पितरोपासना (श्राद्ध ) !
‘देवपितृकार्याभ्यां न प्रमदितव्यम् ।’ (तैत्तिरीयोपनिषद़्, शिक्षाध्याय, अनुवाक ११, वाक्य २)
अर्थ : देव आणि पितर यांच्या कार्यात खंड पडू देऊ नये.
पूर्वीच्या प्रथेनुसार हे वचन गुरूंनी शिष्यांचे विद्यार्जन पूर्ण झाल्यावर ते आश्रमातून घरी गेल्यावर आणि गृहस्थाश्रम स्वीकारल्यावर पुढच्या आयुष्यात ‘आपण काय करावे ? आणि कसे वागावे ?’, हे सांगतांना सांगितले आहे. सध्या तरी समाजात देवकार्याविषयी श्रद्धा वाढीस लागलेली दिसत आहे; परंतु पितरांविषयी म्हणावे, तेवढे कुणी काही करतांना दिसत नाही.
१० ऑक्टोबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘श्रौत कर्मकांडात पितरांना देवापेक्षाही अधिक मान देणे, श्राद्ध आणि श्राद्धाचे प्रकार’ यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
३. पितरांचा काळ
मानवाचा एक मास म्हणजे पितरांचा एक दिवस. मासातील शुक्ल पक्ष म्हणजे पितरांची रात्र आणि कृष्ण पक्ष म्हणजे पितरांचा दिवस. पितरांचे वस्तीस्थान अथवा पितृलोक हा चंद्रलोकाच्या वरच्या बाजूला आहे.
विधूर्ध्वभागे पितरो वसन्तः स्वाधः सुधादीधितिमामनन्ति ।
पश्यन्ति तेऽर्कं निजमस्तकोर्ध्वे दर्शे यतोऽस्माद़्द्युदलं तदैषाम् ॥
– सिद्धान्तशिरोमणि, गोलाध्याय, त्रिप्रश्नवासना, श्लोक १३
अर्थ : चंद्रलोकाच्यावर पितरांचा निवास असतो. पितरांच्या खालच्या बाजूला चंद्राचे तेज असते.
वरील श्लोकाने पितृलोक चंद्रलोकाच्या वर आहे, याला पुष्टी मिळतेच; पण कृष्ण पक्षात चंद्र आणि रवि जवळ जवळ येतात अन् अमावास्येला ते एकाच राशीत (युतीत) येतात. तेव्हा सूर्य चंद्राच्या डोक्यावर येतो, म्हणजे त्या वेळी चंद्रलोेकात मध्यान्ह असतो, तर आपला अपराण्ह काळ, म्हणजे दिवसाचा तिसरा प्रहर किंवा दुपारनंतरची वेळ असते; म्हणूनच ‘आपल्याला श्राद्ध केव्हा करावे ?’, हे सांगतांना शास्त्राने अपराण्ह काळात (दुपारनंतर) करावे’, असे सांगितले आहे. त्या वेळी पितृलोकात मध्यान्ह असल्याने सर्वसाधारण भोजनाची वेळ असते.
४. श्राद्ध केल्याने पितरांचे आशीर्वाद मिळणे
श्राद्धामध्ये अग्नौकरण, ब्राह्मणभोजन आणि पिंडदान ही ३ महत्त्वाची अंगे आहेत. या तीनही मार्गांनी पितरांना अन्न मिळून पितर तृप्त होतात. तृप्त झालेले पितर आपणाला कोणता आशीर्वाद देतात, तर
४ अ. गरुडपुराणानुसार
आयुः पुत्रान् यशः स्वर्गं कीर्तिं पुष्टिं बलं श्रियम् ।
पशुन् सौख्यं धनं धान्यं प्राप्नुयात् पितृपूजनात् ॥
– गरुडपुराण, अंश २, अध्याय १०, श्लोक ५७
अर्थ : आयुष्य, पुत्र, यश, स्वर्ग, कीर्ती, पुष्टी, बल, लक्ष्मी, पशू, सौख्य, धन आणि धान्य या गोष्टी पितृपूजनाने, म्हणजेच श्राद्ध केल्याने प्राप्त होतात.
४ आ. कूर्मपुराणानुसार : कूर्मपुराणानुसार ‘सर्व पापांपासून मुक्त होतो’, असे म्हटले आहे.
याच अर्थाची अनेक वचने आढळून येतात.
५. प्रत्येकाने श्राद्ध करणे आवश्यक असणे
प्रत्येकाने आपल्या अधिकाराप्रमाणे श्राद्ध करणे आवश्यक आहे. न्यूनतम आई-वडील यांची सांवत्सरिक श्राद्धे आणि पितृपक्षात महालय करावे.
‘संकल्प सांगण्यास ब्राह्मण मिळत नाही’, इत्यादी गोष्टी आता इतिहासजमा झाल्या आहेत; कारण आमचे गुरुवर्य प.पू. अण्णाशास्त्री दाते (पंचांगकर्ते – सोलापूर) यांनी त्यांच्या ‘धर्मशास्त्रीय निर्णय भाग १’, यात श्राद्धसंकल्पापासून सर्व सविस्तर दिले आहे. ते जिज्ञासूंनी अवश्य पहावे.
६. काम्य श्राद्धामुळे वार, नक्षत्र आणि तिथी यांनुसार मिळणारी फळे !
वर वर्णन केलेल्या श्राद्धाच्या प्रकारात ‘काम्य’ श्राद्ध असा एक प्रकार आला आहे. यामध्ये ‘कोणत्या तिथी, नक्षत्र किंवा दिवस या दिवशी श्राद्ध केल्यास काय फळ मिळते ?’, ते येथे दिले आहे. यात काही ठिकाणी मतभेद आहेत. मी घेतांना ‘हेमाद्रि विरचित चतुर्वर्गचिंतामणी कालनिर्णय’ खंडातून घेतले आहे, याची नोंद घ्यावी.
७. पितर अन्न कसे ग्रहण करतात ?
७ अ. वसु, रुद्र आणि आदित्य या पितृदेवतांद्वारे अन्न पितरांना मिळत असणे : आता आपल्या मनात असा प्रश्न आला असेल, ‘ब्राह्मणाने खाल्लेले अन्न आणि होमाग्नीत अर्पण केलेेले अन्न पितरांना कसे मिळते ?’, हाच प्रश्न ‘मत्स्यपुराणा’त उपस्थित करून त्याचे उत्तर दिले आहे. ते असे, ‘वसु, रुद्र आणि आदित्य या पितृदेवतांद्वारे ते अन्न पितरांना मिळते किंवा त्या अन्नाचे भिन्न पदार्थांत म्हणजे अमृत, तृण, हवा इत्यादीत रूपांतर होते अन् भिन्न योनीतील पितरांना मिळते. थोडक्यात मृत व्यक्ती दुसर्या योनीत गेली असेल, तर त्या योनीतही त्यांना ते अन्न मिळते. जसे देवयोनीत असल्यास अमृतरूपाने, पशूयोनीत असल्यास तृणरूपाने आणि सर्पयोनी असल्यास वायुरूपाने इत्यादी.’
७ आ. पितरांनी वायुरूपाने भोजन करणे : श्राद्धकाळात पितर मनोमय रूपाने श्राद्धस्थळी उपस्थित होतात आणि ‘ब्राह्मणभोजन करतांना त्यांच्यासह वायुरूपाने भोजन करतात’, असा आधार काही ठिकाणी मिळतो.
८. महालय अमावास्येच्या दिवशी श्राद्ध न केल्यास पितर शाप देत असणे
अ. विशेषतः भाद्रपद कृष्ण अमावास्येच्या दिवशी श्राद्ध काळात पितर दारावर येऊन बसतात आणि श्राद्ध न केल्यास शाप देऊन निघून जातात; म्हणून ‘निदान या दिवशी तरी श्राद्ध करावे’, असे उल्लेख मिळतात.
कन्यागते सवितरि पितरो यान्ति वै सुतान् ।
अमावास्यादिने प्राप्ते गृहद्वारं समाश्रिताः ।
श्राद्धाभावे स्वभवनं शापं दत्वा व्रजन्ति ते ॥
अर्थ : जेव्हा सूर्य कन्या राशीत प्रवेश करतो, तेव्हा पितर आपल्या वंशजांकडे (मुलांकडे) येतात. विशेषतः सर्वपित्री अमावास्येला ते घराच्या दारापाशी येऊन थांबतात. जर त्या दिवशी त्यांच्यासाठी श्राद्धविधी केले नाहीत, तर ते स्वतःच्या घराला शाप देऊन परत जातात.
आ. तसेच ‘आदित्य पुराणा’त ‘जो आपल्या पितरांचे श्राद्ध करत नाही, त्याचे पितर रक्त पितात’, असा उल्लेख मिळतो.
९. पितृव्रत
या विषयाशी संलग्न असणारे व्रतही आहे. त्याचे ‘पितृव्रत’ असे नाव आहे. याचा कालावधी १ वर्ष इतके असून ते प्रत्येक दर्श अमावास्येला करावे. याचे फल म्हणून १०० पूर्वजांना मोक्षप्राप्ती आणि व्रतधारी व्यक्तीस विष्णुलोक मिळतो.
१०. पितरस्तुती स्तोत्र
‘मार्कंडेय पुराणा’त ‘पितरस्तुती स्तोत्र’ आहे. हे स्तोत्र रुचीने (रौच्य मनूच्या पित्याने) स्त्रीप्राप्ती आणि उत्तम प्राप्तीसाठी म्हटले आहे. पितरांनी प्रसन्न होऊन रुचीला आशीर्वाद दिला, ‘जे लोक या स्तोत्राने आमची स्तुती करतील, त्यांना मनोवांच्छित भोग, आत्मज्ञान, निरोगी शरीर, धन आणि पुत्रपौत्र देऊ. श्राद्धप्रसंगी या स्तोत्राचा पाठ केल्यास आम्ही तिथे उपस्थित राहू.’
१० अ. पितरस्तुती स्तोत्र वाचनाचे लाभ : हे स्तोत्र हेमंत ऋतूत श्राद्धाच्या निमित्ताने म्हटल्यास १२ वर्षांची तृप्ती, शिशिर ऋतूत २४ वर्षांची, वसंत ऋतूत १६ वर्षांची, ग्रीष्म ऋतूतही १६ वर्षांची, वर्षाऋतूत केलेले श्राद्ध काही गोष्टींमध्ये अल्प असले, तरी या स्तोत्राच्या पाठाने ती पूर्ण होते. ज्या घरात हे स्तोत्र सदैव लिहिले जाते, तिथे आम्ही (पितर) श्राद्धाच्या वेळी निश्चयाने उपस्थित असतो’, असे म्हटले आहे. थोडक्यात पितरांची पुष्टी करणारे हे स्तोत्र आहे. आपण लिहिण्याचा प्रयत्न करावा आणि श्राद्धाच्या वेळी अवश्य म्हणावे. अमावास्येला दर्शश्राद्ध, तर्पण इत्यादी दिवशी याचा पाठ म्हणावा.’
(समाप्त)