गणेशोत्सव कालावधीत अन्नपदार्थांचा ३१ लाख रुपयांचा साठा शासनाधीन !
अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई !
पुणे – गणेशोत्सव कालावधीत अन्न आणि औषध प्रशासन विभागाने पुणे जिल्ह्यात धडक मोहीम राबवून दूध, गायीचे तूप, भेसळयुक्त बटर (लोणी), स्वीट खवा आणि वनस्पती आदी अन्नपदार्थांचा एकूण ३१ लाख २ सहस्र ४७ रुपयांचा साठा शासनाधीन केला असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागाने दिली आहे. नागरिकांचे सार्वजनिक आरोग्य, तसेच जनहित विचारात घेऊन अन्न आणि औषध प्रशासन विभागाने पुणे जिल्ह्यात उत्सवाच्या कालावधीत ३०८ ठिकाणी पडताळणी केल्या. त्यांपैकी १४४ आस्थापनांना सुधारणा नोटीस बजावली आहे. जिल्ह्यातून दूध, खवा, पनीर, स्वीट मावा, गायीचे तूप, बटर आणि वनस्पती आदी अन्नपदार्थांचे एकूण १५० अन्न नमुने विश्लेषणासाठी घेतले होते. त्याचे अहवाल प्राप्त होताच कायद्यान्वये कारवाई केली. नागरिकांना अन्नपदार्थांमधील भेसळीच्या संदर्भात काही संशय आल्यास संपर्क साधावा, असे आवाहन पुणे विभागाचे सहआयुक्त (अन्न) सुरेश अन्नपुरे यांनी केले आहे.