गोरेगाव (मुंबई) येथे इमारतीच्या वाहनतळाला आग लागून ८ जणांचा मृत्यू, तर ५८ जण घायाळ !
मुंबई – गोरेगाव येथील उन्नतनगरमध्ये ‘जय भवानी’ इमारतीच्या वाहनतळामध्ये भीषण आग लागून ८ जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर ५८ जण घायाळ झाले आहेत. ५ ऑक्टोबरच्या मध्यरात्री ३ वाजता ही आग लागली. घायाळ झालेल्या व्यक्तींमधील काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृत व्यक्तींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.
अग्नीशमन दलाने केलेल्या साहाय्यामुळे आतमध्ये अडकलेल्या ३० हून अधिक नागरिकांना वाचवण्यात यश आले आहे. इमारतीच्या खाली असलेले कापडाचे आणि भंगाराचे गोदाम यांना आग लागून ही दुर्घटना घडली. घायाळ व्यक्तींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. या आगीत तळमजल्यावरील काही दुकाने आणि गाड्या जळून खाक झाल्या आहेत.
आग मध्यरात्री लागल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यास विलंब झाला.
याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना सरकारकडून ५ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात येईल.’’