पुणे येथे जाणार्या प्रवाशांसाठी आता आरामदायी ‘जन-शिवनेरी’ बस !
कोल्हापूर, ८ ऑक्टोबर (वार्ता.) – कोल्हापूर-स्वारगेट या मार्गावरील वातानुकूलित फेर्यांचा प्रतिसाद वाढल्याने आता ‘ई-शिवाई (इलेक्ट्रिक बस) समवेत आरामदायी ‘जन-शिवनेरी’ (‘व्होल्वो’) बस प्रवाशांसाठी चालू करण्यात आली आहे. याच समवेत सध्या चालू असलेल्या ‘शिवशाही’ अशा तिन्ही गाड्यांच्या २०-२० फेर्या अशा ४० वातानुकूलित फेर्या कोल्हापूर-पुणे (स्वारगेट) या मार्गावर प्रतिदिन प्रवाशांना उपलब्ध आहेत.
‘जन-शिवनेरी’चा दर ५२५ रुपये असून पहाटे साडेपाच वाजल्यापासून प्रत्येक घंट्याला रात्री १२ पर्यंत या गाड्या उपलब्ध आहेत, तर ‘ई-शिवाई ही बस पहाटे ५ ते सकाळी १० या वेळेत आणि दुपारी २.३० ते सायं. ७ अशा प्रत्येक घंट्याला एक अशा फेर्या उपलब्ध आहेत, अशी माहिती विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली. शिवशाही ही बस ५०० रुपये तिकीट दरात सकाळी ११, दुपारी १२, १ आणि २ वाजता प्रवाशांसाठी उपलब्ध आहे. नवरात्रीच्या काळात म्हणजेच १५ ते २४ ऑक्टोबर या कालावधीत जोतिबा डोंगर येथे जाण्यासाठी प्रवाशांना प्रतिदिन २० गाड्या राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
‘श्री गणेश बेकरी नांदणी’ आस्थापनाकडून बसस्थानकांचे सुशोभिकरण करण्यास प्रारंभ !कोल्हापूर जिल्ह्यातील २३ बसस्थानके ‘श्री गणेश बेकरी नांदणी’ यांच्याकडून सुशोभिकरणासाठी घेण्यात आली आहेत. या अंतर्गत बसस्थानकांची रंगरंगोटी, सुशोभिकरण, नावपाट्या लावणे, स्वच्छता, वृक्षारोपण, तसेच अन्य गोष्टी करण्यात येणार आहेत. काही बसस्थानकांमध्ये कामास प्रारंभ झाला असून कोल्हापूर शहर बसस्थानकात कोल्हापूर जिल्ह्यात उपलब्ध असणारी तीर्थक्षेत्रे, ऐतिहासिक स्थळे यांच्या माहितीचे फलक लावण्यात आले आहेत. यामुळे प्रवाशांना जिल्ह्यातील माहिती कळण्यास साहाय्य होत आहे. या अंतर्गत श्री दत्तगुरूंचे पवित्र स्थान असलेल्या नृसिंहवाडी बसस्थानकासाठी आध्यात्मिक दृष्टीने विचार करून बसस्थानकातील भिंतीवर श्री गुरुचरित्रातील ५२ वा अध्याय संक्षिप्त स्वरूपात लिहिण्याचा विशेष प्रस्ताव आहे. हे काम दत्तजयंतीच्या पूर्वी होण्यासाठी प्रशासकीय पातळीवर विशेष पाठपुरावा चालू आहे. |