हिंदु, हिंदुत्व आणि अपघाताने जन्मलेले हिंदू
हिंदु, हिंदुत्व आणि राहुल गांधी – भाग ११
‘हिंदु, हिंदुत्व आणि राहुल गांधी’ या लेखमालिकेतील यापूर्वीच्या लेखांचे वाचन केल्यानंतर हिंदु आणि हिंदुत्व म्हणजे काय ? याची बरीचशी कल्पना वाचकांना निश्चितपणे आली असेल. ज्या हिंदूंमध्ये लेखात वर्णित केल्याप्रमाणे हिंदुत्वाचे गुणधर्म आहेत, त्यालाच हिंदुत्वनिष्ठ म्हणता येईल. हिंदु धर्मात जन्म झाला म्हणून कुणी हिंदुत्वनिष्ठ होत नाही. हिंदुत्वनिष्ठ होण्यासाठी केवळ जन्माने हिंदु असून चालणार नाही, तर तो वाचा, विचार आणि आचार यांनीही हिंदु असला पाहिजे. केवळ जन्महिंदु नव्हे, तर तो कर्महिंदूही असला पाहिजे. आज या देशात कर्महिंदू फार अल्प; पण जन्महिंदूंची संख्या मात्र पुष्कळ मोठी आहे. या जन्महिंदूंना ‘अपघाताने झालेले हिंदू’ असेही म्हणता येईल.
१. जन्महिंदू अधिक धोकादायक !
अपघाताने झालेल्या हिंदूंमध्ये हिंदुत्वाच्या गुणधर्माचा लवलेशही नसतो. उलट हे अपघाताने जन्मलेले जन्महिंदू म्हणजे ‘कुर्हाडीचा दांडा गोतास काळ’ या म्हणीप्रमाणे अधिक धोकादायक असतात. अशा अपघाताने झालेल्या जन्महिंदूंमुळे या देशातील सनातन धर्म (हिंदु धर्म) या धर्माप्रमाणे आचरण करणारे कर्महिंदू, या धर्माचा गौरवशाली इतिहास, धर्माची सभ्यता, संस्कृती, साहित्य, संगीत, कला या सार्यांचेच अस्तित्व धोक्यात आले आहे. मुसलमान आणि ख्रिस्ती या हिंदूंच्या उघड शत्रूंपेक्षा अस्तनीतील निखार्याप्रमाणे असणारे हे जन्महिंदूच अधिक धोकादायक झाले आहेत. या अपघाताने जन्मलेल्या हिंदूंमुळे या देशाचे सार्वभौमत्वही धोक्यात आले आहे. इंग्रजी भाषेत एक म्हण आहे, ‘It is better to have one thousand enemies outside the house, than to have one single enemy inside it’, म्हणजे ‘घराबाहेरील सहस्र शत्रूंपेक्षा घरातील एकच शत्रू अधिक धोकादायक असतो.’
२. हिंदूंसाठी महाघातक ठरलेले त्यांचे जन्महिंदू नेते !
अशा धोकादायक अपघाताने हिंदु म्हणून जन्माला आलेल्यांची सविस्तर माहिती द्यायची म्हटले, तर एक जाडजूड ग्रंथ सिद्ध होईल. म्हणून विस्तारभयास्तव काही थोड्या अपघाताने हिंदू झालेल्यांची माहिती देणे क्रमप्राप्त आहे. ‘मी भाषेने इंग्रज, संस्कृतीने मुसलमान आणि अपघाताने हिंदु म्हणून जन्मलो’, असे उद्गार भारतातील एका (तथाकथित) लोकप्रिय नेत्याने काढले होते. या नेत्याने त्याच्या हयातीत सातत्याने हिंदु समाज आणि हिंदु नेते यांचा द्वेष, तर ख्रिस्ती-मुसलमान यांचे अतोनात लाड केले होते. सत्ताप्राप्तीसाठी आतूर झालेल्या या नेत्याने विभाजनामुळे पाकिस्तानमधील हिंदूंच्या सुरक्षेकडे अक्षम्य दुर्लक्ष केले होते. पाकिस्तानमधील हिंदु, बौद्ध, जैन, शीख यांना जणू लांडग्यांच्या हवाली केले होते. त्यामुळे त्या क्रूर लांडग्यांनी निःशस्त्र असणार्या लाखो हिंदू, बौद्ध, जैन, शीख यांना भक्ष्य बनवले. लाखो स्त्रियांची अब्रू लुटली गेली होती. याच नेत्याने पाकिस्तानधार्जिण्या शेख अब्दुल्लाच्या गळ्यात गळा घालून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ‘कलम ३७०’ (जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम) आणि ‘३५ ए’ या कलमाद्वारे काश्मीरला नको तेवढी स्वायत्तता दिली. त्याची कडू फळे आजही भारतातील हिंदु समाज भोगत आहे. या काश्मीरच्या समस्येमुळे आजवर भारताची अपार जीवित आणि वित्त हानी झाली आहे. भविष्यातही अशी किती हानी होईल, हे सांगता येणार नाही. याच अपघाताने हिंदु म्हणून जन्मलेल्या नेत्याने ‘हिंदी-चिनी भाई भाई’ अशा घोषणेला भुलून लष्करी सामर्थ्याकडे दुर्लक्ष केले आणि लाखो चौरस कि.मी.चा भारताचा भूप्रदेश चीनच्या घशात घातला. तिबेटचे उदक चीनच्या हातावर उदारपणे सोडून भारताच्या उत्तरी सीमा कायमच्या असुरक्षित केल्या. महमूद गझनीने उद्ध्वस्त केलेल्या सोरटी सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे कार्य भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी चालू करताच त्याला साहाय्य करणे तर दूरच; पण त्यांच्या कार्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. अपघाताने झालेले हिंदू या देशासाठी असे घातक ठरले ! (हे नेते जन्माने मुसलमान असले, तरी बहुसंख्यांना ते ठाऊक नसल्याने त्यांना जन्महिंदूच म्हटले आहे. – संकलक)
३. सहस्रो रामभक्तांना ठार करणारे जन्महिंदूच !
प्रभु श्रीराम हे आम्हा सर्व हिंदूंचे आराध्य दैवत. आम्हा सर्व हिंदूंचेच नव्हे, तर संपूर्ण मानव जातीचे आदर्श. परकीय आणि धर्मांध आक्रमक बाबराने अयोध्येतील रामजन्मभूमीवरचे रामललाचे भव्य मंदिर उद्ध्वस्त करून तिथे एका मशिदीची निर्मिती केली. आपल्यावरचा हा कलंक दूर करण्यासाठी हिंदूंनी रामजन्मभूमीमुक्तीचा लढा उभारला; पण उत्तरप्रदेशमधील मुलायमसिंह यांच्या तत्कालीन समाजवादी सरकारने रामभक्तांवर निर्घृणपणे गोळ्यांचा वर्षाव करून शेकडोे रामभक्तांना ठार केले. त्यांची प्रेते शरयु नदीत फेकून शरयूचे पाणी हिंदूंच्या रक्ताने लाल केले. असे अमानुष कृत्य करणार्या जन्महिंदूंना अपघाताने झालेले हिंदू असे नाही, तर काय म्हणावे ?
४. श्रीरामाला काल्पनिक पात्र म्हणणारे जन्महिंदू !
काही जन्महिंदूंनी तर मुसलमानांपेक्षाही अधिक प्रखरतेने हिंदूंच्या रामजन्मभूमीमुक्तीच्या लढ्याला विरोध केला. या जन्महिंदूंनी दावा केला की, ‘राम हे एक काल्पनिक पात्र आहे.’ त्यांनी रामाच्या जन्माचा दाखलाही मागितला. रामजन्मभूमीचा निर्णय हिंदूंच्या बाजूने लागू नये; म्हणून न्यायालयात
२२ अधिवक्त्यांंची फौज उभी केली. मुसलमानांपेक्षाही अधिक तीव्रतेने या जन्महिंदूंचे बाबरी प्रेम उफाळून आले होते. या जन्महिंदूंना श्रीरामाने सीतेच्या मुक्तीसाठी भारत ते श्रीलंका यांच्या बांधलेल्या रामसेतूचे अस्तित्व मान्य नसते; पण अमेरिकेची ‘नासा’ ही अंतराळ संशोधन संस्था जेव्हा या रामसेतूचे अस्तित्व, त्याची अनेक छायाचित्रे काढून सिद्ध करते, तेव्हा मात्र या जन्महिंदूंची जीभ टाळूला चिकटून बसते. मग हे जन्महिंदू रामसेतूला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतात; पण जागृत हिंदुत्वनिष्ठांमुळे त्यांचा हा प्रयत्न असफल होतो.
५. श्रीरामाच्या जयजयकाराचा त्रास होणारे जन्महिंदू !
बंगालच्या जन्महिंदू असणार्या मुख्यमंत्री एवढ्या हिंदुद्वेष्ट्या आहेत की, त्यांना कुणी श्रीरामाचा जयजयकार केला की, प्रचंड संताप येतो; पण बांगलादेशी घुसखोर, रोहिंग्या यांच्याविषयी त्यांचे ममत्व मात्र उफाळून येते. या प्रेमापोटी त्या घुसखोरांनी केलेले बाँबस्फोट, हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांची केलेली हत्या, हिंदु स्त्रियांवर केलेले बलात्कार, दुर्गादेवीच्या मूर्तीची केलेली विटंबना अशा अमानुष कृत्यांकडेसुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. (बंगालच्या मुख्यमंत्री या जन्माने मुसलमान असल्या, तरी बहुसंख्यांना ठाऊक नसल्याने त्यांचा उल्लेख जन्महिंदु असाच ठेवला आहे. – संकलक)
६. छत्रपती शिवरायांना निधर्मी ठरवणारे जन्महिंदूच !
श्रीरामाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज तमाम हिंदूंचे आदर्श आणि आराध्य दैवत आहेत; पण कट्टर हिंदुत्वनिष्ठ असणार्या, स्वतः गोब्राह्मण प्रतिपालक म्हणवून घेणार्या, भगव्या ध्वजाला पूज्य मानणार्या आणि धर्मांध मुसलमान-ख्रिस्ती यांचे कर्दनकाळ असणार्या छत्रपती शिवरायांना धर्मनिरपेक्ष ठरवण्यासाठी इतिहासाचे फार मोठ्या प्रमाणात विकृतीकरण केले जात आहे. हे विकृतीकरण करणारे अपघाताने झालेले हिंदूच आहेत. छत्रपती शिवरायांनी समर्थ रामदासस्वामींना गुरुस्थानी मानल्याचे अनेक ऐतिहासिक पुरावे उपलब्ध असतांना समर्थांऐवजी बाबा याकुत नावाच्या मुसलमान फकीराला त्यांच्या गुरुस्थानी बसवणारे केवळ जन्महिंदूंच असू शकतात ! लाल महालातून दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवणारे, चौथीच्या पुस्तकातून त्यांचा धडा वगळणारे, पैठण येथील एका खासगी ऐतिहासिक वस्तूंच्या संग्रहालयातील छत्रपती शिवरायांच्या हस्ताक्षरांतील, त्यांना राज्याभिषेक करणार्या गागाभट्टांच्या नामोल्लेखाची पट्टी काढणारे जन्महिंदूच होत !
७. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना विरोध करणारे जन्महिंदूच !
देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी अंदमानातील अत्यंत यातनामय काळ्या पाण्याच्या दोन शिक्षा भोगल्या, आपले सारे सर्वस्व स्वातंत्र्याच्या यज्ञात समिधा म्हणून अर्पण केले, त्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या काव्यपंक्ती अंदमान येथील हुतात्मा स्मारकावरून हटवणारे, ज्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांचे पूर्ण आयुष्य छत्रपती शिवाजी महाराजांचे अलौकिक कार्य घराघरांत पोचवण्यासाठी खर्ची घातले, त्या बाबासाहेबांना प्रदान करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र्रभूषण’ या सन्मानाला विरोध करणारे, अरबी समुद्रात शिवरायांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी स्थापन केलेल्या समितीवरील बाबासाहेबांच्या नियुक्तीला विरोध करणारे केवळ अपघातानेच झालेले हिंदु असू शकतात.
८. हिंदूंचा गौरवशाली आणि दैदीप्यमान इतिहास !
आमचा भारत देश, भारताची आर्य संस्कृती आणि सभ्यता जगात सर्वांत प्राचीन आहे. मोहंजोदडो, हडप्पा अन् इतरही विविध ठिकाणी झालेल्या उत्खननांतून ही गोष्ट सिद्ध झालेली आहे. आमच्या देशाने साहित्य, संगीत, ६४ कला, १४ विद्या, विज्ञान, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, शिल्पशास्त्र, अध्यात्म अशा विविध क्षेत्रांत प्रगतीचे अत्युच्च शिखर गाठले होते. देशात तक्षशिला, नालंदा यांसारखी विश्वविद्यालये होती. भारत हे विद्येचे माहेरघरच होते. आमच्या देशातील ऋषिमुनींनी वेद, उपनिषदे यांसारख्या अनेक वैदिक आणि महाभारत, रामायण यांसारख्या अनेक अजरामर अशा ग्रंथांची निर्मिती केली. अनेक वैज्ञानिक आणि शून्यासारखे अनेक गणितीय शोध लावले. आमच्या देशात राम, कृष्ण, बुद्ध, महावीर यांच्यासारखे अनेक युगपुरुष, तसेच चंद्रगुप्त मौर्य, समुद्रगुप्त, विक्रमादित्य, अशोक यांसारखे राजे-महाराजे होऊन गेले. शुंज, सातवाहन, कनिष्क, गुप्त, वर्धन, चालुक्य, राष्ट्र्रकूट, पल्लव, चोल, पाल, सेन, प्रतिहार यांसारखी प्रसिद्ध राजघराणी होऊन गेली. या राजघराण्यांनी हिंदु धर्म, सभ्यता, संस्कृती, साहित्य, संगीत, कला यांचा प्रचार, प्रसार संपूर्ण विश्वात केला. अनेक ठिकाणी भव्य मंदिरे बांधली.
म्हणूनच आजही म्यानमार (ब्रह्मदेश), कंबोडिया (कंबोज), थायलंड (श्यामदेश), लाओस (लवदेश), मलेशिया, इंडोनेशिया, आफ्रिका (शाल्मली आणि शंखद्वीप), व्हिएतनाम (चम्पा), मेक्सिको (मद्रदेश), अफगाणिस्तान, जपान, रशिया, चीन, तिबेट, तुर्कस्तान, इराण, दक्षिण अमेरिका इत्यादी अनेक देशांत भारतीय संस्कृतीच्या पाऊलखुणा आढळून येतात. आमच्या चाणक्य-चंद्रगुप्त या गुरु-शिष्यांच्या जोडीने ग्रीकांचा, सम्राट पुष्यमित्राने यवनांचा, विक्रमादित्याने शक आणि कुशाण यांचा, यशोधर्माने हुणांचा दारूण पराभव केला होता. कर्नाटकमध्ये विद्यारण्यस्वामी यांनी हरिहर आणि बुक्कराय यांना हाताशी धरून वर्ष १३३६ मध्ये विजयनगरच्या बलाढ्य अशा हिंदु साम्राज्याची स्थापना केली होती. या साम्राज्यात संपन्नता आणि पराक्रम यांसमवेत साहित्य, संगीत अन् कला यांचा परमोच्च उत्कर्ष झाला होता !
९. हिंदूंच्या गौरवशाली इतिहासाचे विकृतीकरण करणारे जन्महिंदू !
भारताचा हा गौरवशाली इतिहास पुढील पिढीला शिकवतांना त्याचे प्रचंड प्रमाणात विकृतीकरण करण्यात आले. ‘हिंदूंचा इतिहास म्हणजे पराभवाचा इतिहास’, असा अपप्रचार जाणीवपूर्वक करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज, राणाप्रताप, मंगल पांडे, सरदार वल्लभभाई पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, बाजीराव पेशवे, चंद्रशेखर आझाद असे अनेक राष्ट्र्रपुरुष आणि क्रांतीकारक यांची उपेक्षा करण्यात आली. कपटी आणि क्रूर अशा बाबर, अकबर, शहाजहां, औरंगजेब, टिपू सुलतान यांनाच महान (ग्रेट) ठरवण्यात आले. त्यांचाच इतिहास पानेच्या पाने भरून शिकवण्यात आला. लाखो हिंदूंच्या कत्तली आणि सहस्रोे हिंदु स्त्रियांवर बलात्कार करणार्या खिलाफत चळवळीमधील मोपला बंडखोरांना स्वातंत्र्यसैनिकांचा दर्जा देण्यात आला ! विशेष म्हणजे हिंदूंच्या इतिहासाचे विकृतीकरण करण्यात इंग्रज इतिहासकारांसह अनेक जन्महिंदू इतिहासकारही सहभागी होते. भारतीय इतिहासाचे पुनर्लेखन करण्याची जेव्हा चर्चा होते, तेव्हा हेच अपघाताने जन्मलेले जन्महिंदू ‘शिक्षणाचे भगवेकरण’ अशा बोंबा मारतात !
तात्पर्य या देशाला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी या अपघाताने जन्मलेल्या हिंदूंना प्रथम वैध मार्गाने रोखावे लागेल !
– श्री. शंकर गो. पांडे, पुसद, यवतमाळ.
(क्रमशः पुढच्या रविवारी)
संपादकीय भूमिकाहिंदुत्वनिष्ठ होण्यासाठी केवळ जन्माने हिंदु नव्हे, तर तो वाचा, विचार आणि आचार यांनीही हिंदु असला पाहिजे ! |