इस्रायल आणि हमास यांचे युद्ध थांबवण्‍यासाठी जगाने प्रयत्न करावा !

‘इस्रायल आणि पॅलेस्‍टाईनची ‘हमास’ ही आतंकवादी संघटना यांच्‍यामध्‍ये एक मोठे युद्ध चालू झाले आहे. हमासचे शेकडो आतंकवादी इस्रायलमध्‍ये घुसले आहेत आणि त्‍यांनी इस्रायलवर ५ सहस्र रॉकेटच्‍या साहाय्‍याने आक्रमण केले आहे. त्‍यामुळे इस्रायलची हानी झाली आहे. असे समजते की, हमास या आतंकवादी गटाला इराणचा पाठिंबा आहे. हे युद्ध थांबवण्‍यासाठी सौदी अरेबिया आणि अन्‍य देश प्रयत्न करत आहेत; परंतु ना हमास ऐकायला सिद्ध आहे ना इस्रायल. इस्रायल हे त्‍याचे हवाई दल, कमांडो आदी सर्व शस्‍त्रे आणि पारंपरिक सैन्‍य यांचा वापर करून हमासच्‍या तळांवर आक्रमणे करत आहे. त्‍यामुळे प्रचंड भीतीदायक हिंसाचार आणि मोठी हानी होत आहे. पर्यायाने परत एकदा जग एका मोठ्या युद्धामध्‍ये लोटले जाईल; कारण ना इस्रायल थांबायला सिद्ध आहे, ना हमास थांबायला सिद्ध आहे. यापुढे परिस्‍थिती कशी निर्माण होते, हे सांगता येत नाही. या युद्धामुळे हमासच्‍या नागरिकांचीही हानी होईल. त्‍यामुळे शक्‍य झाल्‍यास हे युद्ध थांबवण्‍यासाठी जगाने लगेच प्रयत्न केला पाहिजे.

ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)

इस्रायल-हमास युद्ध हे तिसर्‍या महायुद्धाचा एक भाग

तिसरे महायुद्ध चालूच आहे. सध्‍या अमेरिका आणि चीन यांच्‍यात आर्थिक युद्ध चालू आहे. सध्‍या कॅनडाने भारताच्‍या विरोधात चालू केलेला संघर्ष हेही युद्धच आहे. युद्ध केवळ बंदुकीचेच असले पाहिजे, असे नाही. याला आपण ‘बहुआयामी प्रकारचे युद्ध’ म्‍हणू शकतो. इस्रायल-हमास युद्ध भारताच्‍या बाहेर चालू आहेे. यात इराण आणि इस्रायल यांचा पैसा वाया जात आहे. या दोन राष्‍ट्रांच्‍या हानीचा भारतावर काही परिणाम होणार नाही.’

– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे. (७.१०.२०२३)