अधिवक्त्याला विनाकारण डांबून ठेवणार्या साहाय्यक पोलीस निरीक्षकासह ६ जणांवर ७ वर्षांनी गुन्हा नोंद !
सातारा – ७ वर्षांपूर्वी शहर पोलीस ठाण्यात गेलेल्या एका अधिवक्त्याला विनाकारण डांबून ठेवण्यात आले होते. याविषयी संबंधित अधिवक्त्याने येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात संबंधित साहाय्यक पोलीस निरीक्षकासह त्यांच्या ६ सहकार्यांच्या विरोधात फौजदारी खटला भरला होता. या खटल्यातील सर्व बाजूंची चौकशी करून मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी ७ वर्षानंतर गुन्हा नोंद करून घेण्याचे आदेश दिले आहेत, तसेच सर्वांना ९ नोव्हेंबर या दिवशी न्यायालयात उपस्थित रहाण्यासाठी समन्स ठोठावले आहेत.
सातारा येथील एक अधिवक्ता १२ एप्रिल २०१४ या दिवशी सकाळी ११ वाजता शहर पोलीस ठाण्यात गेले होते. तेव्हा तत्कालीन साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रज्ञा देशमुख आणि त्यांचे ६ सहकारी यांनी सायंकाळी ६ वाजेपर्यंत या अधिवक्त्यांना बळजोरीने डांबून ठेवले, तसेच त्यांच्या भ्रमणभाषचे सिमकार्ड, मेमरी कार्ड आणि इतर वस्तू काढून घेतल्या. याविषयी अधिवक्ता यांनी मंत्रालयातील गृह विभाग आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे तक्रार नोंदवली. या तक्रारीची चौकशी तत्कालीन जिल्हा पोलीस उपअधीक्षक खंडेराव धरणे यांनी केली; परंतु गुन्हा नोंद केला नाही. त्यामुळे या अधिवक्त्याने सातारा येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रज्ञा देशमुख आणि त्यांचे ६ सहकारी यांच्या विरोधात फौजदारी खटला भरला. या प्रकरणी मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी भारतीय दंड विधान संहिता कलम ३४१, ३७९ आणि ३४ अन्वये गुन्हा नोंद करण्याचे आदेश सातारा पोलिसांना दिले आहेत.