अनधिकृतपणे वास्‍तव्‍य करणार्‍या १४ जणांना भारत सोडण्‍याची नोटीस

  • उलवे येथे नायजेरियनांवरील कारवाईचे प्रकरण

  • अनधिकृत वास्‍तव्‍य करणार्‍यांचे माहेरघर झालेला भारत !

नवी मुंबई – पोलिसांनी अमली पदार्थ बाळगणार्‍यांच्‍या विरुद्धच्‍या मोहिमेमध्‍ये उलवे येथे रहाणार्‍या नायजेरियन नागरिकांवर कारवाई केली आहे. यामध्‍ये अवैधरित्‍या वास्‍तव्‍य करणार्‍या १४ जणांना भारत सोडण्‍याची नोटीस बजावली आहे.

पोलिसांनी ७ ऑक्‍टोबर या दिवशी उलवे येथे १२ ठिकाणी धाडी घालून १६ नायजेरियन नागरिकांना कह्यात घेतले होते. त्‍यामध्‍ये एकाकडे अमली पदार्थ मिळाल्‍याने त्‍याला अटक केली होती. तेव्‍हा अन्‍य नागरिक अवैधरित्‍या रहात असल्‍याचे उघड झाले होते.

या कारवाईच्‍या वेळी एक नायजेरियन पोलिसांच्‍या हातून निसटला होता. त्‍याला पकडतांना एक पोलीस कर्मचारी अडखळून भूमीवर कोसळला होता. अखेर काही अंतरावर त्‍याला नागरिक आणि पोलीस यांनी पाठलाग करून कह्यात घेतले. या संदर्भातील व्‍हिडिओ सामाजिक माध्‍यमांवर प्रसारित होऊन पोलिसांच्‍या कार्यक्षमेविषयी प्रश्‍न उपस्‍थित करण्‍यात आले आहेत.

मागील मासात खारघर, वाशी, तळोजा, कोपरखैरणे आदी ठिकाणी धाडी टाकून नायजेरियन नागरिकांचे अमली पदार्थ विक्रीचे जाळे उद्धवस्‍त केले होते.

संपादकीय भूमिका

  • कारवाई करूनही नायजेरियन नागरिक भारतात अनधिकृतपणे कसे रहातात, हे पोलिसांनी शोधून उपाययोजना काढावी !