कोकण रेल्वेमार्गावर १0 आणि १२ ऑक्टोबरला ‘मेगाब्लॉक’
रत्नागिरी – कोकण रेल्वे मार्गावर देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी १० ऑक्टोबर या दिवशी संगमेश्वर तालुक्यातील कडवई ते रत्नागिरी या स्थानकांदरम्यान आणि १२ ऑक्टोबर या दिवशी मडगाव ते कुमठा या स्थानकांदरम्यान ३ घंट्यांचा ‘मेगाब्लॉक’ (मेगाब्लॉक म्हणजे अधिक कालावधीसाठी वाहतूक थांबवणे) करण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे २ दिवसांत ५ गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार,
कडवई ते रत्नागिरी दरम्यान १० ऑक्टोबर या दिवशी सकाळी ७.४० ते १०.४० या वेळेत मेगाब्लॉक असून यामुळे ‘१९५७७ तिरुनवेली ते जामनगर’ ही ९ ऑक्टोबर या दिवशी प्रवास चालू होणारी गाडी ठोकर ते रत्नागिरी दरम्यान ३ घंटे थांबवून ठेवली जाणार आहे. ९ ऑक्टोबर या दिवशी प्रवास चालू होणारी १६३४६ ही मुंबईकडे जाणारी ‘नेत्रावती एक्सप्रेस’ ठोकर ते रत्नागिरी दरम्यान १ घंटा ३० मिनिटे थांबवून ठेवली जाईल. १० ऑक्टोबर या दिवशी मुंबई सी.एस्.एम्.टी. ते मडगाव दरम्यान धावणारी जनशताब्दी एक्सप्रेस (१२०५१) खेड ते चिपळूण दरम्यान २० मिनिटे थांबवून ठेवली जाणार आहे.
१२ ऑक्टोबर या दिवशी मडगाव ते कुमठा दरम्यान सकाळी ११ ते दुपारी २ या ३ घंट्यांच्या कालावधीत ‘मेगाब्लॉक’ घेतला जाणार आहे. या दरम्यान मंगळुरू सेंट्रल ते मडगाव दरम्यान धावणारी ०६६०२ ही विशेष गाडी मंगळुरू ते कुमठा या दरम्यान चालवली जाईल. पुढे कुमठा ते मडगाव दरम्यान ती रहित केली जाणार आहे. तसेच मडगाव ते मंगळुरू दरम्यान धावणारी ०६६०१ ही विशेष गाडी कुमठा ते मंगळुरू अशी चालवली जाईल. मडगाव ते कुमठा दरम्यान ही गाडी रहित केली जाणार आहे.