गोव्यातून ८ मासांत कोट्यवधी रुपये किमतीच्या मद्याची परराज्यात तस्करी !
गोवा-कर्नाटक सीमेवरून होते तस्करी
पणजी, ८ ऑक्टोबर (वार्ता.) : गोव्यातून गेल्या ८ मासांत कोट्यवधी रुपये किमतीच्या मद्याची परराज्यात तस्करी केल्याची माहिती उघडकीस आली आहे. कर्नाटकच्या विविध अबकारी कार्यालयांकडून ही माहिती मिळाली आहे.
१. अनमोड येथील अबकारी तपासनाक्यावरून मिळालेल्या माहितीनुसार, मागील ८ मासांत मद्य तस्करीच्या प्रकरणी एकूण २० प्रकरणे नोंद झाली आहेत. यामध्ये ३२ लाख ७८ सहस्र ७७७ रुपये किमतीचे ४ सहस्र २५८ लिटर गोवा बनावटीचे मद्य कह्यात घेण्यात आले. या कारवाईमध्ये १६ वाहने कह्यात घेण्यात आली.
(सौजन्य : OHeraldo Goa)
२. बेळगाव दक्षिण विभाग अबकारी कार्यालयाच्या वतीने खानापूर, बेळगाव येथे मद्य तस्करीला अनुसरून विशेष मोहीम हाती घेण्यात आली. यामध्ये गेल्या ८ मासांत कणकुंबी येथील तपासनाक्यावर सुमारे ८१ लाख रुपये किमतीचे १० सहस्र १५८ लिटर मद्य कह्यात घेण्यात आले. या कालावधीत १ सहस्र ५१० प्रकरणे नोंद झालेली आहेत. या कारवाईमध्ये ९८ वाहने कह्यात घेण्यात आली आहेत.
३. माजाळी, कारवार येथील तपासनाक्यावर सुमारे १ कोटी रुपये किमतीचे मद्य कह्यात घेण्यात आले. या कारवाईत एकूण ४ वाहने कह्यात घेण्यात आली. या ठिकाणाहून कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, तमिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये मद्याची तस्करी केली जात होती. गोव्याच्या सीमेवरील कर्नाटक राज्यातील खानापूर, बेळगाव, जोयडा आणि कारवार येथे गोवा बनावटीचे मद्य विकले जाते.
संपादकीय भूमिकाअन्य राज्यांच्या तपासणीनाक्यांवर मद्याची तस्करी होत असल्याचे समोर येते, ते गोवा राज्यातील तपासणीनाक्यांवरच लक्षात कसे येत नाही ? पोलीस, प्रशासन आणि तस्करी करणारे यांच्यात साटेलोट तर नाही ना, अशी जनतेला शंका आल्यास नवल ते काय ? |