‘शिवशौर्य यात्रे’च्या माध्यमातून तरुणांमध्ये शौर्य जागृतीचे कार्य ! – गणेश नाईक, आमदार, भाजप
नवी मुंबई – ‘शिवशौर्य यात्रे’च्या माध्यमातून तरुणांमध्ये शौर्य जागृतीचे कार्य होत आहे, असे प्रतिपादन भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी वाशी येथे केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाली आहेत. राज्याभिषेक आणि विश्व हिंदु परिषदेचे हिरक महोत्सवी वर्ष यानिमित्ताने बजरंग दल कोकण प्रांताच्या वतीने काढण्यात आलेल्या शिवशौर्य यात्रेचे नवी मुंबईमध्ये आगमन झाले. वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या यात्रेचे स्वागत करण्यात आले. या वेळी गणेश नाईक बोलत होते.
या प्रसंगी नवी मुंबईचे भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते दशरथ भगत यांच्यासह बजरंग दलाचे पदाधिकारी, विश्व हिंदु परिषदेचे कार्यकर्ते आणि शिवप्रेमी पुष्कळ संख्येने उपस्थित होते.
‘सिंधुदुर्ग ते मुंबई’ अशी ही यात्रा निघाली असून १५ ऑक्टोबर या दिवशी दादर येथील शिवाजी पार्कमध्ये यात्रेचा समारोप होणार आहे. या वेळी होणार्या सभेला विश्व हिंदु परिषदेचे संयुक्त महामंत्री सुरेंद्र जैन संबोधित करणार आहेत.गणेश नाईक पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आणि कार्य शिवशौर्य यात्रेच्या माध्यमातून सर्व घटकांपर्यंत पोचवण्याचे काम केले जात आहे. तरुण पिढीला महाराजांच्या जाज्वल्य शौर्याच्या इतिहासातून प्रेरणा मिळणार आहे. विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीयमंत्री गोविंदराव शेंडे यांनी अशा प्रकारच्या २५० यात्रा संपूर्ण देशामध्ये काढण्यात आल्याचे सांगितले.