इस्रायलच्या ‘आयर्न डोम’ने (अण्वस्त्रविरोधी यंत्रणेने) केलेले कार्य आणि सरकारने केलेल्या उपाययोजना !
‘इस्रायलच्या दक्षिण-पश्चिम भागात गाझा पट्टी हा एक संघर्षमय प्रदेश आहे. पॅलेस्टाईनच्या २ विभक्त भागांपैकी हा एक तुलनेने बराच लहान भाग आहे. हा प्रदेश ‘हमास’ या इस्लामिक आतंकवादी संघटनेच्या कह्यात आहे. ७ ऑक्टोबर २०२३ या दिवशी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास हमासचे शेकडो आतंकवादी गाझा पट्टीला लागून असलेल्या इस्रायलमधील काही गावांत इस्रायली सीमाकवच तोडून घुसले. काही आतंकवादी सीमेवरील भक्कम कुंपण बुलडोझरने तोडून, काही ‘पॅराग्लायडर’ने हवेतून, तर काही समुद्रमार्गे इस्रायलच्या सीमेत घुसले. त्याच वेळी हमासने गाझामधून सीमावर्ती भागासह रेहोवोत, तेल अविव आणि जेरुसलेम या मध्य इस्रायलमधील शहरांवर रॉकेट्स डागली. अशा प्रकारे सीमावर्ती भागांत आतंकवाद्यांची इस्रायलमध्ये घुसखोरी आणि उर्वरित इस्रायली शहरांवर गाझामधून रॉकेट्स अशा २ आघाड्यांवर हमासने इस्रायलवर आक्रमण केले.
१. ‘आयर्न डोम’ या प्रणालीने ९० टक्के रॉकेटस् हवेतच नष्ट केली ! :
‘हमासने सकाळी ७ वाजल्यापासून एकूण ५ सहस्र रॉकेट्स डागले’, असे वृत्त प्रसारित झाले असले, तरी एवढी रॉकेट्स एकाच वेळी डागण्यात आलेली नाहीत, ही वस्तूस्थिती आहे. ती सकाळी ७ ते ११ या वेळेत टप्पाटप्प्याने डागण्यात आली. असे असले, तरी जगात एकट्या इस्रायलकडे असलेल्या ‘आयर्न डोम’ने या ५ सहस्र रॉकेट्सपैकी ९० टक्के रॉकेट्स हवतेच रोखून ते नष्ट केले. जसे रामायण किंवा महाभारत या मालिकांमध्ये दाखवले जायचे की, रावणाने किंवा कौरवांनी सोडलेल्या बाणाचा रामाने किंवा पांडवांनी मारलेल्या बाणाने हवेतच अचूक वेध घेतला, अगदी तसेच ही ‘आयर्न डोम’ प्रणाली कार्य करते. संपूर्ण इस्रायलमध्ये ही यंत्रप्रणाली कार्यरत आहेे. उरलेले १० टक्के रॉकेट्स काही ठिकाणी इमारती आणि गाड्या यांवर पडले.
ही यंत्रप्रणाली तंत्रज्ञानाने एवढी समृद्ध आहे की, उजाड माळरानावर लोकसंख्या नसलेल्या भागांत रॉकेट्स पडत असेल, तर तेथील रॉकेट्सचा वेध घेतला जात नाही. गाझाकडून येणार्या रॉकेट्सची अवघ्या काही सेकंदात दिशा बघून त्या दिशेने ‘आयर्न डोम’मधून प्रतिक्षेपणास्त्र सोडून ते रॉकेट हवेतच निष्प्रभ केले जाते. यासह ज्या भागाकडे रॉकेट जात आहे, त्या भागातील ‘सायरन’ (धोक्याची घंटा) वाजतात, जेणेकरून त्या भागांतील लोक जवळच्या ‘शेल्टर’मध्ये (शेल्टर म्हणजे रॉकेटपासून बचाव करणारी जागा) सुरक्षितपणे आश्रय घेऊ शकतात. ‘आयर्न डोम’च्या कार्यप्रणालीमध्ये चुकून काही बिघाड झाल्यास लोकांना रॉकेटपासून दुखापत होणार नाही, अशी ही दुहेरी भक्कम व्यवस्था अस्तित्वात आहे.
२. इस्रायल सरकारने केलेल्या उपाययोजना :
अ. ७ ऑक्टोबर या दिवशी सकाळी सीमेवर हा प्रकार चालू झाल्यावर प्रारंभी गाफील असलेल्या इस्रायली सैन्याला परिस्थितीचे अनुमान यायलाच वेळ लागला. त्यात सुट्ट्यांमुळे बरेच सैनिक रजेवर होते. दक्षिणेत तर नगण्य कुमक होती. ‘घराबाहेर आतंकवादी मुक्तपणे फिरत आहेत आणि गोळीबार करत आहेत’, असे २२ गावांतून पीडित लोकांनी सैन्याला भ्रमणभाष करून माहिती दिली. प्रत्यक्षात परिस्थिती समजून घेऊन आणि बचाव योजना आखून देशाच्या दुसर्या भागांतून दक्षिणेत कुमक नेईपर्यंत इस्रायली सरकार अन् सैन्य यांना किमान ७ घंटे लागले. एवढ्या वेळात दक्षिण इस्रायलमध्ये प्रचंड हानी झाली होती.
आ. यानंतर सरकारने घुसखोरी केलेल्या आतंकवाद्यांना कंठस्नान घालून अडकलेल्या नागरिकांना सोडवणे, तसेच गाझामधील हमासच्या आतंकवादी तळांवर हवाई दलाद्वारे प्रतिआक्रमण चालू केले.
इ. इस्रायलमधील प्रत्येक नागरिकाला सैनिकी प्रशिक्षण दिले जात असल्याने सहस्रो नागरिकांना या कारवाईसाठी बोलावण्यात आले.
ई. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांनी एकत्रित येऊन परिस्थिती प्रभावीपणे हाताळण्यासाठी एक ‘आपत्कालीन सरकार’ बनवले आहे. (असे भारतात झाल्याचे कधी ऐकले आहे का ? उलट विरोधी पक्षाचे लोकप्रतिनिधी सरकारवर आगपाखड करण्यात धन्यता मानतात, तर काही धर्मांधांना कायदा-सुव्यवस्था बिघडवण्यास उत्तेजन देतात ! – संपादक)
उ. इस्रायल गाझाला अन्न, पाणी आणि वीज पुरवतो. तो पुरवठा तूर्तास तरी पूर्णपणे बंद केला आहे. इस्रायल करत असलेल्या हवाई आक्रमणांमुळे गाझामधील सामान्य नागरिकांना इस्रायली पंतप्रधानांनी गाझा सोडून दुसर्या देशांमध्ये जायला सांगितले आहे.
३. इस्रायली यंत्रणेचे अपयश काय ? :
इस्रायली सैन्याने वेळोवेळी अशा धोक्याची जाणीव करून देऊनही इस्रायली सरकारने एवढ्या मोठ्या गंभीर गोष्टीत गाफील रहाणे, ‘मोसाद’ या जगप्रसिद्ध गुप्तचर यंत्रणेलाही या आतंकवादी आक्रमणाची सुतराम कल्पना नसणे, सीमेवर असलेले ‘सेन्सर्स’ आणि ‘इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स सिस्टिम’ निष्क्रिय होणे, गाझासारख्या घातकी सीमेवर सैन्य रणगाडे असूनही त्यावर पुरेसे सैनिक तैनात नसणे, तसेच घरांमध्ये आतंकवादी घुसल्यावर लोकांनी साहाय्यासाठी भ्रमणभाषद्वारे कळवूनही बचावकार्याला पोचण्यासाठी तब्बल ७ घंटे लागणे, हे सर्व इस्रायलसारख्या देशासाठी लाजिरवाण्या गोष्टी आहेत. त्यावर यथावकाश येथील सरकार, सैन्य आणि जनता कार्यवाही करील, यात शंकाच नाही. आता या क्षणाला मात्र कुणीही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप न करता सर्व जण एकत्र येऊन पुढील कार्यवाही करण्यावरच लक्ष केंद्रित करत आहेत, हे भारतियांनी शिकण्यासारखे आहे.’
– समता गोखले-दांडेकर, इस्रायल (८.१०.२०२३)
इस्रायलवर आक्रमणासाठी ७ ऑक्टोबर हा दिवसच का निवडला ?‘५० वर्षांपूर्वी, म्हणजेच ६ ऑक्टोबर १९७३ या दिवशी इजिप्त आणि सीरिया या दोन्ही देशांनी समन्वयाने इस्रायल गाफील असतांना त्याच्यावर असेच आक्रमण केले होते. त्या वेळी इस्रायलने एकाच वेळी सीरियाशी उत्तर सीमेवर, तर इजिप्तशी दक्षिण सीमेवर युद्ध लढले होते. ते युद्ध साधारण अडीच आठवडे चालले. त्या वेळी गोल्डा मायर या इस्रायलच्या पंतप्रधान होत्या. या युद्धता अंतिमतः इस्रायलनेच विजय मिळवला होता, हा इतिहास आहे. हे युद्ध ‘योम किप्पूर युद्ध’ म्हणून इस्रायलमध्ये ओळखले जाते. त्याच दिवसाचे निमित्त आणि इस्रायल गाफील असण्याची तशीच संधी साधत ७ ऑक्टोबरच्या दिवशीच पुन्हा असे आक्रमण केले गेले’, असे तज्ञांनी सांगितले.’ – समता गोखले-दांडेकर |