नक्षलवादाचे पोशिंदे !
संपादकीय
देशातील नक्षलवादाचे उच्चाटन करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ६ ऑक्टोबर या दिवशी नवी देहली येथे नक्षलग्रस्त राज्यांतील मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांची विशेष बैठक घेतली. यामध्ये नक्षलवाद नष्ट करण्यासाठीच्या विविध उपाययोजना राबवण्याचे धोरण निश्चित करण्यात आले. सद्यःस्थितीत देशात महाराष्ट्र, छत्तीसगड, झारखंड, आंध्रप्रदेश, तमिळनाडू, बंगाल आदी राज्यांत नक्षलवाद न्यूनाधिक प्रमाणात आहे; परंतु ‘केवळ हिंसक कारवाया होणार्या राज्यांत नक्षलवाद आहे’, असे म्हणणे चुकीचे ठरेल. नक्षलवादाला पोसणारा मोठा बुद्धीजीवी वर्ग देशाच्या कानाकोपर्यात पसरला आहे. विशेषत: मुंबई, नवी देहली, कोलकाता या भागांत या बुद्धीजीवी वर्गाने स्वत:चे बस्तान बसवले आहे. काँग्रेसचे जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असतांना या साम्यवादी विचारसरणीच्या लोकांनी विद्यापिठे, न्यायव्यवस्था यांसह देशाच्या प्रशासकीय यंत्रणेमध्ये स्वत:चे स्थान बळकट केले. ज्याप्रमाणे राक्षसाला नष्ट करायचे असेल, तर त्याचा प्राण असलेल्या पिंजर्यातील पक्ष्याला प्रथम नष्ट करावे लागते, त्याप्रमाणे नक्षलवादाच्या उच्चाटनासाठी त्याचे पोशिंदे असलेल्या बुद्धीजीवी वर्गाला शक्तीहीन करावे लागेल. नक्षलवादाच्या विरोधात कारवाई होते, तेव्हा मानवाधिकारवाल्यांना हाताशी धरून हे बुद्धीजीवी ‘पोलीस निरपराध आदिवासींना मारत आहेत’, अशी ओरड करतात. यातून ते पोलीस, प्रशासन आणि सत्ताधारी यांच्यावर एकप्रकारे दबाव निर्माण करतात; मात्र नक्षलवादी जेव्हा निरपराध लोकांची हत्या करतात, तेव्हा मात्र हे बुद्धीजीवी सोयीस्कररित्या मौन बाळगतात. आतापर्यंत देशातील नक्षलवादाचे उच्चाटन न होण्याला हा बुद्धीजीवी वर्गच मुख्य कारणीभूत आहे. त्यामुळे शाखा तोडण्याऐवजी मुळावरच घाव घालणे आवश्यक आहे. काही दिवसांपूर्वी नवी देहली येथील काही पत्रकारांवर झालेली कारवाई हा त्याचाच एक भाग आहे, असे म्हणावे लागेल.
नक्षलवादाचे हे पोशिंदे पत्रकारिता, न्यायव्यवस्था, राजकारण, शिक्षणक्षेत्र, साहित्य, चित्रपटसृष्टी, कलाक्षेत्र आदी सर्व क्षेत्रांत कार्यरत आहेत. अल्पसंख्यांक मुलीवर अत्याचार झाल्यावर ‘पुरस्कार वापसी’ करणारे हे बुद्धीजीवी ‘लव्ह जिहाद’विषयी मात्र मौन बाळगतात. नवी देहली येथील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारे हेच बुद्धीजीवी ३ दशकांपासून विस्थापित असलेल्या काश्मिरी पंडितांविषयी कधी आंदोलन करत नाहीत. अखलाकच्या हत्येच्या विरोधात रान उठवायचे आणि हिंदुत्वनिष्ठांच्या हत्यांच्या विरोधात मौन बाळगायचे, ही यांची कुनीती आहे.
नक्षलवाद-आतंकवादाला सौम्य करणारे देशद्रोही !
सनातन धर्म संपवण्याची भाषा करणारे तमिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलीन यांची तळी दैनिक ‘लोकसत्ता’ने संपादकीय लिहून उचलून धरली. महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, पत्रकार निखिल वागळे आदी मंडळींनीही उदयनिधी यांच्या वक्तव्याचे समर्थन केले. एकीकडे उदयनिधी यांच्या हिंसक विधानांचे समर्थन करायचे आणि दुसरीकडे राज्यघटना, अहिंसा, धर्मनिरपेक्षता, सर्वधर्मसमभाव आदींचे दाखले द्यायचे, असा दुटप्पीपणा ही मंडळी करत आहेत. काही वर्षांपूर्वी याच मंडळींनी ‘हिंदु आतंकवाद’ सिद्ध करण्यासाठी रान उठवले. वृत्तपत्रांनी त्यावर स्तंभच्या स्तंभ छापले आणि अस्तित्वात नसलेला ‘हिंदु आतंकवाद’ भासवण्याचा प्रयत्न केला. हिंदूंना आतंकवादी ठरवणारी हीच मंडळी नक्षलवादाविषयी मात्र त्यांच्या ‘हक्कासाठीची लढाई’ असे गोंडस नाव देऊन सहानुभूती निर्माण करण्याचे काम करतात. मालेगाव बाँबस्फोट असो, अजमेर येथील स्फोट असो वा पुरोगाम्यांच्या हत्या असोत यांतील एकही कृत्य न्यायालयात सिद्ध झालेले नसतांना ‘हिंदु आतंकवाद’ अशी कोल्हेकुई करण्यात हाच वर्ग पुढे होता. हिंदूंना आतंकवादी ठरवण्यासाठी ‘मिडिया ट्रायल’ चालवणारे आणि नक्षलवादाचे समर्थन करणार्यांना ‘बुद्धीवादी’, ‘विचारवंत’, ‘सामाजिक कार्यकर्ते’, ‘पुरोगामी’ म्हणून समाजात त्यांच्याविषयी सहानुभूती निर्माण करणारीही मंडळी हीच आहेत. हे षड्यंत्र नियोजनबद्ध चालू आहे.
ज्याप्रमाणे या मंडळींनी नक्षलवादाचे समर्थन केले, त्याचप्रमाणे पाकपुरस्कृत इस्लामी आणि खलिस्तानी आतंकवादी कारवायांनाही खतपाणी घालण्याचे कामही ते करत आहेत. या कथित बुद्धीजीवी वर्गाने देशाची एक पिढी राष्ट्रीयत्वापासून तोडण्याचा अक्षम्य अपराध केला आहे. जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयात ‘भारत तेरे तुकडे होंगे’, अशा घोषणा देणारे विद्यार्थी हे त्याचेच उदाहरण ! या बुद्धीजीवींनी नक्षलवाद्यांच्या क्रूर कारवायांना ‘क्रांती’, ‘अधिकार’, ‘स्वत:चा हक्क’, अशा विचारांनी प्रकट करायचे; पत्रकारितेतील त्यांच्या सहकार्यांनी त्यांना प्रसिद्धी द्यायची, वृत्तसंस्थांमधील हस्तकांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील स्वत:च्या गोटातील प्रसिद्ध तारकांची मुलाखत घेऊन त्यांचे समर्थन करायचे, अशी ही चांडाळचौकडी राष्ट्रघातकी कारवायांमध्ये गुंतली आहे. मुंबईमधील बाँबस्फोटातील दोषी याकूब मेमनच्या अंत्ययात्रेला सहस्रावधींच्या संख्येने लोक जमतात, त्याच्या कबरीला रोषणाई होते; विधीमंडळात ‘वन्दे मातरम् म्हणणार नाही’, असे उद्दामपणे म्हटले जाते, त्या वेळी या बुद्धीजीवींमधून एकही आवाज देशहितासाठी उठत नाही. उलट धर्मांधांच्या देशद्रोहावर ‘अल्पसंख्यांक’ म्हणून पांघरूण घालण्याचे आणि बहुसंख्य हिंदूंनाच ‘अत्याचारी’ ठरवण्याचा प्रयत्न ही मंडळी सातत्याने करत असतात.
हिंदूंमध्ये अपराधीपणाची भावना निर्माण करणारा, युवा पिढीमधील राष्ट्रहिताची भावना नष्ट करणारा, पुरोगामित्वाच्या नावाखाली हिंदु संस्कृतीचे भंजन करणारा, केवळ हिंदूंनाच धर्मनिरपेक्षतेचा पाठ पढवून त्यांच्यातील धर्माभिमान नष्ट करणारा हाच तो बुद्धीजीवी वर्ग आहे. बुद्धीवाद्यांच्या कारवाया केवळ नक्षलवाद्यांच्या कारवाईपुरत्या मर्यादित नाहीत, तर देशाचे अस्तित्व नष्ट करणार्या आहेत. त्यामुळे बुद्धीवाद्यांना शक्तीहीन केले, तरच राष्ट्रविघातक शक्तींवर मात करता येईल !
सरकारने नक्षलवाद नष्ट करतांना शहरी (अर्बन) नक्षलवादाचेही समूळ उच्चाटन करणे क्रमप्राप्त ! |