समीर गायकवाड यांच्‍या ध्‍वनीमुद्रणातील सर्वच मजकूर पंचनाम्‍यात का नाही ? यावर उत्तर देण्‍यास पंच असमर्थ !

कॉ. गोविंद पानसरे हत्‍या प्रकरण

कॉ. गोविंद पानसरे

कोल्‍हापूर – समीर गायकवाड यांच्‍या ध्‍वनीमुद्रणाविषयी जो पंचनामा सादर केला आहे, त्‍यात प्रत्‍यक्षात झालेले संभाषण आणि नोंद केलेला मजकूर यात काही वाक्‍ये गाळण्‍यात आलेली आहेत, ती का गाळण्‍यात आली आहेत ? विविध लोकांसमवेत जे संपूर्ण संभाषण झाले, ते सर्व पंचनाम्‍यात का आले नाही ? ध्‍वनीमुद्रणाच्‍या संदर्भात करण्‍यात आलेल्‍या सर्वच पंचनाम्‍यांवर संभाषणांची वेळ लिहिलेली नाही, ती का लिहिलेली नाही ? यांसह पंचांनी न्‍यायालयात ‘समीर गायकवाड यांचे अन्‍य लोकांसमवेत झालेले संभाषण भ्रमणसंगणकावर ऐकले’, असे सांगितले, प्रत्‍यक्षात पंचनाम्‍यात ‘ध्‍वनीमुद्रण भ्रमणभाषवर ऐकवले’, असे लिहिले आहे, त्‍यामुळे संशयित समीर गायकवाड यांच्‍या संभाषणाविषयी साक्ष देणारे राज्‍य विक्रीकर अधिकारी दत्ताजी शिंदे हे पोलिसांना साहाय्‍य करण्‍याच्‍या दृष्‍टीने साक्ष देत आहेत, असे संशयितांच्‍या वतीने ज्‍येष्‍ठ अधिवक्‍ता अनिल रुईकर आणि मुंबई येथील अधिवक्‍ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी उलटतपासणीत न्‍यायालयात सांगितले.

कॉ. गोविंद पानसरे हत्‍येच्‍या प्रकरणाची सुनावणी जिल्‍हा आणि सत्र न्‍यायाधीश एस्.एस्. तांबे यांच्‍यासमोर चालू आहे. ‘समीर गायकवाड यांचे लोकांसमवेतचे भ्रमणभाषवर संभाषण हा महत्त्वाचा पुरावा असून तो थेट गुन्‍ह्याशी संबंधित आहे’, असा दावा सरकारी पक्षाने केला असून त्‍या संदर्भातील एक पंच दत्ताजी शिंदे यांची साक्ष आणि उलटतपासणी ९ आणि १० ऑक्‍टोबर या दिवशी घेण्‍यात आली. सरकारीपक्षाच्‍या वतीने अधिवक्‍ता शिवाजीराव राणे यांनी काम पाहिले.

अधिवक्‍ता डी.एम्. लटके यांनीही पंच दत्ताजी शिंदे यांची उलटतपासणी घेतली. या प्रसंगी अधिवक्‍ता समीर पटवर्धन, अधिवक्‍ता आदित्‍य मुद़्‍गल, अधिवक्‍त्‍या स्नेहा इंगळे, अधिवक्‍त्‍या अनुप्रिता कोळी, अधिवक्‍त्‍या प्रीती पाटील उपस्‍थित होत्‍या. या खटल्‍यात एकूण १२ संशयित आरोपी असून या प्रकरणाची पुढील सुनावणी २५ ऑक्‍टोबरला होणार आहे.

या प्रसंगी अधिवक्‍ता अनिल रुईकर उलट तपासणीत म्‍हणाले, ‘‘साक्षीदार शिंदे ‘मला देण्‍यात आलेली ‘स्‍क्रीप्‍ट’ (ध्‍वनीमुद्रणावरून पोलिसांनी सिद्ध केलेला मजकूर) आणि ध्‍वनीमुद्रण यांची पडताळणी केली’, असे सांगत आहेत; प्रत्‍यक्षात ही ‘स्‍क्रीप्‍ट’ कुणी सिद्ध केली त्‍यांचे नाव पंचनाम्‍यात नाही. ज्‍याप्रकारे दुसर्‍या पंचनाम्‍यात ‘स्‍क्रीप्‍ट’ आहे, त्‍याप्रकारे पहिल्‍या पंचनाम्‍यात ‘स्‍क्रीप्‍ट’ का नाही ? याचे उत्तर पंच देऊ शकत नाहीत. ज्‍या ‘मेमरी कार्ड’ (भ्रमणभाषमधील मजकूर ठेवण्‍यासाठी वापरण्‍यात येणारे एक उपकरण) मध्‍ये हे संभाषण घेण्‍यात आले ते प्रारंभी रिकामे होते कि भरलेले होते ? याची निश्‍चिती पंचांनी केलेली नाही.’’

अधिवक्‍ता वीरेंद्र इचलकरंजीकर म्‍हणाले, ‘‘संभाषण झालेल्‍या ज्‍या धारिका संरक्षित केल्‍या आहेत, त्‍यांना ‘एक्‍स्‍टेंशन’ लिहिण्‍यात आलेले नाही. ‘स्‍क्रीप्‍ट’प्रमाणे नेमका ‘कॉल’ कुणाकुणाला केला, याचा उल्लेख नाही आणि तो उल्लेख का केला नाही ? तेही पंचांना सांगत येत नाही. यामुळे पंचांनी प्रत्‍यक्षात नोंदवलेली साक्ष आणि आज देत असलेली साक्ष यांत अनेक विसंगती आहेत.’’