सनातन धर्म नष्ट करण्याची भाषा करणार्यांच्या मनात सनातनी हिंदूंचा वंशविच्छेद हेच ध्येय ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था
जळगाव येथे पत्रकार परिषद !
जळगाव – तमिळनाडूतील द्रविड मुन्नेत्र कळघम् (द्रविड प्रगती संघ)चे नेते उदयनिधी स्टॅलीन यांनी सनातन धर्माविषयी द्वेषमूलक विधान केले. सनातन धर्माची तुलना संसर्गजन्य रोगाशी करून ते थांबले नाहीत, तर सनातन धर्म नष्टच करून टाकण्याची इच्छाही त्यांनी उघडपणे मांडली. हे वक्तव्य हिंदु धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावणारे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ‘हेट स्पीच’ (द्वेषपूर्ण भाषण) होते. धर्म नष्ट करण्याची भाषा करणार्यांच्या मनामध्ये धार्मिक समुहाचा वंशविच्छेद हेच ध्येय आहे. यासाठी महाराष्ट्रातील सनातनधर्मीय हिंदु समाजाने सजग होण्याची आणि लोकशाही मार्गाने या सनातन धर्मविरोधी वक्तव्यांचा प्रतिवाद करण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शहरातील पद्मालय विश्रामगृह येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या परिषदेला सनातन संस्थेचे सद़्गुरु नंदकुमार जाधव आणि समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर यांनी संबोधित केले.
सनातन धर्म हा कर्तव्यांशी संबंधित धर्म ! – सद़्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था
सनातन धर्म हा केवळ पूजा-परंपरेशी संबंधित नाही, तर कर्म-कर्तव्यांशीही संबंधित आहे. गृहस्थ व्यक्तीसाठी वृद्ध माता-पित्याची सेवा आणि अपत्यांचा सांभाळ हा गृहस्थ धर्म आहे. दुकानदारांसाठी ग्राहकहित, डॉक्टरांसाठी रुग्णांचे स्वास्थ्यरक्षण हा धर्म आहे. हा धर्म शाश्वत आहे; कारण तो अमेरिकेत आणि जळगाव येथे एकच आहे अन् १०० वर्षांपूर्वी आणि १०० वर्षांनंतरही हेच कर्तव्य कर्म कायम रहाणार आहे. थोडक्यात सनातन धर्म स्थळ, काळ बंधन नसलेला चिरंतन असा आहे. त्याला नष्ट करणे, म्हणजे कर्तव्यहीन समाज उत्पन्न करून सामाजिक अराजक उत्पन्न करण्याप्रमाणे आहे.
जळगाव जिल्ह्यात ५ तालुक्यांतून तक्रारी प्रविष्ट करणार ! – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती
सनातन धर्म नष्ट करण्याची भाषा करणार्यांच्या विरोधात सध्या समविचारी संघटनांच्या वतीने जागृतीपर सनातन धर्मरक्षण अभियान राबवण्यात येत आहे. या अंतर्गत जागृतीसमवेत धर्मविरोधी शक्तींचा लोकशाही मार्गाने विरोधही केला जाणार आहे. जळगाव जिल्ह्यात जळगावसह भुसावळ, चोपडा, यावल, रावेर या ५ तालुक्यांत सनातन धर्माच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्ये करणार्यांच्या विरोधात तक्रारी प्रविष्ट करण्यात येणार आहेत.
‘धर्म नष्ट होऊ शकत नाही’, हे सनातन सत्य ! – चेतन राजहंसमहाराष्ट्रातील पत्रकार निखिल वागळे यांनी ‘उदयनिधी स्टॅलीनच्या मताशी मी सहमत आहे. सनातन धर्म हा एखाद्या रोगासारखा असून या धर्माची उत्पत्ती असलेल्या सनातन संस्थेकडे बघा’, अशी पोस्ट (लिखाण) फेसबुकद्वारे केली. हा एकप्रकारे सनातन धर्माचा अवमान आहे आणि सनातन संस्थेची मानहानी होय. महाराष्ट्रातील नास्तिकतावाद्यांच्या हत्येचा संबंध धार्मिक संस्थांशी जोडून निरपराध्यांना अडकवण्याचे कारस्थान रचणार्यांमध्ये निखिल वागळे अग्रणी होते. सहिष्णुतेची प्रवचने झोडून ‘पुरस्कारवापसी’ करणार्या संधीसाधू साहित्यिकांच्या टोळीचे ते भक्त आहेत. ही ‘पुरस्कारवापसी टोळी’ उदयनिधी स्टॅलीनच्या विधानावर चकार शब्द काढायला सिद्ध नाही. ‘धर्म नष्ट होऊ शकत नाही’, हे सनातन सत्य आहे. |