साहाय्यक पोलीस निरीक्षकाने डोक्यात गोळी झाडून केली आत्महत्या !
नांदेड – साहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेले आनंद मळाळे १ मास आजारी असल्याने सुट्टीसाठी सोलापूरला घरी आले होते. ७ ऑक्टोबरला पहाटे ४ वाजता त्यांनी घराच्या अंगणामध्ये स्वतःकडील बंदुकीने डोक्यामध्ये गोळी झाडून घेऊन आयुष्य संपवले. घटनेच्या वेळी त्यांची पत्नी त्यांचा शोध घेत होती; मात्र ते घराच्या बाहेर मृतावस्थेत पडले होते. कामाचा ताण असल्यामुळे साहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद मळाळे यांनी गोळी झाडून जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे. (पोलिसांवरील कामाचा ताण दूर करण्यासाठी प्रशासन काही उपाययोजना करणार कि नाही ? – संपादक) या घटनेची नोंद सदर बाझार पोलीस ठाण्यात झाली आहे. आनंद मळाळे हे मूळचे सोलापूर येथील आहेत. ते सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयामध्ये अनेक वर्षे पोलीस शिपाई म्हणून कार्यरत होते. परीक्षा देऊन ते पोलीस उपनिरीक्षक झाले. पुणे येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवा बजावल्यानंतर साहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून नांदेड येथे त्यांची पदोन्नती झाली होती.