पुसेसावळी (जि. सातारा) येथील दंगलीचे अन्वेषण ‘सीबीआय’ आणि ‘एन्.आय.ए.’ यांनी करावे !
भारतीय मानवाधिकार परिषदेची मागणी
पुणे – सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी गावात सप्टेंबरमध्ये झालेल्या दंगलीच्या घटनेचे अन्वेषण ‘सीबीआय’ (केंद्रीय अन्वेषण विभाग) आणि ‘एन्.आय.ए.’कडून (राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा) व्हावे. आम्ही या प्रकरणाचा अहवाल सिद्ध केला असून अन्वेषण यंत्रणांना पाठवणार आहोत. ‘अन्यायग्रस्त हिंदु बांधवांना भरपाई द्यावी’, अशी मागणी भारतीय मानवाधिकार परिषदेचे सदस्य अविनाश मोकाशी यांनी येथील पत्रकार परिषदेमध्ये दिली.
मोकाशी म्हणाले की, सामाजिक माध्यमांतून हिंदु देवता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण प्रसारित झाले होते. त्यातून पुसेसावळी येथे दोन गटांमध्ये आक्रमण आणि दंगल झाली. त्यात एका व्यक्तीचा मृत्यू, तर अनेकजण घायाळ झाले. या घटनेचे अधिक अन्वेषण करण्यासाठी आमच्या सदस्यांनी गावकर्यांशी संपर्क साधला. दंगल घडल्यानंतर पुष्कळ वेळाने पोलिसांनी गुन्हे नोंद केला. दंगलीमध्ये सहभागी नसणार्या व्यक्तींवर गुन्हा नोंद केले. ज्या ‘व्हॉट्सॲप’ (सामाजिक माध्यमांतून विचारांची देवाणघेवाण करणारी यंत्रणा) गटात आक्षेपार्ह लिखाण करण्यात आले. त्यामध्ये पाकिस्तानमधील काही क्रमांकांचा सहभाग असल्याचे समोर येत आहे. या भ्रमणभाष क्रमांकांवरून धमकीचे संदेश येत आहेत. घडलेल्या घटनांचे खरे चित्र देणे आवश्यक असून हिंदु समाजाला आक्षेपार्ह, प्रक्षोभक टिपणी विषयी संताप वाटत असतांना पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे ते अस्वस्थ आहेत. याचा अहवाल भारतीय मानवाधिकार परिषदेकडून सिद्ध करण्यात आला आहे.