श्री. विद्याधर नारगोलकर यांनी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या रौप्य महोत्सवी वर्धापनदिन सोहळ्यात केलेल्या मार्गदर्शनाच्या वेळी साधकांना शिकायला मिळालेली सूत्रे !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला श्री. विद्याधर नारगोलकर यांचा भाव !
१. ‘श्री. नारगोलकरकाकांमध्ये प.पू. गुरुदेवांप्रती (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती) पुष्कळ भाव आहे’, हे अनेकदा लक्षात येते. काका वेळोवेळी प.पू. गुरुदेवांना पत्र पाठवत असतात, तसेच आश्रमातून त्यांच्यासाठी प्रसाद आल्यास त्यांना त्याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटते. तो प्रसाद ते प्रथम देवासमोर ठेवतात आणि नंतर स्वतः घेतात.
२. काही दिवसांपूर्वी काकांनी एक नवीन ग्रंथ लिहिला होता. त्या ग्रंथाची प्रत त्यांनी प.पू. गुरुदेवांना पाठवली होती आणि त्यासाठी त्यांचे कृपाशीर्वादही मागितले होते. त्यावर प.पू. गुरुदेवांनी त्यांना आशीर्वादपर पत्रही पाठवले होते. ते मिळाल्यावर काकांना पुष्कळ कृतज्ञता वाटली.
३. आरंभी परम पूज्य गुरुदेवांनी आपत्काळाच्या दृष्टीने आपल्या घरातील उपलब्ध जागेमध्ये भाजीपाला लावण्याचे प्रयत्न करायला सांगितले होते. हे ज्ञात नसतांना काकांच्या मनामध्ये त्यांच्या घरातील गच्चीत कुंडीमध्ये वांगी आणि अन्य प्रकारच्या भाज्यांची रोपे लावण्याचा विचार आला आणि त्यानुसार त्यांनी कृतीही केली. त्या झाडांची चांगल्या प्रकारे वाढही झाली. काही दिवसांनी काकांनी पुणे जिल्ह्यातील विविध भागांतील साधकांनी परम पूज्य गुरुदेवांच्या मार्गदर्शनानुसार आपापल्या घरांमध्ये केलेल्या लागवडी संदर्भातील लेख वाचल्यानंतर त्यांना ‘मला याविषयी काहीच माहिती नव्हती, तरीही परम पूज्य गुरुदेवांनी माझ्या मनामध्ये त्या संदर्भात विचार घालून त्यानुसार कृती करून घेतली’, या विचाराने पुष्कळ कृतज्ञता वाटली. याविषयी त्यांनी त्यांच्या संपर्कातील साधकांना भ्रमणभाष करून सांगितले. तेव्हा काकांच्या मनातील प.पू. गुरुदेवांप्रतीचा कृतज्ञताभाव व्यक्त होत होता.
४. काका त्यांना भेटायला आलेल्या साधकांना नेहमी म्हणतात, ‘‘प.पू. गुरुदेवांनी सनातनच्या साधकांना चांगले घडवले आहे. त्यामुळे धर्मकार्य करतांना त्यांच्यामध्ये अहं निर्माण होत नाही. याउलट अन्य काही संघटनांमध्ये आपापसांतील अहंभावामुळे धर्मकार्याला अपेक्षित फलनिष्पत्ती मिळत नाही.’’ एकदा काका मला म्हणाले, ‘‘तुम्हाला लहान वयामध्ये धर्मकार्यासाठी अमूल्य मार्गदर्शन आणि दिशादर्शन मिळत आहे. तुम्ही पुष्कळ भाग्यवान आहात. आम्ही तरुण होतो. तेव्हा धर्मकार्य करण्याची आमची पुष्कळ तळमळ होती; परंतु आम्हाला योग्य दिशादर्शन मिळाले नाही. आता माझे वय झाले आहे. त्यामुळे मला काही मर्यादा येत आहेत; पण काही हरकत नाही. जे मी या जन्मात करू शकलो नाही, ते पुढच्या जन्मात करण्याचा नक्की प्रयत्न करीन.’’
– कु. क्रांती पेटकर, पुणे
‘१८.८.२०२३ या दिवशी पुणे जिल्ह्यात साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चा ‘रौप्य महोत्सवी वर्धापनदिन सोहळा’ पार पडला. पुणे येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठानचे महामंत्री श्री. विद्याधर नारगोलकर यांनी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या रौप्य महोत्सवी वर्धापनदिनाच्या सोहळ्यात उपस्थितांना संबोधित केले. या निमित्ताने सनातन संस्थेच्या संत पू. (सौ.) मनीषा पाठक आणि आदरणीय नारगोलकर काकांच्या संपर्कात असलेल्या साधिका यांना काकांकडून शिकायला मिळालेली सूत्रे अन् अनुभूती येथे दिल्या आहेत.
पू. (सौ.) मनीषा पाठक, पुणे
१. सनातन संस्थेच्या कार्यक्रमामध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अपेक्षित असे अभ्यासपूर्ण आणि भावपूर्ण भाषण करणे : ‘आदरणीय श्री. नारगोलकरकाका हे ऋषितुल्य असून ते अनुभवी वक्ते आहेत. ते सनातन संस्थेच्या गुरुपौर्णिमा, सनातन प्रभातचा वर्धापनदिन सोहळा, तसेच अन्य कार्यक्रम यांमध्ये वक्ता म्हणून मार्गदर्शन करतात. ते वक्ता म्हणून संहिता सिद्ध करतांना ती परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अपेक्षित अशी होण्यासाठी प्रयत्न करतात. तिचे ते सखोल चिंतन करतात. त्यांचा गुरुदेवांप्रती उत्कट भाव आहे. त्यामुळे ‘ते करत असलेले मार्गदर्शन ऐकत रहावे’, असे वाटते.
२. श्री. नारगोलकरकाका यांचे मार्गदर्शन ऐकतांना आलेल्या अनुभूती
अ. ‘श्री. नारगोलकरकाका सांगत असलेले प्रत्येक वाक्य उपस्थित जिज्ञासूंच्या अंतर्मनात कोरले जात आहे’, असे जाणवले.
आ. त्या वेळी त्यांच्याभोवती चैतन्याच्या पिवळ्या रंगाचे वलय दिसत होते. त्यांचे मार्गदर्शन होईपर्यंत संपूर्ण वेळ परात्पर गुरुदेवांचे अस्तित्व जाणवत होते.
इ. आदरणीय काकांचा गुरुदेव, सनातन संस्था, ‘सनातन प्रभात’ची नियतकालिके यांच्याविषयी असलेला उत्कट भाव पाहून माझी भावजागृती होत होती.’
कु. क्रांती पेटकर, पुणे
१. तळमळ
१ अ. हिंदु जनजागृती समितीच्या उपक्रमांना आवर्जून उपस्थित रहाणे : ‘श्री. नारगोलकरकाकांचे वय ८१ वर्षे असूनही त्यांची धर्मकार्यात सहभागी होण्याची तळमळ असते. काकांना कोणत्याही धर्मसभा, आंदोलन, दिंडी, मोर्चा किंवा हिंदु जनजागृती समितीच्या उपक्रमांच्या अनुषंगाने कोणत्याही उपक्रमासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये, गुरुपौर्णिमा कार्यक्रमात वक्ता म्हणून मार्गदर्शन करण्यासाठी किंवा सहभागी होण्यासाठी निरोप दिल्यानंतर ते आवर्जून उपस्थित रहातात. वयोमानानुसार माईक धरल्यावर त्यांचा हात थरथरतो. त्यांची चालण्याची क्षमता अधिक नसली, तरी ते शक्य तेवढे अंतर चालतात आणि विषयही मांडतात.
१ आ. धर्मावरील आक्रमणांच्या संदर्भातील धर्मकार्यात सहभागी होण्याची तीव्र तळमळ : ३.३.२०२३ या दिवशी गड-दुर्गांवर होणारे इस्लामिक अतिक्रमण रोखण्यासाठी मुंबई येथे महामोर्चा आयोजित करण्यात आला होता. त्या महामोर्चात ‘मी निश्चित सहभागी होणार आहे’, असे काकांनी आधीच सांगितले, तसेच काका त्या महामोर्चाच्या आयोजनाच्या बैठकीलाही उपस्थित राहिले. पुण्यातून सोबत जाण्यासाठी कुणाचे नियोजन नसल्याने काकांनी एकट्यानेच रेल्वेने मुंबईला जाण्याचे आणि येण्याचे आरक्षण केले. या वेळी काकांचा पाठपुरावा करावा लागला नाही. याउलट ‘काकाच समिती सेवकांना स्वतःहून भ्रमणभाष करून आपले जाण्याचे नियोजन कसे असणार आहे ?’, याविषयी विचारत होते. मी काकांना विचारले, ‘‘मोर्चा दुपारी १२ वाजता असणार आहे. त्यामुळे त्या वेळेत ऊन असेल, तसेच किमान दीड किलोमीटर अंतर चालावे लागणार आहे. मोर्चाच्या ठिकाणी वेळेत पोचण्यासाठी पुण्याहून सकाळी लवकर निघावे लागेल, तर तुम्हाला जमेल का ?’’ त्यावर काका म्हणाले, ‘‘सकाळीच काय ? मी रात्री निघायचे असेल, तरी यायला तयार आहे. मी नक्की येणार आहे.’’ तेव्हा त्यांच्या या उत्तरातून मला त्यांची धर्मकार्यात सहभागी होण्याची तीव्र तळमळ शिकायला मिळाली.
२. दैनिक ‘सनातन प्रभात’चे अभ्यासपूर्ण वाचन करणे
२ अ. दैनिक ‘सनातन प्रभात’मधील महत्त्वाचे लेख इतरांपर्यंत पोचवण्याची धडपड : काका मागील अनेक वर्षांपासून प्रतिदिन त्यांच्या घरी येत असलेल्या दैनिक ‘सनातन प्रभात’मधील प्रत्येक वृत्त आणि प्रत्येक लेख सकाळीच बारकाईने अन् अभ्यासपूर्ण वाचतात. महत्त्वाच्या लेखांची कात्रणे कापून संग्रही ठेवतात. एखाद्या दिवशी दैनिकामध्ये एखादा महत्त्वाचा लेख किंवा बातमी आली असल्यास, ते त्यांच्या संपर्कातील साधकांना भ्रमणभाष करून त्या लेखाची किंवा बातमीची लिंक मागून घेतात आणि ती त्यांच्या संपर्कातील अधिकाधिक जणांना पाठवतात. ‘महत्त्वाचा लेख अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावा’, अशी त्यांची तळमळ असते.
२ आ. परिचयातील अन्य व्यक्तींनाही दैनिक ‘सनातन प्रभात’चे महत्त्व सांगून त्याचे वर्गणीदार होण्यासाठी उद्युक्त करणे : काका त्यांच्या परिचयातील साधकांची एखादी बातमी किंवा लेख दैनिकात छापून आल्यास त्यांना आवर्जून भ्रमणभाष करून त्यांचे कौतुकही करतात. काका त्यांच्या परिचयातील अन्य व्यक्तींनाही दैनिक ‘सनातन प्रभात’चे महत्त्व सांगून त्याचे वर्गणीदार होण्यासाठी उद्युक्त करतात.
२ इ. विविध ग्रंथ आणि महत्त्वपूर्ण विषयांच्या संदर्भातील लेखांची कात्रणे वेळोवेळी सनातनच्या आश्रमात अभ्यासासाठी पाठवणे : काकांचा अनेक ग्रंथ आणि वृत्तपत्रे यांचा अभ्यास आहे. त्यांनी आजपर्यंत अनेक पुस्तके आणि विविध विषयांवरील लेखांचा संग्रह केला आहे. ते त्यांच्याकडील विविध ग्रंथ आणि महत्त्वपूर्ण विषयांच्या संदर्भातील लेखांची कात्रणे वेळोवेळी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात अभ्यासासाठी पाठवत असतात.
३. अल्प अहंभाव
३ अ. स्वतःचे कौतुक न सांगता, सनातनचे साधक आणि सनातन संस्थेचे कार्य यांचे कौतुक करणे : काकांमध्ये अहंभाव कधीच जाणवत नाही. काका वयाने साधकांपेक्षा मोठे आहेत, तसेच त्यांचा धर्मकार्यातील अनुभव आणि अभ्यासही इतरांपेक्षा पुष्कळ अधिक आहे, तरीही ते त्यांच्यापेक्षा वयाने अन् अनुभवानेही लहान असलेल्या साधकांचे नेहमी कौतुक करतात. त्यांच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या सनातनच्या साधकांना आदरार्थी संबोधतात. ते स्वतःचे कौतुक कधीच सांगत नाहीत; उलट प्रत्येक वेळी भेटल्यानंतर ते त्यांना भेटायला आलेल्या साधकांचे आणि सनातन संस्थेच्या कार्याचे, म्हणजे इतरांचे कौतुक करतात.
३ आ. साधकांनी केलेल्या सहकार्याविषयी कृतज्ञताभाव असणे : काकांना एखाद्या कार्यक्रमाच्या ठिकाणी नेण्यासाठी किंवा सोडण्यासाठी एखाद्या साधकाचे नियोजन केल्यास काकांना त्या साधकाविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटते. ‘तुमच्यामुळेच मला या कार्यक्रमाचा लाभ मिळाला’, असा त्यांचा कृतज्ञताभाव असतो.
४. प्रेमभाव
अ. काकांच्या घरी कधी कोणत्याही सेवेच्या निमित्ताने गेल्यास काका आणि काकू (सौ. अरुंधती विद्याधर नारगोलकर [वय ७५ वर्षे]) आलेल्या व्यक्तीला काही ना काही तरी खायला दिल्याशिवाय सोडत नाहीत.
आ. एकदा मी काकांच्या घरी एका सेवेच्या निमित्ताने गेले होते. निघतांना काकांनाही बाहेर जायचे असल्याने तेही माझ्या समवेत घराबाहेर पडले. आम्ही त्यांच्या इमारतीतून खाली उतरल्यानंतर काकांनी ‘समोर असलेल्या दुकानात ‘पॅटीस’ खूप छान मिळतात’, असे सांगून माझ्यासाठी, तसेच घरातल्या प्रत्येकासाठी माझ्यासोबत पॅटिस बांधून दिले. या वेळी काकांची प्रीती अनुभवायला मिळाली.
५. शिकण्याची वृत्ती : काका सतत शिकण्याच्या स्थितीत असतात. ते त्यांच्या संपर्कातील हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना ‘समितीच्या विविध उपक्रमांचे आयोजन, नियोजन, प्रसार कसा केला ?’, याविषयी जिज्ञासेने विचारून घेतात.
गुरुदेवांच्या कृपेमुळे आदरणीय नारगोलकर काकांकडून पुष्कळ शिकायला मिळत आहे. यासाठी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
सौ. नेहा मेहता, पुणे
१. अहं अल्प असणे : ‘श्री. नारगोलकरकाका त्यांच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या; परंतु वक्ता असलेल्या साधकाचाही आदराने उल्लेख करून त्यांना नमस्कार करतात. त्यांचे बोलणे झाल्यानंतर ते अन्य वक्त्यांचे मार्गदर्शनही मन लावून आणि अभ्यासपूर्ण ऐकतात. ते उत्स्फूर्तपणे प्रतिसादही देतात.
२. काका वक्ता म्हणून सभागृहात येतात. तेव्हा त्यांच्या चालण्यात हलकेपणा आणि सहजता जाणवते.
३. सभागृहात सनातन संस्थेचे सद़्गुरु, संत उपस्थित असतील, तर त्यांच्याशी बोलतांना काकांमध्ये भाव जाणवतो.
४. पू. (सौ.) मनीषा पाठक आणि कु. क्रांती पेटकर यांनी आदरणीय काकांविषयी लिहिलेले लिखाण वाचून सहस्रो वर्षांपूर्वी राष्ट्र आणि धर्म यांसाठी निरपेक्षपणे कार्य करणार्या आणि समाजाकडूनही धर्माचे कार्य करवून घेणार्या महर्षि, तसेच ऋषिमुनी यांचे स्मरण झाले. त्यांचे लिखाण वाचतांना भावजागृती होत होती.’
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या/संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |