रुग्णांना धर्मादाय रुग्णालयातील सेवा घेण्यासाठी ‘भ्रमणभाष अॅप’ चालू करणार ! – डॉ. तानाजी सावंत, आरोग्यमंत्री
कोल्हापूर – धर्मादाय रुग्णालयांमधून सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक आरोग्य सेवा चांगल्या प्रकारे मिळत नसल्याच्या तक्रारी नेहमीच शासनाकडे येत असतात. यांसाठी रुग्णांना धर्मादाय रुग्णालयातील सेवा घेण्यासाठी लवकरच ‘भ्रमणभाष अॅप’ चालू करण्यात येणार आहे. हे काम युद्धपातळीवर चालू आहे. दिवाळीपूर्वी रुग्णांना याद्वारे कोणत्याही इच्छित धर्मादाय रुग्णालयात त्यांना आवश्यक असलेली सेवा सहज घेता येणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केले. ते ताराराणी विद्यापीठ येथील ‘महाआरोग्य शिबिरा’च्या उद़्घाटनप्रसंगी बोलत होते.
या प्रसंगी धर्मादाय आयुक्त महेंद्र महाजन, खासदार धनंजय महाडिक, महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळ कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, ताराराणी विद्यापीठ अध्यक्ष क्रांती कुमार पाटील, धर्मादाय सहआयुक्त कोल्हापूर विभाग निवेदिता पवार, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, अधीक्षक शिवराज नाईकवाडे, अधीक्षक विशाल क्षीरसागर यांसह अन्य उपस्थित होते. या शिबिराचा लाभ रुग्णांनी मोठ्या संख्येने घेतला.