शिक्षक म्हणजे शैक्षणिक प्रगतीत मोठे योगदान देणारा घटक ! – शंभूराज देसाई
सातारा, ९ ऑक्टोबर (वार्ता.) – शिक्षक म्हणजे शैक्षणिक प्रगतीमध्ये मोलाचे योगदान देणारा सामाजिक घटक आहे. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये जिव्हाळ्याचे स्थान निर्माण करावे, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या यशवंतराव सभागृहात ‘जिल्हास्तरीय शिक्षक’ पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर खासदार श्रीनिवास पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी आदी उपस्थित होते.
पालकमंत्री देसाई पुढे म्हणाले, ‘‘पूर्वी दळण-वळणाच्या सुविधा नसतांनाही शिक्षकांनी राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, तेव्हाचे शिक्षणमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई असे विद्यार्थी घडवले. आता सोयी झाल्या आहेत. आताच्या शिक्षकांनीही चांगले विद्यार्थी घडवून नवी पिढी निर्माण करावी, ही अपेक्षा आहे. जिल्ह्यात आदर्श शाळा आणि ‘स्मार्ट’ प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात येत आहेत. त्यासाठीच्या सोयी सुविधा उभारण्यात येत आहेत. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आय केअरचे सीइओ यांनी सी.एस्.आर्. निधीतून ५०० संगणक दिले आहेत. त्यातील १०० संगणकाचे आज वितरण होत आहे. जिल्ह्यातील मोठ्या उद्योजकांनी त्यांच्या सी.एस्.आर्. निधीतून शाळांसाठी भरीव साहाय्य करावे. शिक्षकांवरील ताण अल्प करण्यासाठी लवकरच शिक्षक भरती करण्यात येणार आहे.’’