प्रकाश आंबेडकर यांनी धार्मिक स्थळांविषयी बोलणे चुकीचे ! – चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजप
शरद पवारांची विधाने ‘गट’ जिवंत ठेवण्यासाठीच !
सांगली, ६ ऑक्टोबर (वार्ता.) – धार्मिक स्थळे मंदिरे, मशीद किंवा बौद्ध विहार यांना लष्कराच्या कह्यात देणे चुकीचे आहे. सर्वांच्या धार्मिक भावना वेगळ्या असून अधिष्ठानही वेगळे आहे. त्याविषयी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी बोलणे योग्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या सरकारच्या विरोधात असून त्यांना एखादा ‘नॅरेटिव्ह सेट’ करण्यासाठी काही विधाने करावी लागत आहेत. त्यांना आपला गट जिवंत ठेवायचा असून आपले लोक बांधून ठेवायचे आहेत, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ५ ऑक्टोबर या दिवशी कराड येथे पत्रकारांशी बोलतांना केेला. या वेळी अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले की, सरकारमध्ये असणार्या लोकप्रतिनिधींची कामे आता होत आहेत. लवकरच राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. असे झाले, तर १४-१५ मंत्री वाढतील आणि पालकमंत्रीही वाढतील. सरकारी कामे आणि योजना यांना गती मिळेल. महाविकास आघाडी सरकारच्या काळात काही अधिकार्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करून त्यांचे अन्य ठिकाणी स्थानांतर करण्यात आले. त्यांच्यावर खटले भरण्यात आले. त्यापेक्षा महायुती सरकारने कर्तव्यदक्ष अधिकार्यांना योग्य ठिकाणी नियुक्त्या दिल्या आहेत. रश्मी शुक्ला यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांमध्ये क्लिनचिट मिळाली आहे, त्या कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत.
चंद्रशेखर बावनकुळे यांचा सांगली जिल्ह्याचा दौरा !
चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या प्रवासात तासगाव येथे जिल्ह्यातील तासगाव-कवठे महांकाळ, जत, खानापूर आणि दुपारी मिरज येथे मिरज, सांगली अन् पलूस-कडेगाव या विधानसभा क्षेत्रांतील प्रमुख पदाधिकारी, तसेच ‘सुपर वॉरिअर्स’ यांच्याशी संवाद साधला. तासगाव येथे गणपति मंदिर ते बागणे चौकपर्यंत आणि मिरज येथे ‘घर चलो अभियाना’त सहभागी झाले. त्यांनी व्यापारी आणि छोट्या विक्रेत्यांशी संवाद साधला.