मुंबई येथे काकांचे श्राद्धविधी करतांना श्री. सिमित सरमळकर यांना आलेले अनुभव !
१. काकांचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या मित्रांनी दहाव्या दिवशी विधी करण्याऐवजी अंधशाळेला पैसे दान देण्याचे सुचवणे; पण साधकाने कुटुंबियांना समजावून सांगितल्यावर ते विधी करण्यास सिद्ध होणे
‘माझ्या काकांचा जुलै २०२२ मध्ये मृत्यू झाला होता. तेव्हा काकांच्या जवळच्या मित्रांनी सांगितले, ‘दहाव्या दिवशी विधी करण्याची आवश्यकता नाही. त्या ऐवजी कुठल्यातरी अंधशाळेला पैसे दान केले, तरी चालेल’; पण मी दहाव्या दिवसाचा विधी करण्याचे महत्त्व घरातील इतरांना सांगितल्यावर ते विधी करण्यास सिद्ध झाले.
२. विधी करणार्या पुरोहितांनी ‘मृत व्यक्तीचा दहाव्याचा विधी करावा कि दानधर्म करावे ?’ याविषयी न सांगणे
आम्ही तो विधी करण्यासाठी दादर, मुंबई येथे गेलो होतो. तेव्हा विधी करणार्या पुरोहितांना मी वरील प्रसंग सांगून ‘मृत व्यक्तीचा दहाव्याचा विधी करण्याऐवजी दानधर्म करणे कितपत योग्य आहे ?’, असे विचारले. तेव्हा त्यांनी याविषयी काही सांगण्याचे टाळले. या प्रसंगात पुरोहितांनी दहाव्याचे विधी करण्यासाठी प्रेरणा द्यायला हवी होती आणि ‘हिंदु धर्मात सांगितलेले विधी करणे कसे योग्य आहे ?’, हे सांगायला हवे होते, असे मला वाटले; परंतु त्यांनी तसे काही सांगितले नाही.
३. श्राद्धविधी चालू असतांना त्याकडे घरातील मंडळींचे लक्ष नसणे आणि पिंड समुद्रात भावपूर्णपणे विसर्जन न करणे
श्राद्धविधी चालू असतांना घरातील इतर लोक एकमेकांशी बोलत होते. श्राद्धविधीकडे कुणाचे लक्ष नव्हते. पिंड विसर्जन करण्यासाठी समुद्रावर गेल्यावर माझ्यासमवेत जी व्यक्ती होती, ती मूळची गावाकडची होती. ‘त्यांना प्रथा परंपरा सर्व ठाऊक असतील’, असे मला वाटले; पण प्रत्यक्षात त्यांनी पिंड पिशवीसहित पाण्यात फेकून दिले.
४. कावळ्याने घासाला स्पर्श न करणे; परंतु श्री दत्तात्रेय आणि मृत व्यक्तीचा आत्मा यांना प्रार्थना केल्यावर कावळ्याने अन्नाला स्पर्श करणे
बाराव्या दिवशी विधीच्या वेळी कावळ्याला घास ठेवला. तेव्हा तिथे कावळा आला होता; पण तो त्या घासाला स्पर्श करत नव्हता. तेव्हा मी सर्वांना ‘मृत झालेल्या काकांच्या आत्म्याला गती मिळावी आणि या विधीतील अडथळे दूर व्हावेत’, अशी दत्तात्रेयाच्या चरणी प्रार्थना करण्यास सांगितले, तसेच मी मृत झालेल्या काकांच्या आत्म्यालाही ‘तुम्ही अन्न ग्रहण करा. आमचे काही चुकले असेल, तर आम्हाला क्षमा करा,’ अशी प्रार्थना करण्यास सांगितले. सर्वांनी मनापासून प्रार्थना केल्यानंतर कावळ्याने अन्न ग्रहण केले. ‘प्रार्थना करणे’, हा भाग मला धर्मशिक्षणातून शिकायला मिळाला.
५. वरील प्रसंगामुळे ‘आज समाजाला धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे ?’, हे माझ्या लक्षात आले.
हा लेख लिहिण्यासाठी गुरुदेवांनीच मला सुचवले आणि लिहून घेतला, त्याबद्दल कोटीशः कृतज्ञता !’