मुंबईत तिकीट तपासनीस महिलेला तरुणीकडून मारहाण !
-
विनातिकीट प्रवास करत होती तरुणी
-
प्रवाशांनी साखळी खेचली
मुंबई – पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट-गोरेगाव लोकल प्रवासादरम्यान तिकिटाची विचारणा केल्याने तरुणीने संतप्त होऊन तपासनीस महिलेशी वाद घातला आणि तिला मारहाण केली. या प्रकरणी तरुणीला लोहमार्ग पोलिसांनी कह्यात घेतले आहे.
१. चर्चगेटहून सायंकाळी पाचच्या सुमारास सुटणारी गोरेगाव लोकल दादर स्थानकात आल्यानंतर प्रथम श्रेणीच्या महिलांच्या डब्यात दोन महिला तिकीट तपासनीस चढल्या.
२. प्रवासी तरुणीकडे प्रथम श्रेणीचे तिकीट नव्हते. तिला दंड भरण्यास सांगितल्यावर तरुणीने त्यांच्याशी वाद घातला. तिने एका तपासनीस महिलेची कॉलर पकडून तिच्या कानशिलात लगावली. हा सर्व प्रकार बघून अन्य महिला प्रवाशांनी रेल्वे थांबवण्यासाठी साखळी खेचली.
३. लोकल काही काळ माहीम ते वांद्रे स्थानकादरम्यान खोळंबली होती. लोकल वांद्रे रेल्वेस्थानकात आल्यानंतर संबंधित तरुणीला तिकीट तपासनीसाने उतरवून लोहमार्ग पोलीस ठाण्यात नेले.
४. हार्बर रेल्वे मार्गावरील गुरुतेगबहाद्दूर नगर स्थानकावर एका युवकानेही तिकीट तपासनीस महिलेवर मध्यंतरी हात उगारला होता. (तिकीट तपासनीस महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनाने ठोस उपाययोजना काढायला हवी ! – संपादक)
संपादकीय भूमिकाचोर तो चोर वर शिरजोर ! विनातिकीट प्रवास करत असूनही तिकीट तपासनीस महिलेशी वाद घालणे आणि मारहाण करणे, यावरून तरुणींचा उद्दामपणा वाढत असल्याचे लक्षात येते. |