लोटे-परशुराम औद्योगिक वसाहतीतील ‘स्पेक्टर केमिकल’ला आग
खेड – तालुक्यातील लोटे-परशुराम औद्योगिक वसाहतीतील ‘स्पेक्टर केमिकल प्रा. लि.’ या आस्थापनाला आग लागून आर्थिक हानी झाल्याची घटना ९ ऑक्टोबरच्या दुपारी १२.३० वाजता घडली. अनुमाने २ घंट्यांनी आग आटोक्यात आणण्यात यश आले.
या आस्थापनाच्या बाहेर ठेवण्यात आलेल्या पिंपामधील पदार्थाने अचानक पेट घेतला. त्यानंतर बाजूच्या सर्वच पिंपाना आग लागली. या आगीचे वृत्त कळताच वसाहतीतील अग्नीशमन दल, खेड नगर परिषदेचा बंब आणि लोटे परिसरातील खासगी पाण्याचे टँकर यांच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
या आगीत या आस्थापनातील यंत्र सामुग्री आणि इमारतीची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.