सण-उत्‍सवांचे माहात्‍म्‍य !

नुकताच गणेशोत्‍सव उत्‍साहात पार पडला. सध्‍या पितृपक्ष चालू आहे. हिंदु धर्मात वर्षभर काही ना काही सण, उत्‍सव, व्रते केली जातात. त्‍या माध्‍यमातून आपल्‍याला चैतन्‍य मिळते, स्‍वतःची वृत्ती अधिकाधिक देवाकडे जाणारी, म्‍हणजे अंतर्मुख होत जाते. ‘सणांमधून आपल्‍याला नेमके काय शिकायचे आहे ?’, ते लक्षात घेतले पाहिजे.

काहींना सण म्‍हटले की, दडपणही येते. सण साजरे करतांना त्‍याकडे ते नकारात्‍मक दृष्‍टीने पहातात. आपण जर विचार केला, ‘आध्‍यात्मिक चैतन्‍य देणारे हे सण आपल्‍या आयुष्‍यात नसते, तर समाजाची पर्यायाने आपली स्‍थिती काय झाली असती ?’ आध्‍यात्मिक दृष्‍टी आपल्‍याकडे राहिली नसती, तर आपली स्‍थितीही शेजारील राष्‍ट्रांप्रमाणे झाली असती. काही राष्‍ट्रांमध्‍ये सण म्‍हणून त्‍यांच्‍या नेत्‍यांचे वाढदिवस साजरे केले जातात ! काही राष्‍ट्रांमध्‍ये सण, उत्‍सव हा प्रकार नसल्‍याने ते एकमेकांच्‍या अंगावर टोमॅटो फेकून मारण्‍याची स्‍पर्धा खेळतात ! काही देशांत भुतांच्‍या चित्रविचित्र मुखवट्यांचे पेहराव करून मिरवणूक काढतात, तर काही जण काल्‍पनिक पात्रांची निर्मिती करून बक्षिसांचे वाटप करतात ! काही राष्‍ट्रांत स्‍वतःच्‍या मनोरंजनासाठी मुक्‍या प्राण्‍यांना त्रास देण्‍याचे खेळही खेळले जातात !

भारतामध्‍ये सण साजरे करण्‍याची पद्धत ही ‘निसर्गा’ला केंद्रबिंदू मानून निर्माण झाली आहे. वटपौर्णिमा या सणाच्‍या वेळेस वडाच्‍या झाडाची पूजा होते. गोवर्धन पर्वतपूजा, नारळी पौर्णिमेला ‘सागरा’ची पूजा, म्‍हणजे ज्‍या पंचमहाभूतांमुळे मानवाचे अस्‍तित्‍व आहे, त्‍यांच्‍याप्रती कृतज्ञता व्‍यक्‍त करायला आपल्‍याला शिकवले जाते. आपण सदैव ‘सत्’मध्‍ये रहावे आणि ईश्‍वराचे चैतन्‍य ग्रहण करता यावे, यासाठी आपल्‍याला सण ‘साजरे’ करण्‍यास सांगितले आहे ! आपण जेव्‍हा सणांच्‍या निमित्ताने सांगितलेले धर्माचरण किंवा व्रताचरण करतो, तेव्‍हा आपसूकच आपल्‍याकडून स्‍वतःवर काही बंधने घातली जातात आणि त्‍यामुळे आपण राजसिक अन् तामसिक गोष्‍टींपासून लांब रहातो, तसेच आपल्‍यात सत्त्व गुणांची वृद्धी होण्‍यास साहाय्‍य होते. सध्‍या सणांचे बाजारीकरण झाले आहे. समाजाची सात्त्विकता खालावली आहे. त्‍यामुळे सणांचा आध्‍यात्मिक लाभ आणि खरा आनंद घेण्‍यापासून, म्‍हणजेच त्‍यांच्‍या मूळ उद्देशापासून भरकटत चाललो आहोत. सणांच्‍या वेळी धर्माचरण करून त्‍याला विरोध करणार्‍यांचा वैचारिक प्रतिवाद करणे, हेही हिंदूंचे धर्माचरणच आहे !

– श्री. जयेश बोरसे, पुणे