Israel-Palestine At War – इस्रायल आणि पॅलेस्टाईन युद्ध : साम्राज्यवाद नव्हे धर्मयुद्धच !

३५ एकर भूमीच्या तुकड्यासाठी इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात चालू आहे वर्षानुवर्षे संघर्ष !

७ ऑक्टोबरला सकाळी ७ वाजता ‘हमास’ या आतंकवादी संघटनेने अचानक ५ सहस्र रॉकेट्स डागून इस्रायलवर आक्रमण केले. या आक्रमणात १ सहस्र २०० अधिक इस्रायली ठार झाले. प्रत्युत्तरात इस्रायलनेही आक्रमण केल्याने ९०० हून अधिक पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला. इस्रायल आणि पॅलेस्टाईन वर्षानुवर्षे का भांडत आहेत ? याचे कारण संपूर्णतः धार्मिक आहे. संपूर्ण जग एकूण ९५ अब्ज २९ कोटी ६० लाख एकर भूमीवर स्थिरावले आहे. त्यावर जगभरातील ८०० कोटी लोक रहातात. या ९५ अब्ज २९ कोटी ६० लाख एकर भूमीपैकी केवळ ३५ एकरची एक भूमी आहे, ज्यासाठी वर्षानुवर्षे युद्ध चालू आहे. आतापर्यंत झालेल्या अनेक युद्धात सहस्रो जीव मृत्यूमुखी पडले आहेत. हे युद्ध समजून घेण्यासाठी या ३५ एकर भूमीचे संपूर्ण सत्य समजून घेणे आवश्यक आहे.

जेरुसलेममध्ये ३५ एकर भूमीवर एक जागा आहे, जी ३ धर्मांची आहे. ज्यू या ठिकाणाला ‘हर-हवाईत’ किंवा ‘टेंपल माऊंट’, तर मुसलमान त्याला ‘हरम अल् शरीफ’ म्हणतात. ही जागा एकेकाळी पॅलेस्टाईनच्या कह्यात होती. पुढे इस्रायलने ती आपल्या कह्यात घेतली. असे असूनही आजचे सत्य हे आहे की, ‘टेंपल माऊंट किंवा ‘हरम अल् शरीफ’ इस्रायल किंवा पॅलेस्टाईन यांच्या कह्यात नाही. उलट ही संपूर्ण जागा संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत आहे. हा ३५ एकर भूमीचा तुकडा शेकडो वर्षांपूर्वी ख्रिस्त्यांनी कह्यात घेतला होता; परंतु ही जागा वर्ष ११८७ मध्ये मुसलमानांनी कह्यात घेतली आणि तेव्हापासून वर्ष १९४८ पर्यंत ती फक्त त्यांच्या कह्यात होती. असे असले, तरी त्यानंतर वर्ष १९४८ मध्ये इस्रायलचा जन्म झाला आणि तेव्हापासून या भूमीच्या तुकड्यावरून वेळोवेळी संघर्ष चालू झाला.

State of Palestine with designated capital East Jerusalem, claiming West Bank and Gaza Strip. Political map with borders and important places. Most areas are occupied by Israel. English labeling.

१. ‘हरम अल् शरीफ’विषयी इस्लामी मान्यता

मुसलमानांच्या विश्‍वासानुसार ‘हरम अल् शरीफ’ हे त्यांच्यासाठी मक्का आणि मदिना यांच्या नंतर तिसरे पवित्र स्थान आहे. इस्लामी धार्मिक ग्रंथ कुराणानुसार शेवटचे प्रेषित महंमद उडत्या घोड्यावर स्वार होऊन मक्केहून हरम अल शरीफ येथे पोचले. येथून ते स्वर्गात गेले. जेरुसलेममध्ये याच हरम अल शरीफवर मशीद बांधण्यात आली होती. ज्याचे नाव ‘अल अक्सा मशीद’ आहे. ‘जेरुसलेममध्ये आल्यानंतर प्रेषित महंमद यांनी ज्या ठिकाणी पाय ठेवले होते, त्याच ठिकाणी ही मशीद बांधण्यात आली आहे’, असे मानले जाते. अल अक्सा मशिदीजवळ सोन्याच्या घुमटाची इमारत आहे. त्याला ‘डोम ऑफ द रॉक’ म्हणतात. इस्लामी मान्यतेनुसार हे तेच ठिकाण आहे, जेथून प्रेषित महंमद स्वर्गात गेले होते. या कारणास्तव ‘अल अक्सा मशीद’ आणि ‘डोम ऑफ द रॉक’ ही मुसलमानांसाठी अतिशय पवित्र ठिकाणे आहेत. त्यामुळे या जागेवर ते दावा करत आहेत.

हरम अल-शरीफ (टेम्पल माउंट)

२. ज्यूंच्या (यहुदींच्या) दृष्टीने ‘टेंपल माऊंट’ची मान्यता

ज्यूंचा असा विश्‍वास आहे की, त्यांचे जेरुसलेममध्ये ‘टेंपल माऊंट’ त्याच ३५ एकर भूमीवर आहे. त्या ठिकाणी त्यांच्या देवाने माती ठेवली होती. ज्यातून आदमचा जन्म झाला. यहुदींचा असा विश्‍वास आहे की, ही तीच जागा आहे, जिथे देवाने अब्राहमला बलीदान करण्यास सांगितले होते. अब्राहमला एक इस्माईल आणि दुसरा इसहाक, अशी २ मुले होती. अब्राहमने देवाच्या बाजूने इसहाकला बलीदान देण्याचा निर्णय घेतला. यहुदी समजूतीनुसार देवदूताने इसहाकच्या जागी एक मेंढी ठेवली होती. ज्या ठिकाणी ही घटना घडली, त्या ठिकाणाचे नाव ‘टेंपल माऊंट’ आहे. याचा उल्लेख ज्यूंचा धार्मिक ग्रंथ ‘हिबू बायबल’मध्ये आहे. नंतर इसहाकला मुलगा झाला. ज्याचे नाव जेकब होते. जेकबचे दुसरे नाव इस्रायल होते. इसहाकचा मुलगा इस्रायलला नंतर १२ मुले झाली. त्यांच्या नावाने इस्रायलच्या १२ जमाती होत्या. ज्यूंच्या मान्यतेनुसार या जमातींच्या पिढ्यांनी नंतर ज्यू राष्ट्राची निर्मिती केली. प्रारंभीला याला ‘इस्रायलची भूमी’ असे नाव देण्यात आले. इस्रायलची ही भूमी वर्ष १९४८ मध्ये इस्रायलच्या हक्काचा आधार बनली.

जेरुसलेममधील वेस्टर्न वॉल

३. ‘ज्यू वेस्टर्न वॉल’ ही ‘होली ऑफ होलीज’चा एक भाग

‘वेस्टर्न वॉल’ ही ‘होली ऑफ होलीज’चा एक भाग आहे. इस्रायलच्या भूमीवर ज्यूंनी बांधलेले मंदिर, ज्याचे नाव ‘पहिले मंदिर’ होते. हे इस्रायलचा राजा सोलोमन याने बांधले होते. पुढे हे मंदिर शत्रू देशांनी उद्ध्वस्त केले. काही वर्षांनंतर ज्यूंनी त्याच ठिकाणी पुन्हा मंदिर बांधले. त्याचे नाव ‘दुसरे मंदिर’ होते. या दुसर्‍या मंदिराच्या आतील भागाला ‘होली ऑफ होलीज’ असे म्हणतात. ज्यूंच्या मते हे असे पवित्र स्थान होते, जेथे विशेष याचकांविना स्वतः ज्यू लोकांनाही जाण्याची अनुमती नव्हती. हेच कारण आहे की, खुद्द ज्यूंनाही दुसर्‍या मंदिराच्या पवित्र पवित्रतेची जागा दिसली नाही; पण वर्ष १९७० मध्ये रोमनने हेही मोडून काढले. या मंदिराची एक भिंत तशीच राहिली. ही भिंत अजूनही शाबूत आहे. या भिंतीला ‘ज्यू वेस्टर्न वॉल’ म्हणतात. ज्यू लोक या ‘वेस्टर्न वॉल’ला ‘होली ऑफ होलीज’चा एक भाग मानतात. स्वतः ज्यूंनाही पवित्र स्थानात जाण्याची अनुमती नसल्याने  आतील जागा नेमकी कुठे आहे, हे त्यांना ठाऊक नव्हते. असे असूनही वेस्टर्न वॉलमुळे हे ठिकाण ज्यूंसाठी अतिशय पवित्र आहे.

४. ख्रिस्त्यांच्या दृष्टीने ३५ एकर जागेचे महत्त्व

ख्रिस्त्यांचा असा विश्‍वास आहे की, येशू ख्रिस्ताने या ३५ एकरच्या भूमीत प्रचार केला. याच भूमीवरून त्याला वधस्तंभावर खिळे ठोकण्यात आले. मग तो पुन्हा उठेल. आता जेव्हा तो पुन्हा जिवंत होईल, तेव्हा ही जागा महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी ख्रिस्तांची श्रद्धा आहे. साहजिकच अशा स्थितीत हे ठिकाण मुसलमान किंवा ज्यू यांच्यासाठी जेवढे पवित्र आहे, तेवढेच ख्रिस्त्यांसाठीही आहे.

५. पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांचा इतिहास

वर्ष ११८७ पूर्वी काही काळ ‘हरम अल् शरीफ’ किंवा ‘टेंपल माऊंट’ ख्रिस्त्यांच्या कह्यात होते. वर्ष ११८७ मध्ये ‘हरम अल् शरीफ’ मुसलमानांनी कह्यात घेतले. यानंतर त्याच्या संपूर्ण व्यवस्थापनाचे दायित्व वक्फ म्हणजेच इस्लामिक ट्रस्टला देण्यात आले. तेव्हापासून वर्ष १९४८ पर्यंत इस्लामिक ट्रस्ट ‘हरम अल् शरीफ’चे व्यवस्थापन पहात होता. या काळात या ठिकाणी मुसलमानेतरांना प्रवेश नव्हता. वर्ष १९४८ पूर्वी ‘हरम अल् शरीफ’ पॅलेस्टाईनचा भाग होता. तरीही काही ज्यू येथे निर्वासित म्हणून रहात होते; पण त्या वेळी पॅलेस्टाईन इंग्रजांच्या कह्यात होता. वर्ष १९४८ मध्ये ब्रिटिशांनी पॅलेस्टाईनचे दोन तुकडे केले. जसे इंग्रजांनी वर्ष १९४७ मध्ये भारताचे २ तुकडे केले होते. त्यानंतर संपूर्ण पॅलेस्टिनी भूमीपैकी ५५ टक्के भूमी पॅलेस्टाईनच्या, तर ४५ टक्के इस्रायलच्या वाट्याला आली. यानंतर १४ मे १९४८ या दिवशी इस्रायलने स्वतःला ‘एक स्वतंत्र देश’ घोषित केले आणि अशा प्रकारे जगात प्रथमच ज्यू देशाचा जन्म झाला; पण जेरुसलेमचा लढा अजूनही चालूच आहे.

(साभार : ‘आज तक’ वृत्तवाहिनी)

इस्रायल ‘संशयाची सुई’ म्हणून पहात असलेला आतंकवादी महंमद देईफ कोण आहे ?

इस्रायलवर ‘हमास’ या आतंकवादी संघटनेने गेल्या ५० वर्षांतील सर्वांत मोठे आक्रमण केले आहे. हे आक्रमण घडवून आणण्यामागे ‘महंमद देईफ’ हा सूत्रधार असल्याचा इस्रायलचा विश्‍वास आहे. (अरबी भाषेत देईफ म्हणजे ‘पाहुणे’ असा अर्थ आहे) इस्रायलने महंमद देईफला नवा ‘ओसामा बिन लादेन’ म्हटले आहे.

इस्रायलने महंमद देईफला नवा ‘ओसामा बिन लादेन’ म्हटले !

१. महंमद देईफची पार्श्‍वभूमी

महंमद देईफ याचा जन्म गाझा येथे ऑगस्ट १९६५ मध्ये झाला. त्याच्या वडिलांचे नाव महंमद दीब इब्राहिम अल मसरी होते. महंमद देईफचा जन्म एका निर्वासित छावणीत झाला. त्याने स्वतःचे नाव पालटून अरबी भाषेत ‘देईफ’ असे ठेवले. महंमद देईफ हा हमास या आतंकवादी संघटनेची लष्करी शाखा ‘अल् कासम’ ब्रिगेडचा कमांडर आहे. इस्रायलकडे त्याचे एकच छायाचित्र आहे.

२. महंमद देईफ रहातो कुठे ?

हमासचे आक्रमण महंमद देईफच्या सांगण्यावरून करण्यात आल्याचे इस्रायलचे मत आहे. असे म्हटले जाते की, इस्रायलची गुप्तचर संस्था ‘मोसाद’ने ५८ वर्षीय महंमद देईफला ७ वेळा मारण्याचा प्रयत्न केला; परंतु प्रत्येक वेळी तो अयशस्वी झाला. ‘मोसाद’ अनेक दशकांपासून महंमद देईफचा शोध घेत आहे; पण प्रत्येक वेळी तो तिच्या जाळ्यातून निसटतो. विविध संकेतस्थळावरील बातम्यांनुसार महंमद देईफ हा नेहमी चाकांच्या खुर्चीवर (‘व्हीलचेअर’वर) असतो आणि गाझामध्ये बांधलेल्या भूमीगत बोगद्यांच्या नेटवर्कमध्ये तो रहातो. या बोगद्यांमुळे महंमद देईफ प्रत्येक वेळी ‘मोसाद’च्या हातातून निसटतो. हे बोगदे बांधण्यात महंमद देईफ याचाही हात आहे. तो प्रतिदिन रात्री स्वतःचे स्थान पालटत रहातो आणि कधीही एका जागी थांबत नाही. तो इस्रायली लोकांच्या हत्येचे आवाहन करणारे ध्वनीमुद्रित (रेकॉर्ड) केलेले संदेश हमासच्या आतंकवाद्यांना अनेकदा पाठवतो. देईफ याने अन्य देशांतील आपल्या समर्थकांना हमासमध्ये सामील होण्याचे आवाहन केले आहे. परिणामी अनेक देशांतील नागरिक या आतंकवादी कारवायांत अडकण्याचा धोका आहे.

(माहिती स्रोत : विविध संकेतस्थळे)