कर्नाटकला कळसा प्रकल्पासाठी गोव्याची संमती घेणे बंधनकारक ! – देविदास पांगम, गोव्याचे महाधिवक्ता
पणजी, १० ऑक्टोबर (वार्ता.) : कर्नाटकातील ‘नीरवरी निगम लि.’ ही संस्था म्हादईचे पाणी कर्नाटकमध्ये वळवण्यासाठी कळसा धरण प्रकल्प उभारत आहे. या प्रकल्पासाठी विविध संस्थांच्या अनुज्ञप्ती घेतलेल्या असल्या, तरी कळसा प्रकल्पाचे काम गोव्याचे मुख्य वीन्यजीव वॉर्डन यांच्या संमतीविना चालू करता येणार नाही, अशी माहिती गोव्याचे महाधिवक्ता देविदास पांगम यांनी दिली.
(सौजन्य : prudent media)
कर्नाटक राज्य वन्यजीव मंडळाने गत आठवड्यात कर्नाटकमधील कळसा प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी संमती दिली आहे. कळसा प्रकल्पाच्या माध्यमातून म्हादईचे पाणी कर्नाटकमधील मलप्रभा नदीत वळवले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर महाधिवक्ता देविदास पांगम यांनी ही माहिती दिली.
पांगम पुढे म्हणाले, ‘‘म्हादई अभयारण्यातून पाणी वळवायचे असल्याने कर्नाटकला वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम २९ अंतर्गत गोव्याच्या मुख्य वन्यजीव वॉर्डनची संमती घेणे बंधनकारक आहे, तसेच कर्नाटकला कळसा प्रकल्प उभारण्यासाठी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान पालट मंत्रालयाकडून अनुज्ञप्ती घेणे बंधनकारक आहे.’’
♦ ‘म्हादई जलवाटप तंटा’ या संदर्भातील आजपर्यंतच्या घडामोडी पाहण्यासाठी क्लिक करा ♦