इस्रायलकडून हमासची ५०० ठिकाणे नष्ट !

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाचा तिसरा दिवस

तेल अवीव (इस्रायल) – इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध तिसर्‍या दिवशीही मोठ्या स्तरावर चालू होते. हमासकडून इस्रायलवर तिसर्‍या दिवशी १०० रॉकेट डागण्यात आल्याचे सांगितले जात आहे, तर इस्रालयकडूनही गाझा पट्टीत घुसून आक्रमण केले जात आहे. यात आतापर्यंत इस्रायलमधील ७०० जणांचा मृत्यू, तर  सहस्र १०० नागरिक घायाळ झाले आहेत, तसेच पॅलेस्टाईनमधील ४१५ हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून २ सहस्रांहून अधिक लोक घायाळ झाले आहेत. हमासचे अनेक तळ उद्ध्वस्त केल्याचा दावा इस्रायलने केला आहे. हमासचे ५०० हून अधिक ठिकाणी नष्ट करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

इस्रायलने केवळ गाझा पट्टीत हमासची ४२६ ठिकाणे उद्ध्वस्त केली आहेत. त्याच वेळी २९ हून अधिक क्षेत्रे हमासच्या सैनिकांच्या नियंत्रणातून मुक्त केली आहेत. इस्रायलमधून २०० लोकांचे अपहरण केल्याचा दावा हमासने केला आहे. यामध्ये सैनिक, महिला, लहान मुले आणि वृद्ध यांचा समावेश आहे. हमास त्यांना गाझा पट्टीला लागून असलेल्या तळघरांमध्ये ठेवत आहे. हमास या नागरिकांचा मानवी ढाल म्हणून वापर करत आहे, जेणेकरून इस्रायलने आक्रमण केले, तर त्याचेच लोक मारले जातील. इस्रायलच्या कारागृहांत अनुमाने ५ सहस्र २०० पॅलेस्टाईन बंदीवान आहेत.

इस्रायलमधील सर्व १८ सहस्र भारतीय सुरक्षित !

तेल अविवमधील भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलमध्ये १८ सहस्र भारतीय रहातात. सध्या सर्व जण सुरक्षित आहेत. या भारतीय पर्यटकांनी स्वतःला सुरक्षित बाहेर काढण्याचे आवाहन राजदूतांना केले आहे. एअर इंडियाने तेल अविवची सर्व उड्डाणे १४ ऑक्टोबरपर्यंत रहित केली आहेत.

नेपाळच्या ११ हिंदु विद्यार्थ्यांची हत्या

हमासच्या आक्रमणात २४ विदेशी नागरिक ठार झाले आहेत. यात अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, युक्रेन, थायलंड आणि नेपाळ यांचा समावेश आहे. नेपाळच्या १७ पैकी ११ हिंदु विद्यार्थ्यांची हत्या करण्यात आली, तर ४ विद्यार्थी घायाळ झाले आहेत. थायलंडच्या २ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. थायलंडच्या पंतप्रधानांनी म्हटले आहे की, त्यांचे ११ नागरिक हमासने पकडले आहेत.

हमासने ट्रकमधून नेलेला मृतदेह जर्मनीच्या महिलेचा !

हमासच्या आतंकवाद्यांनी ७ ऑक्टोबर या दिवशी एका महिलेचा मृतदेह पिकअप ट्रकमधून नेला होता. या महिलेची ओळख पटली आहे. शानी लोऊक असे तिचे नाव असून ती जर्मन नागरिक होती. ती संगीत उत्सवात सहभागी होण्यासाठी इस्रायलमध्ये आली होती. हमासने येथे आक्रमण करून २६० जणांना ठार मारले, तर काही जणांना बंदी बनवून नेले.