बोरीवली (मुंबई) येथील कथ्‍थक नृत्‍यांगना सौ. मनीषा पात्रीकर यांच्‍या कथ्‍थक नृत्‍याच्‍या संशोधनात्‍मक प्रयोगाच्‍या वेळी साधकांना आलेल्‍या अनुभूती

१८ ते २२.४.२०२२ या कालावधीमध्‍ये महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या संशोधन केंद्रामध्‍ये बोरीवली (मुंबई) येथील कथ्‍थक नृत्‍यांगना सौ. मनीषा पात्रीकर यांचे कथ्‍थक नृत्‍यातील विविध प्रकारांचे प्रयोग घेण्‍यात आले. या वेळी त्‍यांचे नृत्‍य बघतांना महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या साधकांना आलेल्‍या अनुभूती या लेखामध्‍ये दिल्‍या आहेत.

सौ. मनीषा पात्रीकर

१. शिववंदना (आंगिकम् भुवनम् यस्‍य…)

‘नृत्‍याच्‍या आरंभी एखाद्या देवाची अथवा देवतेची प्रार्थना करून तिचे आशीर्वाद घेण्‍याची प्रथा आहे. तिला ‘स्‍तुती’ अथवा ‘वंदना’ असे म्‍हणतात. वंदना प्रस्‍तुत करणे, हे भारतीय शास्‍त्रीय नृत्‍याचे पारंपरिक आणि महत्त्वाचे अंग मानले जाते. वंदना ही श्‍लोकाद्वारे किंवा आलापातून अथवा एखाद्या भक्‍तीपर पदाने सादर केली जाते. सौ. मनीषा पात्रीकर यांनी नृत्‍याच्‍या आरंभी शिववंदना प्रस्‍तुत करून शिवाचे आशीर्वाद घेऊन त्‍यांच्‍या नृत्‍याला आरंभ केला होता.

अ. ‘या वेळी सौ. मनीषा पात्रीकर यांच्‍याभोवती शिवाचे आशीर्वाद स्‍वरूप पांढर्‍या आणि पिवळ्‍या रंगांच्‍या किरणांचे एक वलय दिसले. त्‍यांनी नटराजाच्‍या मूर्तीला नृत्‍याच्‍या माध्‍यमातून पुष्‍पे अर्पण केली. त्‍या वेळी ‘त्‍यांच्‍या हातात प्रत्‍यक्ष फुलेच आहेत’, असे मला जाणवले.’ – कु. अपाला औंधकर (वर्ष २०२१ मधील आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के, वय १६ वर्षे),  नृत्‍य अभ्‍यासिका

आ. ‘या नृत्‍याच्‍या वेळी मला शिवाची आठवण आली.’ – सौ. भक्‍ती कुलकर्णी, संगीत अभ्‍यासिका

२. अष्‍टपदी (निरतत ढंग…)

हा आठ कडव्‍यांनी युक्‍त असा एक काव्‍यप्रकार (अष्‍टपदी) आहे. यातील काव्‍याच्‍या अर्थानुसार भाव दर्शवला जातो. अष्‍टपदीतील भाव अत्‍यंत हळूवार आणि तरल असल्‍यामुळे यातील भावप्रदर्शन अन् साथसंगत अतिशय कोमल अन् समयोचित असावी लागते. अष्‍टपदी ही विशेषकरून श्रीकृष्‍णाच्‍या जीवनदर्शनावर आधारित असते. यामध्‍ये राधेची कृष्‍णावरील ‘मधुराभक्‍ती’ दिसून येते. कथ्‍थक नृत्‍यातील ज्‍येष्‍ठ गुरु बिंदादीन महाराज रचित श्रीकृष्‍णाशी संबंधित ‘अष्‍टपदी’ सौ. मनीषाताईंनी नृत्‍यातून प्रस्‍तुत केली होती.

अ. ‘सौ. मनीषाताई अष्‍टपदी सादर करत असतांना काही क्षण त्‍यांच्‍या सहस्रारचक्राच्‍या ठिकाणी सूक्ष्मातून निळ्‍या रंगाचा प्रकाश दिसला. दुसर्‍यांदा नृत्‍य सादर केल्‍यावर ‘वातावरणात भाव आणि चैतन्‍य वाढले आहे’, असे मला जाणवले. हे नृत्‍य पाहून मला श्रीकृष्‍णाची आठवण झाली. माझ्‍या मनाला आनंद मिळत होता आणि मला त्‍या वेळी त्‍यांच्‍या समवेत नृत्‍य करावेसे वाटत होते.’ – कु. तिर्था देवघरे (वय १९ वर्षे), भरतनाट्यम् विशारद

आ. ‘सौ. मनीषाताईंच्‍या अनाहतचक्राच्‍या ठिकाणी निळ्‍या रंगाची भावाची स्‍पंदने कार्यरत असल्‍याचे मला जाणवले. त्‍याच वेळी मलाही माझ्‍या अनाहतचक्राच्‍या ठिकाणी संवेदना जाणवल्‍या. ‘सगळीकडे कृष्‍णमय वातावरण झाले आहे’, असेही मला जाणवले.’ –  कु. म्रिणालिनी देवघरे (वय २२ वर्षे), भरतनाट्यम् विशारद

३. भजन (सुमिरन कर दे मेरे मना…)

अ. ‘या भजनावर नृत्‍य करतांना सौ. मनीषाताईंच्‍या ईश्‍वराप्रतीच्‍या भावामुळे वातावरणात भावाचे कारंजे उडत आहेत’, असे मला जाणवले.’ –  कु. अपाला औंधकर, नृत्‍य अभ्‍यासिका

आ. ‘सौ. मनीषाताईंच्‍या हातांच्‍या मुद्रांच्‍या हालचालींवरून त्‍या मनातील भाव ईश्‍वराला अर्पण करत आहेत आणि ईश्‍वराला नमन केल्‍यावर ईश्‍वराचा मिळालेला आशीर्वाद सर्वांना देत आहेत’, असे जाणवले.’ – कु. म्रिणालिनी देवघरे, भरतनाट्यम् विशारद

४. तराना

हा फारसी शब्‍द आहे. त्‍याचा अर्थ ‘गाणे’ किंवा ‘नगमा’ असा होतो. हा गायकीचा एक प्रकार आहे. यामध्‍ये गायल्‍या जाणार्‍या बोलांना, उदा. ता, दा, ना, रे, ओदानी, दीम, तनोम इत्‍यादींना कसलाही भावार्थ, आशय नसतो. तराण्‍यात स्‍थायी आणि अंतरा असे दोन भाग असतात. यात भावप्रदर्शनास स्‍थान नाही. तराना मध्‍य किंवा द्रुत लयीत गायला आणि नाचला जातो. प्रसिद्ध सतारवादक पं. रविशंकर रचित तराण्‍यावर सौ. मनीषाताईंनी नृत्‍य प्रस्‍तुत केले होते.

अ. ‘तराण्‍याच्‍या बोलांमुळे वातावरणात चैतन्‍य पसरले आणि सौ. मनीषाताई यांच्‍याभोवती तेज:पुंज चैतन्‍याचे वलय निर्माण झाले.’ – कु. अपाला औंधकर, नृत्‍य अभ्‍यासिका

५. प्रोषितपतिका नायिका

अष्‍टनायिका हे आठ प्रकारच्‍या नायिकांचे एकत्रित नाव आहे, ज्‍याचे वर्गीकरण भरतमुनींनी त्‍यांच्‍या कला-नाट्य शास्‍त्रांवरील संस्‍कृत ग्रंथात केले आहे. या आठ नायिका तिच्‍या नायक किंवा नायकाच्‍या संदर्भातील आठ वेगवेगळ्‍या अवस्‍थांचे प्रतिनिधित्‍व करतात. प्रोषितपतिका ही अशी स्‍त्री आहे, जिचा पती तिच्‍यापासून दूरदेशी काही कामासाठी निघून गेला आहे आणि ठरलेल्‍या दिवशी परत येत नाही. त्‍यामुळे ती दुःखी आहे. सौ. मनीषाताईंनी नृत्‍यातून ही नायिका प्रस्‍तुत केली होती.

५ अ. ‘हे नृत्‍य करतांना सौ. मनीषाताई नृत्‍य आणि अभिनय यांच्‍याशी एकरूप झाल्‍या आहेत’, असे मला जाणवले. – सौ. भक्‍ती कुलकर्णी, संगीत अभ्‍यासिका

६. ठुमरी

हा एक गायनप्रकार आहे. ‘देवदास’ या हिंदी चित्रपटातील ‘काहे छेड छेड मोहे…’ या गाण्‍यावर त्‍यांनी नृत्‍य प्रस्‍तुत केले होते.

अ. ‘हे ठुमरी नृत्‍य पहात असतांना आनंद जाणवला आणि राधा-श्रीकृष्‍णाची आठवण आली.’ – सौ. भक्‍ती कुलकर्णी, संगीत अभ्‍यासिका

आ. ‘हे नृत्‍य पाहतांना ‘सौ. मनीषाताई श्रीकृष्‍णाशी एकरूप होऊन नृत्‍य करत आहेत’, असे जाणवले. त्‍यांच्‍यामध्‍ये भाव जाणवला. ‘त्‍यांचा अहं अल्‍प असून त्‍या शुद्ध नृत्‍य करत आहेत’, असे मला जाणवले. – कु. मयुरी आगवणे, संगीत अभ्‍यासिका

सौ. मनीषा जयंत पात्रीकर यांचा परिचय

सौ. मनीषा जयंत पात्रीकर या कथ्‍थक नृत्‍यांगना आहेत. त्‍या मूळच्‍या नागपूर येथील असून सध्‍या त्‍या बोरीवली (मुंबई) येथे वास्‍तव्‍यास आहेत. त्‍यांचे नृत्‍याचे शिक्षण नागपूर येथील (कै.) सौ. साधना नाफडे यांच्‍याकडे झाले. सौ. मनीषा पात्रीकर यांनी कथ्‍थक नृत्‍यामध्‍ये ‘अलंकार’ ही पदवी प्राप्‍त केली असून त्‍यांनी एकल (सोलो) नर्तनाचेही कार्यक्रम केले आहेत. त्‍या ‘नृत्‍य निर्झर’ या नृत्‍यसंस्‍थेच्‍या संस्‍थापिका आहेत. त्‍या संत मेहेरबाबा यांच्‍या संप्रदायानुसार साधनारत आहेत.

(सर्व सूत्रांचा दिनांक – २९.४.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक