नायजेरियन नागरिकाकडून अडीच लक्ष रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात
पर्वरी येथे अमली पदार्थांच्या विरोधात कारवाई
पणजी, ८ ऑक्टोबर (वार्ता.) : गुन्हे अन्वेषण विभागाने ७ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीनंतर पर्वरी येथील ‘जीसीए’ मैदानाजवळ नायजेरियन नागरिक फेर्दिनांद उडोजी ओकोक्वो (वय ४९ वर्षे) याच्याकडून १० ग्रॅम कोकेन आणि १८.८४ ग्रॅम ‘एम्.डी.एम्.ए.’ हे अमली पदार्थ कह्यात घेतले. या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अडीच लक्ष रुपये किंमत आहे. संशयिताच्या विरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संशयिताची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
गोव्यात ५ वर्षांत ९४७ अमली पदार्थ व्यावसायिक पोलिसांच्या कह्यात !
वर्ष २०१८ ते जून २०२३ पर्यंत ‘एन्.डी.पी.एस्.’ कायद्याच्या अंतर्गत गोव्यात ९४९ प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. वर्ष २०१८ मध्ये २२२, वर्ष २०१९ मध्ये २१९, वर्ष २०२० मध्ये १४८, वर्ष २०२१ मध्ये १२१, वर्ष २०२२ मध्ये १५४ आणि वर्ष २०२३ मध्ये (जूनपर्यंत) ८३ प्रकरणे नोंद झालेली आहेत. ९४७ प्रकरणांपैकी ७३९ प्रकरणांविषयी खटले चालू आहेत, तर ११७ प्रकरणांचे अन्वेषण चालू आहे. ८ प्रकरणांमध्ये आरोपींची निर्दाेष मुक्तता झाली आहे, तर ३९ प्रकरणांमध्ये आरोपी दोषी ठरले आहेत. २५ प्रकरणांमध्ये संशयितांवरील खटले मागे घेण्यात आले आहेत. (अमली पदार्थ व्यावसायिकांना केवळ पकडण्यापेक्षा पोलीस या प्रकाराचा पूर्णतः बीमोडच का करत नाहीत ? – संपादक)
अमली पदार्थ व्यवहारात अल्पवयीन मुलांचा वापर
काही दिवसांपूर्वी शिरसई, बार्देश येथे ३ अल्पवयीन बिहारी मुलांकडून १२ लक्ष रुपये किमतीचा १२ किलो गांजा कह्यात घेण्यात आला होता. यामुळे अमली पदार्थ व्यवहारासाठी अल्पवयीन मुलांचा वापर होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. त्यामुळे अमली पदार्थांचा मूळ स्रोत शोधण्यास गोवा पोलिसांना अपयश आले आहे. (अल्पवयीन मुलांचा यासाठी वापर होणे, हे प्रशासनाला लज्जास्पद ! – संपादक)
संपादकीय भूमिकागोव्यात अमली पदार्थ व्यवसायाप्रकरणी बहुतांश नायजेरिन नागरिकांना पकडण्यात येते. राज्यातील नायजेरियन नागरिकांच्या कृतींवर पोलिसांनी करडी दृष्टी ठेवणे आवश्यक असल्याचे दिसून येते ! |