सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींच्या ब्रह्मोत्सवाविषयी निरोप मिळाल्यानंतर सद्गुरु राजेंद्र शिंदे यांची झालेली विचारप्रक्रिया आणि प्रत्यक्ष तो पहातांना त्यांना जाणवलेली सूत्रे

१. ब्रह्मोत्सवासाठी प्रसारसेवा करणार्‍या साधकांना आमंत्रित केल्याचा निरोप समजल्यावर मनाची झालेली विचारप्रक्रिया

रथोत्सवातील एक भावमय क्षण

अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवासाठी प्रसारसेवा करणार्‍या साधकांना आमंत्रित केल्याचा निरोप समजल्यावर माझ्या मनात पहिला विचार आला, ‘सनातन संस्थेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असे घडत आहे की, एखाद्या कार्यक्रमानिमित्त प्रसार सेवा करणार्‍या विविध ठिकाणच्या अनेक साधकांना एकाच वेळी गोव्याला बोलावले आहे.’

आ. लवकरच येणार्‍या घोर आपत्कळापूर्वीच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सर्व साधकांना शेवटचे मार्गदर्शन करतील. पुढच्या काळात ते अधिकाधिक निर्गुण स्थितीत असतील. त्यामुळे त्यांना प्रत्यक्षात साधकांना भेटता किंवा बोलता येणार नसल्याने ते त्यांना प्रेरणा देऊन साधनेची पुढची दिशा देतील.

इ. सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली यांच्यासाठी त्यांचे साधक, म्हणजे त्यांचे जीव कि प्राण आहेत. काही साधकांनी अनेक वर्षे सेवा केलेली आहे; परंतु आता काही कारणांमुळे त्यांना सेवा करणे जमत नाही, तर अशा साधकांनाही बोलवून ‘आता तुम्ही साधनेवर लक्ष केंद्रित करावे’, असे सांगून त्यांना पुन्हा एकदा साधनेच्या मुख्य प्रवाहात आणतील’, असे मला वाटले.

ई. देवद आश्रमातील साधकांचे गोवा येथे जाण्याचे नियोजन नव्हते; परंतु ‘प्रसारसेवेतील साधक गोवा येथे जातील, त्यांना सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली भेटतील’, या विचारांनी मला आणि देवद आश्रमातील साधकांना पुष्कळ आनंद होत होता. प्रसारसेवेतील साधकांचे गोव्याला जाण्याचे नियोजन जसजसे मला कळत होते, तसतशी माझ्याही उत्साहात पुष्कळ वाढ होत होती आणि तसा उत्साह आश्रमातील अन्य साधकांमध्येही जाणवत होता.

२. प्रत्यक्ष ब्रह्मोत्सव कार्यक्रम ‘ऑनलाईन’ पहातांना झालेली विचारप्रक्रिया

सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे

अ. ब्रह्मोत्सव कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे साधक श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) यांनी ब्रह्मोत्सवाचे महत्त्व सांगताना म्हणाले, ‘‘सनातनच्या सर्व साधकांचे पाप, ताप, दैन्य, दुःख, पीडा इत्यादींचे हरण करणारा हा ब्रह्मोत्सव आहे.’’ तेव्हा ‘सनातनच्या साधकांनी निःस्वार्थीपणे अनेक वर्षे सेवा आणि साधना केली आहे. त्याचे फळ म्हणून सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलीने त्यांच्यावर कृपा करून, त्यांचे सर्व संचित आणि प्रारब्धच सुसह्य केले अन् या घोर आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी त्यांना शक्ती प्रदान केली’, असे मला वाटले.

आ. मला सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली यांनी सांगितलेले पुढील विचार आठवले, ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली यांनी याविषयी सांगितले होते, ‘जेव्हा समाज घोर आपत्काळात, दुःखात असेल, तेव्हा माझे साधक आनंदात असतील.’ (घोर आपत्काळापूर्वी चांगली साधना केल्यामुळे साधकांना साधनेतील आनंद मिळेल. आपत्काळात जेव्हा समाज दुःखी असेल, तेव्हा गुरुकृपेने साधक त्या आपत्काळाला सहज सामोरे जाऊ शकतील.)

३. प्रत्यक्ष ब्रह्मोत्सव कार्यक्रम ‘ऑनलाईन’ पहातांना जाणवलेली सूत्रे

अ. प्रत्यक्ष रथोत्सवाला आरंभ झाला, तेव्हा मला भावाची उत्कट स्थिती अनुभवता आली.

आ. रथाच्या पुढे झेंडे अन् टाळ इत्यादी घेऊन भावपूर्ण आणि लयबद्धपणे पुढे जाणार्‍या साधक – साधिका भजनांच्या ओळींवर पुष्कळ लयबद्धरित्या चालत होत्या. ते पाहूनच माझा भाव जागृत होत होता.

इ. प्रत्यक्ष तिन्ही गुरूंना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना) घेऊन मार्गक्रमण करणारा रथ पाहिल्यावर माझ्या डोळ्यांतून भावाश्रूंचे ओघळ वहात होते. अधूनमधून मला हुंदकेही येत होते.

ई. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या रथातील तिन्ही गुरूंना पहाणार्‍या सनातनच्या सहस्रो साधकांचा भाव जागृत होऊन, प्रत्येक जण भावाच्या एका उत्कट स्थितीत गेला होता’, असे मला जाणवले. तेव्हा मला वाटले, ‘हा ब्रह्मोत्सव साधकांना मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे भावाच्या स्थितीत अनुभवता येण्यासाठी प्रत्यक्ष गुरुमाऊलींनीच सर्वांना भावाच्या स्थितीत नेऊन तो अनुभवायला दिला अन् आमच्या सर्वांच्या जीवनाचे सार्थक केले.’

४. रथातील तिन्ही गुरूंसमोर गायन आणि नृत्य यांच्या माध्यमातून सादर केलेल्या सेवेविषयी जाणवलेली सूत्रे

अ. तिन्ही गुरु असलेला रथ पटांगणाच्या मध्यभागी येऊन थांबला. त्यांच्यासमोर संगीत आणि नृत्य इत्यादींच्या माध्यमातून सेवा सादर झाली.

आ. ‘संगीतशास्त्र हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून ईश्‍वरप्राप्तीचे एक माध्यम आहे’, असे सनातन संस्था सतत सांगत असते. हा कार्यक्रम पहातांना याची प्रकर्षाने जाणीव होत होती.

इ. गायन, तसेच नृत्य सादर करणारे साधक त्यांच्यातील भावामुळे भावस्थितीत होते. त्यांनी गायलेले काव्य ऐकणारे आणि नृत्य पहाणारे यांचा भाव सहज जागृत होत होता.

५. झोकून देऊन तळमळीने गुरुकार्य करणार्‍या साधक आणि संत यांचा परिचय करून देणे

शेवटी सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय यांच्या वतीने कार्य करणारे काही साधक अन् संत यांची व्यासपिठावर बोलावून ओळख करून देण्यात आली.

अ. ‘असे करणे, म्हणजे ते करत असलेल्या सेवेचा सत्कारच होता’, असे मला वाटले.

आ. मला हा कार्यक्रम पुष्कळ प्रेरणादायी वाटला; कारण यातील सर्व साधक आणि संत हे बर्‍याच वर्षांपासून तळमळीने साधना करत आहेत. ‘प्रसारसेवेतील बर्‍याच साधकांना त्यांच्याविषयी अल्प माहिती असेल, रामनाथी आश्रमातील सर्व साधकांनासुद्धा त्यांच्या सेवांविषयी पूर्ण माहिती असेल, असे नाही; परंतु ईश्‍वरापर्यंत (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यापर्यंत) प्रत्येकाचे साधनेचे प्रयत्न पोचतच असतात’, हे शिकता आले.

इ. त्यातील काही साधकांनी ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेली नव्हती; परंतु ते झोकून देऊन तळमळीने गुरुकार्य करत आहेत.

ई. यावरून माझ्या लक्षात आले, ‘प्रसारात असे बरेच साधक आहेत, ज्यांची आध्यात्मिक पातळी अजून ६० टक्के नाही किंवा त्यांच्यात अन्यांच्या तुलनेत भाव अल्प आहे; परंतु ते झोकून देऊन तळमळीने गुरुकार्य करत आहेत. त्यांना हा सत्कार पाहून नक्कीच प्रेरणा मिळाली असेल आणि ते म्हणत असतील, ‘आपलीही सेवा गुरुचरणांपर्यंत पोचते, यात शंकाच नाही !’

६. ब्रह्मोत्सवाचा कार्यक्रम संपल्यावर जाणवलेली सूत्रे

अ. कार्यक्रम संपल्यावर साधकांच्या मनात प्रचंड उत्साह भरलेला होता.

आ. ‘आपल्यावर सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांची झालेली कृपा टिकवून ठेवण्यासाठी साधनेचे प्रयत्न करायला पाहिजेत’, अशी तळमळ त्यांच्यात तीव्रतेने जागृत झाली आहे’, असे मला जाणवले.

इ. कार्यक्रमाला उपस्थित साधक त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात परतल्यावर ‘भगवंताने आपल्याला पुष्कळ काही दिले आहे. आता आपण साधनेचे कठोर प्रयत्न करायला पाहिजेत’, अशी प्रेरणा त्यांच्यात निर्माण झाल्याचे माझ्या लक्षात येत आहे.

ई. ‘त्यांच्यातील क्रियाशीलता वाढत आहे आणि त्यांना भावाच्या स्थितीत रहायला जमत आहे’, असे माझ्या लक्षात येते.

उ. आता सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ यांचे रूप साधकांच्या डोळ्यांसमोर सहज येते. ब्रह्मोत्सवात पाहिलेले तिन्ही गुरूंचे रूप त्यांच्याच कृपेने साधकांच्या हृदयात कोरले गेले आहे.

ऊ. ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींनी या एकाच कार्यक्रमातून साधकांना साधनेच्या पुढच्या टप्प्याला नेले’, असे मला जाणवले.

७. सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींचे सामर्थ्य आणि साधकांवरील प्रीती

सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींचे आध्यात्मिक सामर्थ्य एवढे अफाट आहे की, केवळ त्यांच्या दर्शनाने सर्व साधक भावविभोर झाले आणि साधकांना साधना अन् सेवा करण्याची तीव्र प्रेरणा मिळून त्यांच्यात तळमळ जागृत झाली.

यावरून ‘त्यांची साधकांवर किती अमर्याद प्रीती आहे आणि साधकांचीही सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींवर किती श्रद्धा आहे’, हे लक्षात आले.’

८. कृतज्ञता आणि प्रार्थना

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ आपल्या परम कृपेनेच ‘याची देहि याची डोळा’, हा दिव्य ब्रह्मोत्सव आम्हाला पहायला मिळाला. याविषयी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

‘आपल्या कृपेने आम्हा सर्व साधकांमध्ये जागृत झालेली साधनेची तळमळ अखंड टिकून राहून, आपल्याला अपेक्षित अशी साधना आम्हा पामर जिवांकडून करून घ्यावी’, अशी आपल्या परमपावन चरणी शरणागत भावाने प्रार्थना आहे.

इदं न मम ।’

– (सद्गुरु) राजेंद्र शिंदे (वय ६१ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३.७.२०२३)

कर्नाटकातील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता कृष्णमूर्ती यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे

अधिवक्ता कृष्णमूर्ती

अ. या कार्यक्रमात कर्नाटकातील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता कृष्णमूर्ती यांची ओळख करून देण्यात आली. जितका वेळ ते व्यासपिठावर बसलेले होते, तितका वेळ ते नमस्काराच्या मुद्रेत आणि भावावस्थेत होते. त्यांना पाहून पुष्कळ आनंद जाणवत होता. त्यांनी मनोगत व्यक्त केले. तेव्हा ‘त्यांची उच्च भावावस्था आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी त्यांची श्रद्धा किती अधिक आहे ?’, हे माझ्या लक्षात आले.

आ. न्यायालयासारख्या रज-तमात्मक वातावरणात अनिष्ट शक्तींचे प्राबल्य पुष्कळ अधिक असते. ‘अशा वातावरणातसुद्धा त्यांचा नामजप आणि अनुसंधान टिकून असते’, हे ऐकून ‘अत्यंत अनुकूल वातावरणात असणार्‍या साधकांनी किती प्रयत्न करायला पाहिजेत’, हे माझ्या लक्षात आले. त्यांच्या बोलण्यातून मलाही ‘आपण तशा स्थितीत लवकर जायला पाहिजे’, अशी प्रेरणा मिळाली.

– (सद्गुरु) राजेंद्र शिंदे

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या/संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक