जगद़्‍गुरु संत तुकाराम महाराज आणि समर्थ रामदासस्‍वामी यांचा त्‍याग !

संत तुकाराम महाराज

‘छत्रपती शिवाजी महाराज यांनी जगद़्‍गुरु संत तुकाराम महाराज यांचा नावलौकिक ऐकून त्‍यांना भेट म्‍हणून उंची वस्‍त्रे, धन, सुवर्णालंकार पाठवले होते; परंतु निःस्‍पृह निर्लोभी, निर्मोही तुकोबांनी तो नजराणा (भेट) स्‍वीकार न करता विनम्रतेने पुन्‍हा राजांकडे परत पाठवला.

वास्‍तवात त्‍या दुष्‍काळाच्‍या काळात संत तुकोबांच्‍या घरी १८ विश्‍वे दारिद्य्र होते. पैशांची नितांत आवश्‍यकता होती. पत्नी, मुलेबाळे उपाशी रहात होते. दुसरा कुणी असता, तर त्‍याने त्‍या धनाचा आनंदाने स्‍वीकार केला असता; पण संतांची गोष्‍टच वेगळी !

समर्थ रामदास स्वामी

दुसरे उदाहरण श्रीसमर्थ रामदासस्‍वामी यांचे. ते जेव्‍हा भिक्षा मागत छत्रपती शिवरायांकडे पोचले आणि त्‍यांना भिक्षा मागितली, तेव्‍हा महाराजांनी आपल्‍या राज्‍याची सनदच त्‍यांच्‍या झोळीत घातली; पण श्री समर्थ रामदासांनी ती संपूर्ण स्‍वराज्‍याची सनद अत्‍यंत निःस्‍पृहपणे राजाला परत करून केवळ स्‍वराज्‍याचा झेंडा भगवा जो संन्‍यस्‍त वृत्तीचे आणि अलिप्‍ततेचे प्रतीक आहे, तो करावयास सांगितला. हीच ती संतांची आगळी वेगळी श्रीमंती होय ! त्‍या श्रीमंतीची जातच काही अलौकिक आहे. दैवी गुणसंपदा हेच त्‍यांचे वैभव ! दया, क्षमा, शांती, परोपकार, त्‍याग, निःस्‍पृहता, नि:स्‍वार्थ, निर्लोभ हीच त्‍यांची संपत्ती !’

– श्रीमती ज्‍योती चिटगोपेकर, संभाजीनगर

(साभार : ‘श्रीक्षेत्र पावस’, १५.८.२०२३)