पिंपरी-चिंचवड महापालिकेने ४ दिवसांत ६८ मालमत्ता शासनाधीन केल्या !
पिंपरी-चिंचवड – महापालिकेच्या कर संकलन आणि कर आकारणी विभागाने ६८ थकबाकीदारांच्या मालमत्ता शासनाधीन केल्या. त्यापैकी ६२ जणांनी तात्काळ ८७ लाख ३७ सहस्र रुपये रोख अथवा धनादेश जमा करून कर भरला. थकबाकीदारांनी मालमत्ता जप्त होऊ नये, यासाठी त्वरित कर भरणा करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.
शहरांमध्ये निवासी, औद्योगिक, बिगर निवासी, मिश्र, मोकळ्या भूमी अशा ६ लाख ७ सहस्र नोंदणीकृत मालमत्ता आहेत. या मालमत्ताधारकांकडून महापालिकेचा कर संकलन आणि कर आकारणी विभाग कर वसूल करतो. वारंवार आवाहन करूनही कर न भरणार्या मालमत्ताधारकांना १ ऑक्टोबरपासून २ टक्के विलंब शुल्क लागू झाले आहे. थकबाकीदारांच्या मालमत्ता शासनाधीन करण्यासाठी कर संकलन विभागाने ४१ सहस्र ३६७ जणांना जप्तीची नोटीस पाठवली, तर ३६ सहस्र ७१९ मालमत्ताधारकांना जप्तीची पत्रे पाठवली आहेत. या मालमत्ताधारकांकडे ६७१ कोटी रुपयांचा कर थकीत आहे. महापालिकेचा कर संकलन आणि कर आकारणी विभाग विविध सवलत योजना, माहिती, थकबाकीदारकांची माहिती व्हॉट्सअॅप, तसेच विविध सामाजिक माध्यमांचा वापर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवणार आहे, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कर आकारणी आणि कर संकलन विभागाचे साहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.
संपादकीय भूमिकाकर बुडवणारे आणि चुकवणारे अशा दोन्हींवर कडक, कठोर आणि तात्काळ कारवाई व्हायला हवी ! |