लोकांवर महागडे उपचार घेण्याची वेळ आणू नका ! – गोवा खंडपिठ
गोवा खंडपिठाचे सरकारला निर्देश
पणजी, ८ ऑक्टोबर (वार्ता.) – राज्यातील शासकीय रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे या ठिकाणी चांगल्या वैद्यकीय सुविधा पुरवण्यात याव्यात. लोकांवर महागडे उपचार घेण्याची वेळ आणू नका, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने राज्य सरकारला दिले आहेत. हा निवाडा न्यायमूर्ती जी.एस्.कुलकर्णी आणि न्यायमूर्ती भारत देशपांडे या द्विसदस्यीय खंडपिठाने नुकताच दिला आहे. प्रकाश सरदेसाई आणि विश्वेश सरदेसाई या पिता-पुत्रांनी वर्ष २००७ मध्ये प्रविष्ट केलेल्या एका याचिकेवर निर्णय देतांना खंडपिठाने हे निर्देश दिले आहेत.
१. या प्रकरणी आरोग्य सचिव, आरोग्य सेवा संचालनालयाचे संचालक, गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, गोवा वैद्यकीय मंडळ आणि भारतीय वैद्यकीय मंडळ यांना प्रतिवादी बनवण्यात आले होते. प्रकाश सरदेसाई यांचा मुलगा विश्वेश सरदेसाई याचा वर्ष २००७ मध्ये अपघात झाला होता. शासकीय रुग्णालयात चांगल्या सुविधा नसल्याने त्याला महागड्या रुग्णालयात उपचार घ्यावे लागले होते. सामान्य नागरिकांना महागड्या रुग्णालयात उपचार घेणे परवडणारे नाही. त्यामुळे नागरिकांना शासकीय रुग्णालयात चांगले उपचार आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध पुरवाव्यात, अशी मागणी करणारी याचिका खंडपिठात प्रविष्ट झाली होती.
२. याचिकेची गंभीर नोंद घेऊन खंडपीठाने राज्य सरकारकडून वैदकीय आणि इतर सुविधा यांविषयी अहवाल मागितला होता. या प्रकरणी खंडपीठाने ज्येष्ठ अधिवक्ता सरेश लोटलीकर यांची ‘अॅमिकस क्युरी’ (न्यायमित्र) म्हणून नेमणूक केली होती.
३. खंडपिठात ही याचिका प्रविष्ट झालेली असतांना सरकारने रुग्णालयासंबंधी विविध समित्या स्थापन करून वैद्यकीय सेवेची देखरेख आणि इतर प्रश्न मार्गी लावले. गोवा खंडपिठाने ज्येष्ठ अधिवक्ता जे.इ. कोएल्हो पेरेरा यांची आयुक्त म्हणून नियुक्ती करून कार्लुस फेरेरा आणि रायन मिनिझीस यांचा आयोग स्थापन केला. या आयोगाने राज्यातील सरकारी रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे यांची पहाणी करून वैद्यकीय सेवा आणि सुविधा यांसंबंधी निराशाजनक स्थिती खंडपिठासमोर मांडली. निवड्यात खंडपिठाने ‘चांगले आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. चांगल्या आरोग्याविना जीवन हे केवळ दु:खाची अवस्था आहे’, असे निरीक्षण नोंदवले आहे.
या खंडपिठाने सरकारला पुढील निर्देश दिले.
१. राज्यातील सर्व सरकारी रुग्णालये आणि आरोग्य सेवा केंद्रे येथे औषधांचा पुरवठा आणि देखरेख करण्यासाठी पद्धतशीर यंत्रणा चालू करावी. २. वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, इतर ‘पॅरामेडिकल’ कर्मचारी आणि इतर पदे रिक्त राहू देऊ नयेत. या पदांचे वेळोवेळी पुनरावलोकन करून आवश्यकतेनुसार संख्या वाढवावी. ३. शस्त्रक्रिया विभाग, बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) आणि प्रभाग यांमध्ये आवश्यक वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करावी, तसेच त्यांची वेळोवेळी दुरूस्ती करून ती योग्य स्थितीत ठेवावीत. ४. उपकरणे आणि इतर तातडीची आवश्यक देखभाल, विशेष औषधे, तसेच अत्यावश्यक औषधे यांसाठी आर्थिक तरतूद करावी. ५. गरीब, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, महिला आणि मुले यांच्यासाठी विशेष सुविधा निर्माण करावी. ६. सरकारी रुग्णालयांद्वारे दिल्या जाणार्या वैद्यकीय सेवा किंवा उपचार आणि तज्ञांची नावे, तसेच इतर माहिती संकेतस्थळावर किंवा भ्रमणभाषवरील अॅपवर उपलब्ध करावी. ७. विशेष विभाग स्थापन करून केंद्र सरकारच्या आरोग्य कल्याण सेवा उपलब्ध कराव्यात. या विभागाच्या माध्यमातून सरकारच्या वैद्यकीय सेवेचा लाभ उपलब्ध करून द्यावा. ८. कार्यरत असलेल्या विविध समित्या, सल्लागार मंडळ यांच्या व्यतिरिक्त आरोग्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली, आरोग्य संचालक, दोन्ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, तसेच अशासकीय संस्थेचे सदस्य यांची कायमस्वरूपी समिती स्थापन करून सरकारी रुग्णालये आणि इतर आरोग्य केंद्रे यांची पहाणी करून त्यांच्याकडून चांगल्या वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी शिफारसी घ्याव्यात. ९. तक्रार आणि निवारण कक्ष स्थापन करून वेळोवेळी त्या निकाली काढाव्यात. |