(म्हणे), ‘आम्ही सनातन वगैरे मानत नाही !’-जितेंद्र आव्हाड

सनातन धर्माची कावीळ झालेले आमदार जितेंद्र आव्हाड यांची मुक्ताफळे !

मुंबई – ज्या धर्मामुळे देशात जातीवाद आला, तसेच ज्या धर्मामुळे स्त्रियांना अधिकार मिळाला नाही, तो सनातन धर्म असूच शकत नाही. सनातन हा धर्म नाही, तर हिंदु धर्मातील कट्टरतावादी लोकांचा गट आहे. त्यामुळे हा नवा शब्द कुठून आला ?, हे मला समजत नाही. आम्ही वर्ष २००३ पासून सनातनशी लढाई लढत आहोत, अशी मुक्ताफळे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ९ ऑक्टोबर या दिवशी पत्रकारांशी बोलतांना उधळली. (राष्ट्रवादी काँग्रेससारख्या पक्षांनीच जातीयवाद निर्माण करून वाढवला आहे ! हिंदु धर्मात स्त्रियांना अधिकार नसता, तर जिजामाता, राणी लक्ष्मीबाई आदी निर्माण झाल्या असत्या का ? – संपादक)

ते पुढे म्हणाले की,

१. मला मारण्याचा प्रयत्न झाला. माझ्या घरावर आक्रमण झाले. हे लोक सनातनी होते. (याविषयी जितेंद्र आव्हाड यांच्याकडे पुरावा असेल, तर ते न्यायालयात का गेले नाहीत ? त्यामुळे कुठल्याही निमित्ताने आव्हाड प्रसिद्धीची पोळीच भाजून घेत असतात, हेच पुन्हा पुन्हा लक्षात येते ! – संपादक) हिंदु धर्म ‘वसुधैवकुटुंबकम्’च्या वाटेवर जाणारा आहे. सर्वांना आपले मानणारा आहे. (हे आव्हाड यांनीच समजून घेण्याची आवश्यकता आहे ! – संपादक)

२. सनातनी लोकांनी ५ सहस्र वर्षांपासून लोकांवर अन्याय, अत्याचार आणि त्यांचे शोषण केले आहे. संत तुकाराम महाराज, बुद्ध, महावीर, जैन, बसवेश्‍वर, सावता माळी आदींना कुणी छळले असेल, तर ते सनातनी लोकांनी. (अशी वक्तव्ये करून आव्हाड हेच जाती आणि पंथ यांत फूट पाडत आहेत ! – संपादक)  

३. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सनातन्यांनी नाकारला होता. संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या आई-वडिलांनी सनातन्यांमुळे आत्महत्या केली, तर फुले यांना दगड-धोंडे आणि शेण कुणी मारले ?, तर ते सनातन्यांनी. छत्रपती शाहु महाराजांची हत्या करण्याचा प्रयत्न सनातन्यांनी केला. मोहनदास गांधीची हत्या सनातन्यांनी केली. (व्यापक सनातन हिंदु धर्माला संकुचित करून आव्हाड ब्राह्मणद्वेष पसरवत नाहीत का ? – संपादक)

संपादकीय भूमिका

आव्हाड यांच्या मानण्यावर आणि न मानण्यावर सनातन हिंदु धर्म थोडीच अवलंबून आहे ? सहस्रो वर्षांपासून पृथ्वीवर राज्य केलेल्या आणि आजही विदेशात मोठ्या प्रमाणात आचरण होत असलेल्या सनातन धर्माविषयीच्या आव्हाड यांच्या द्वेषपूर्ण वक्तव्यांना विचारतो कोण ?