Hamas : कोण आहे इस्रायलवर आक्रमण करणारी ‘हमास’ आतंकवादी संघटना ?
Israel Palestine conflict
पॅलेस्टाईनमधील ‘हमास’ या आतंकवादी संघटनेने गाझा पट्टीवरून इस्रायलवर ७ ऑक्टोबर या दिवशी अचानक ५ सहस्र रॉकेटद्वारे भीषण आक्रमण केले. या आक्रमणानंतर दोन्ही देशांत युद्धाला प्रारंभ झाला आहे. इस्रायलसारख्या देशावर इतक्या मोठ्या प्रमाणात आक्रमण करणारी ‘हमास’ संघटना काय आहे ? तिचा उद्देश काय आहे ? तिला कुणाकडून साहाय्य आणि निधी मिळतो ? याविषयीचा ऊहापोह या लेखात करण्यात आला आहे.
१. ‘हमास’चा उद्देश
‘इस्रायल’ हा वर्ष १९४८ मध्ये स्वतंत्र देश म्हणून स्थापन झाल्यानंतरही पॅलेस्टाईनशी त्यांचा संघर्ष निरंतर चालूच आहे. त्या वेळी इस्रायल राजकीय पातळीवर पॅलेस्टाईनसमोर कमकुवत होत असल्याचे इस्रायलला वाटले. तेव्हा १९७० च्या दशकात इस्रायलने पॅलेस्टिनी नेत्यांच्या विरोधात कट्टरवादी पॅलेस्टिनी संघटना सिद्ध केली. त्याला ‘हरकत अल-मुकावामा अल-इस्लामिया’ (हमास) असे नाव देण्यात आले. ही एक धार्मिक, तसेच पॅलेस्टिनी सुन्नी मुसलमानांची ही एक सशस्त्र आणि कुख्यात संघटना आहे. ‘इस्रायल शासनाला हटवून तेथे इस्लामी शासन निर्माण करणे’, हा या संघटनेचा मुख्य उद्देश आहे. हमासची औपचारिक स्थापना वर्ष १९८७ मध्ये झाल्याचे मानले जाते. हमास ही पॅलेस्टाईनमधील इस्लामिक चळवळ आहे.
२. शियापंथीय इराणचा पाठिंबा !
वर्ष १९८७ मध्ये पहिल्या ‘पॅलेस्टिनी इंतिफादा (उठाव)’च्या वेळी या संघटनेची स्थापना झाली. या संघटनेला शियापंथीय इराणचा पाठिंबा आहे. हमास ही संघटना १९२० च्या दशकात इजिप्तमध्ये स्थापन झालेल्या ‘मुस्लीम ब्रदरहूड’च्या इस्लामी विचारसरणीला मानते. पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्या नेतृत्वाखालील ‘फतह चळवळी’शी एकनिष्ठ असलेल्या सैन्याशी गृहयुद्ध केल्यानंतर गाझा पट्टीवर हमासने वर्चस्व स्थापन केले. वर्ष २००६ मध्ये पार पडलेल्या पॅलेस्टिनी संसदीय निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर वर्ष २००७ मध्ये हमासने गाझा पट्टी कह्यात घेतली आहे.
३. हमासचा ‘ओस्लो शांतता करारा’ला विरोध !
हमास आणि इस्रायल यांच्यामध्ये अनेकदा संघर्षाची ठिणगी पडली आहे. यामध्ये बर्याच वेळा हमासने गाझामधून इस्रायलवर रॉकेटद्वारे आक्रमणे केली, तर इस्रायली सैन्यांनी हवाई आक्रमणांद्वारे गाझावर बाँबफेक केली. वास्तविक गाझा पट्टी हा इस्रायलचा प्रदेश आहे. हमासने गाझा पट्टीला ‘इस्रायलचे राज्य’ म्हणून मान्यता देण्यास विरोध केला आहे. १९९० च्या दशकात इस्रायल आणि ‘पॅलेस्टाईन लिब्रेरेशन ऑर्गनायझेशन’ने (‘पी.एल्.ओ.’ने) केलेल्या ‘ओस्लो शांतता करारा’ला हमासने हिंसक विरोध केला होता.
४. आतंरराष्ट्रीय स्तरावर ‘हमास’ आतंकवादी संघटना म्हणून घोषित !
‘इज्ज अल-दीन अल-कासम ब्रिगेड’ ही हमासची सशस्त्र संघटना आहे. या संघटनेद्वारे बंदूकधारी लोक आणि आत्मघाती बाँबर्स इस्रायलमध्ये पाठवले जातात. यामुळे इस्रायल, अमेरिका, युरोपियन युनियन, कॅनडा, इजिप्त आणि जपान यांनी हमासला ‘आतंकवादी संघटना’ म्हणून घोषित केले आहे. गाझा हा हमासचा बालेकिल्ला; पण पॅलेस्टाईनमधील इतरही काही प्रदेशात, तसेच कतारसह मध्य पूर्वेतील देशांमध्येही हमासचे समर्थक पसरलेले आहेत.
५. हमासला शस्त्रे आणि अर्थपुरवठा कुणाकडून ?
हमासला तुर्कीये आणि कतार या देशांकडून निधी मिळतो. हमासचा नेता खालेद मेशाल याने कतारमध्ये कार्यालय उघडले. इराण हमासला शस्त्रे आणि पैसाही पुरवतो. इराण हा शिया देश, तर अरब जग सुन्नी आहे. हमासमध्ये अनुमाने २७ सहस्र आतंकवादी असून ते ६ प्रादेशिक ब्रिगेडमध्ये विभागले गेले आहेत. इस अद-दीन अल कासिम हे हमासच्या लष्करी शाखेचे प्रमुख आहेत. हमासच्या राजकीय विभागाचे प्रमुख इस्माईल हानिया, तर मुसा अबू मारझूक दुसर्या क्रमांकावर आहेत. आंतरराष्ट्रीय घडामोडींसाठी ते ‘मुस्लिम ब्रदरहूड’वर अवलंबून आहेत. हमासची एक सामाजिक शाखाही आहे. आतापर्यंतचा इतिहास पहाता इस्रायलच्या सत्तेमुळे हमासला आता फारसे साहाय्य मिळत नाही आणि प्रत्येक वेळी हमासची मोठ्या प्रमाणात हानी होते.
(‘सनातन प्रभात’च्या संपादकीय विभागाने या लेखातील सर्व माहिती विविध विश्वासार्ह संकेतस्थळांवरून संकलित केली आहे, याची नोंद घ्यावी.)