पुणे महापालिकेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना एकत्रित भूमीवर बसवून शिक्षण !
वेतनाअभावी कंत्राटी शिक्षकांनी दिलेल्या सामूहिक राजीनाम्याचा परिणाम !
पुणे – महापालिकेच्या अनेक शाळांमध्ये शिक्षक संख्या अल्प आहे. त्यात मागील ४ मासांपासून वेतन न मिळाल्यामुळे कंत्राटी शिक्षकांनी सामूहिक त्यागपत्र दिले. त्यामुळे अनेक शाळांमध्ये इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंतच्या मुला-मुलींना एकत्रित बसवून शिक्षण घ्यावे लागत आहे, तसेच एकाच वर्गखोलीमध्ये अनेक विद्यार्थ्यांना बसवले जात आहे. महापालिकेच्या इंग्रजी माध्यमातील ५४ प्राथमिक शाळा असून अनेक शाळांमध्ये अशीच स्थिती आहे.
या शाळांमध्ये ५०० हून अधिक विद्यार्थी इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंतचे शिक्षण घेतात. प्रत्येक शाळेमध्ये १० ते १५ शिक्षकांमध्ये ५ ते ६ कंत्राटी शिक्षकांची भरती करण्यात आली आहे. या शिक्षकांची मागील वर्षाची अनामत रक्कम आणि चालू वर्षातील ४ मासांचे वेतन न मिळाल्याने संबंधितांनी मुख्याध्यापक अन् शिक्षण विभागाकडे तक्रार प्रविष्ट केली होती. त्याला प्रतिसाद न मिळाल्याने ४ ऑक्टोबर या दिवशी शिक्षकांनी अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे सामूहिक त्यागपत्रे सादर केली. त्यानंतर शाळांमधील शिक्षकांची संख्या निम्म्यावर आली. त्यामुळे उर्वरित शिक्षकांवर ताण आल्याने विद्यार्थ्यांना एकत्रित बसवून शिक्षण दिले जात आहे.
संपादकीय भूमिकाअशी स्थिती का निर्माण झाली ? याचा अभ्यास करायला हवा. यामुळे विद्यार्थ्यांच्या झालेल्या हानीचे दायित्व कुणाचे ? |