कोची, केरळ येथील श्री. सिजू शशिधरन यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात आलेल्‍या अनुभूती !

‘आम्‍ही एकदा रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात जायचे ठरवले. तेव्‍हा माझ्‍या मनात ‘गुरुदेवांचे (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) चांगले दर्शन व्‍हावे आणि त्‍यांचे आशीर्वाद मिळावेत’, अशी एकच प्रार्थना होत होती. तिथे गेल्‍यावर मला आलेल्‍या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

श्री. सिजू शशिधरन

१. आम्‍ही आश्रमात पोचल्‍यावर माझे शरीर आणि मन यांच्‍यामध्‍ये विशेष ऊर्जा प्रवेश करत होती अन् आनंद मिळत होता.

२. आश्रमातील सर्वांनी मित्राप्रमाणे वागणे, सर्वांच्‍या चेहर्‍यावर हास्‍य दिसणे आणि आश्रम स्‍वर्गीय ठिकाणासारखा वाटणे

आश्रमात आम्‍हाला केवळ आनंदी चेहरेच दिसत होते. प्रत्‍येक जण जवळच्‍या मित्रासारखा वागत होता. जणू काही ते आम्‍हाला बर्‍याच कालावधीपासून ओळखत असल्‍यासारखे वागत होते आणि सर्वांच्‍या चेहर्‍यावर एक गोंडस हास्‍य दिसत होते. त्‍यामुळे ‘आम्‍ही खरोखर स्‍वर्गीय ठिकाणी पोचलो आहोत’, असे आम्‍हाला वाटले.

३. ‘गुरुदेव रामनाथी आश्रमाच्‍या माध्‍यमातून हिंदु राष्‍ट्राचा आदर्श दाखवत आहेत’, असे आम्‍हाला वाटले.

४. ध्‍यानमंदिरात शब्‍दातीत आनंद मिळणे आणि आश्रमात असतांना नामजप द्विगुणीत होणे

 ध्‍यानमंदिरात अनुभवलेला आनंद शब्‍दांच्‍या पलीकडचा आहे. तेथे सकाळ-संध्‍याकाळ होणारी आरती प्रत्‍येकामध्‍ये विशेष भाव निर्माण करते. खरेतर, आश्रमात पोचल्‍यानंतर माझा नामजप द्विगुणीत झाला आणि मी आश्रमात असतांना अधिकाधिक वेळ ध्‍यानमंदिरात घालवला.

 ५. सर्वांनी आश्रमातील जीवनपद्धती प्रत्‍यक्ष जीवनात आचरणात आणणे आवश्‍यक असणे

आश्रमात प्रत्‍येकाने पाळलेली शिस्‍त, शिष्‍टाचार आणि साधेपणा यांचा मला विशेष उल्लेख करावासा वाटतो. त्‍यातून आपण सर्वांनी शिकले पाहिजे आणि आपल्‍या जीवनातही ते आचरणात आणण्‍याचा प्रयत्न केला पाहिजे.

६. सत्‍सेवेतून शिकणे

मला आश्रमात सत्‍सेवा करण्‍याची संधी मिळाली. त्‍यामुळे मला अनेक नवीन गोष्‍टी शिकण्‍यास साहाय्‍य झाले. त्‍याचे मला माझ्‍या अधिकृत आणि वैयक्‍तिक जीवनात पालन करायचे आहे.

७. आश्रमात असतांना घर किंवा कार्यालय यांचे विचार मनात न येणे

मी प्रामाणिकपणे सांगू इच्‍छितो, ‘आश्रमात पोचल्‍यानंतर माझ्‍या मनात माझे घर किंवा कार्यालय यांच्‍याविषयी कधीही कोणत्‍याही प्रकारचे विचार आले नाहीत. ‘मी स्‍वप्‍नात आहे’, असे मला वाटत होते.’

८. गुरुदेवांचा सत्‍संग लाभणार असल्‍याचे कळल्‍यानंतर मोतीबिंदूचे शस्‍त्रकर्म झाल्‍यानंतर कधीच ओले न झालेल्‍या डोळ्‍यांतून भावाश्रू येणेे 

आम्‍हाला गुरुदेवांचा (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा) सत्‍संग लाभणार असल्‍याचे कळल्‍यानंतर ‘माझ्‍या डोक्‍यापासून पायापर्यंत काहीतरी विशेष ऊर्जा खाली वहात आहे’, असे वाटले. अनेक वर्षांपूर्वी माझे मोतीबिंदूचे शस्‍त्रकर्म झाल्‍यानंतर माझे डोळे कधीच ओले झाले नाहीत; परंतु गुरुदेवांच्‍या भेटीपूर्वी माझ्‍या डोळ्‍यांतून भावाश्रू आले.

९. गुरुदेवांच्‍या दर्शनाने मनातील शंकांचे आपोआप निरसन होऊन मन शांत होणे

गुरुदेवांच्‍या सत्‍संगात त्‍यांना विचारण्‍यासाठी माझ्‍या मनात बरेच प्रश्‍न होते; परंतु गुरुदेवांच्‍या दर्शनाने माझे शंकानिरसन आपोआप झाले आणि माझे मन एका साध्‍या पांढर्‍या कागदासारखे पूर्णपणे शांत अन् रिकामे झाले.

१०. आश्रमातून घरी आल्‍यावर अनाकलनीय आनंद होणे आणि ‘सर्वकाही केवळ गुरुदेवांच्‍या आशीर्वादामुळेच होत आहे’, असा दृढ विश्‍वास वाटणे

आश्रमातून घरी पोचल्‍यावर मला माझ्‍या वाटीकेत नेहमीपेक्षा अधिक फुले दिसली. त्‍यामुळे माझ्‍या मनात अनाकलनीय आनंद वाढला. ‘सर्वकाही केवळ गुरुदेवांच्‍या आशीर्वादामुळेच होत आहे’, असा माझा ठाम विश्‍वास आहे.’

– श्री. सिजू शशिधरन, कोची, केरळ.

  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक