंदर्भात जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. नवरात्रीतील भावसत्संगांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे
१ अ. नवरात्रीच्या कालावधीत श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी ९ दिवस घेतलेल्या भावसत्संगांच्या वेळी पहिले २ दिवस सत्संगाला येतांना शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास होणे : ‘वर्ष २०२० च्या ऑक्टोबर मासात नवरात्रीच्या कालावधीत श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ नऊ दिवस प्रतिदिन भावसत्संग घेत होत्या. तेव्हा पहिले दोन दिवस सत्संगाला येतांना मला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक असे सर्वच प्रकारचे त्रास होत होते. त्यामुळे सत्संगाला येतांना माझ्या मनात संघर्ष होत होता. त्या संघर्षावर मात करून मी सत्संगाला आले की, मला चैतन्य मिळून हलके वाटत असे. नवरात्रीचे उर्वरित दिवस मात्र मला सत्संगाचा लाभ घेता आला, ही गुरुदेवांची कृपा !
१ आ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ बोलत असतांना मला त्यांचा आवाज ‘आकाशवाणी’प्रमाणे जाणवतो.
१ इ. भावसत्संगात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ बोलत असतांना ‘अनिष्ट शक्तींवर वीज कोसळून त्या नष्ट होत आहेत’, असे दृश्य दिसणे : ज्याप्रमाणे वीज कडाडते. तेव्हा प्रकाश आधी येतो आणि नंतर नाद येऊन गडगडाट होतो. त्याप्रमाणे ‘भावसत्संगातील श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा आवाज ब्रह्मांंडातून प्रकाशरूपात पृथ्वीवर आल्यावर सत्संगाच्या माध्यमातून तो शब्दनाद रूपातून प्रकटतो’, असे मला जाणवते. मी भावसत्संग जेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या मुखातून ऐकते, तेव्हा मला ‘जणू अनिष्ट शक्तींवर वीज कोसळून त्या नष्ट होत आहेत’, असे दृश्य अनेक वेळा दिसायचे.
१ ई. भावसत्संगात देवीची भक्तीगीते लावल्यावर साधिकेने मानसरित्या त्यावर नृत्य करणे आणि तिला त्यातून पूर्णानंद मिळत असल्याचे जाणवणे : भावसत्संगात काही वेळा देवीची भक्तीगीते लावण्यात आली. त्यामुळे भावसत्संगांची परिणामकारकता वाढून माझ्या मनाला आनंद जाणवत होता. काही वेळा ‘त्या गीतांवर माझ्याकडून मानसभावाने नृत्य होऊन मला पूर्णानंद मिळत आहे’, असे मला जाणवायचे.
१ उ. नवरात्रीचे शेवटचे २ दिवस झालेल्या भावसत्संगात भावजागृती होणे : नवरात्रीत शेवटचे दोन दिवस भावसत्संगांत माझा त्रास उणावून मला भाव जागृत होत असल्याचे अनुभवता आले, ही गुरुमाऊलीची केवढी कृपा ! त्याबद्दल परात्पर गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.
२. महाशिवरात्रीच्या भावसत्संगाच्या वेळी आलेल्या अनुभूती
अ. मार्च २०२१ मध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी विशेष भावसत्संग झाला. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ बोलत असतांना मागे मृदु आवाजात मृदुंग आणि सतार यांचा ध्वनी चालू होता.
आ. हा सत्संग ऐकतांना ‘पहिल्या क्षणापासून मी शिवलोकातच आहे’, असे मला जाणवत होते.
इ. ‘शिव प्रथम ‘आनंद तांडव’ आणि नंतर क्रोधाने ‘संहार तांडव’ करत आहे’, असे मला दिसत होते.
ई. त्या दोन्हींचा मला आनंदच होत होता. ‘संहार तांडवाने पापांचा नाश होऊन भूमाता शुद्ध होत आहे. वातावरणातील रज-तम नष्ट होत आहे’, असे मला जाणवत होते. आनंद तांडव पहात असतांना ‘मी बाल शिवगणाच्या रूपात भगवान शिवासह नृत्य करत आहे’, असे मला अखंड अनुभवायला येत होते.
उ. ‘शब्दांना संगीताची साथ लाभल्याने ते शब्द वेगाने जिवाचे बाह्यमन भेदून अंतर्मनात प्रवेश करतात’, असे मला प्रकर्षाने अनुभवायला आले. त्यामुळे संगीताचेही सामर्थ्य अनुभवता आले.
३. अन्य भावसत्संगांच्या वेळी आलेल्या चांगल्या आणि त्रासदायक अनुभूती
३ अ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ भावसत्संग घेत असतांना साधिकेला त्रास देणार्या अनिष्ट शक्तीला कुणीतरी मारत असल्याप्रमाणे जाणवणे : श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ भावसत्संग घेतात. तेव्हा पहिली १५ ते २० मिनिटे माझे मन, बुद्धी आणि शरीर यांवर आलेले काळे (त्रासदायक शक्तीचे) आवरण वेगाने नष्ट होते. ‘मला त्रास देणार्या अनिष्ट शक्तीला कुणीतरी पुष्कळ मारत आहे’, याप्रमाणे अंगावर फटके पडल्याचे जाणवून माझे अंग दुखू लागते. काही वेळा मला ग्लानीसुद्धा येते. नंतर मात्र भाव अनुभवणे, नामजप होणे, कृतज्ञताभाव आणि शरणागतभाव जागृत होणे, अशा विविध अनुभूती येतात.
३ अ १. अन्य साधिकांच्या तुलनेत श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ भावसत्संगात बोलत असतांना भगवंतच साधिकेला सत्संगाचा लाभ करून देत असणे : काही वेळा अन्य साधिका भावसत्संग घेतात. त्या वेळी पहिला १ घंटा माझ्यावरील अनिष्ट शक्तीचे अस्तित्व उणावून स्वत:चे अस्तित्व येणे यासाठी जातो, तसेच आध्यात्मिक अनुभूती येण्याचे प्रमाण तुलनात्मक अल्प असते. सत्संगाचा लाभ व्हावा, यासाठी मला पुष्कळ संघर्ष करावा लागतो. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ जेव्हा भावसत्संगात बोलतात, तेव्हा त्यांच्या मुखातून निघणार्या शब्दनादामुळे हा संघर्ष भगवंतच करतो आणि मला सत्संगाचा लाभ करून देतो.
३ आ. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ बोलत असतांना शब्दांचे रूपांतर फुलांत होऊन ती साधिकेच्या मनात आकर्षक रचनेत अर्पिली जात असल्याचे दृश्य तिला दिसणे : ‘काही वेळा श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ बोलत असतांना शब्दांचे रूपांतर फुलांत होते आणि ती फुले माझ्यावर पडत आहेत, तर कधी माझ्या मनात आकर्षक रचनेत अर्पिली जात आहेत’, असे दृश्य मला दिसते. तेव्हा माझे मन शांत होते. ‘काहीच बोलू नये, केवळ ऐकतच रहावे’, असे मला वाटते.
३ इ. ‘भावसत्संगातील शब्द केवळ माझ्यासाठी आसमंतातून प्रगट होत आहेत. मी एका पोकळीत बसली आहे, तर कधी ते शब्द ऐकत मी एका पोकळीत आत आत जात आहे’, असे मला जाणवते.
३ ई. ‘भावसत्संगाच्या माध्यमातून जणू ब्रह्मांंडाची परिक्रमा होते’, असे मला अनुभवायला येते.
३ उ. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांची वाणी, म्हणजे माता पार्वतीची वाणी आणि ते शब्द म्हणजे श्री गणेश !’, असे मला वाटते.
३ ऊ. भावसत्संगात श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या समवेत भगवंत मला विविध ठिकाणी नेतो आणि आनंद, परमानंद देतो अन् कृपा करतो.
३ ए. काही वेळा माझ्या त्रासाची तीव्रता इतकी असते की, श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या सत्संगामुळे लाभलेली अवस्था आणि आलेल्या अनुभूती एक ते दोन दिवसच टिकतात. नंतर परत रूक्षपणा आणि शुष्कता येते.
३ ऐ. अनिष्ट शक्ती देत असलेल्या त्रासामुळे श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या आवाजातील सामर्थ्य लक्षात येणे : काही वेळा श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचा आवाज डोक्यात घुमतो आणि त्याचा मला तीव्र त्रास होतोे. तेव्हा मला श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या आवाजातील सामर्थ्य लक्षात आले.
४. कृतज्ञता आणि प्रार्थना
हे भगवंता माझी पात्रता नाही; परंतु तू इतका सामर्थ्यशाली आहेस की, तुझ्या कृपेने या अनुभूती आणि आनंद मला घेता आला. देवा, केवळ भावसत्संगाच्या वेळी किंवा भावसत्संगानंतर एक दोन दिवस नको, तर मला अखंड तुझ्या चरणी ठेव. माझ्यावर कृपा कर. मी तुला पूर्णत: शरण आले आहे.’
– होमिओपॅथी वैद्या (कु.) आरती तिवारी, फोंडा, गोवा. (२०.४.२०२१)
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |