मलप्पूरम् (केरळ) येथील मुसलमान मुली आता हिजाब घालण्यास नकार देतील ! – केरळमधील माकपचे नेते अनिल कुमार

  • केरळमधील माकपचे नेते अनिल कुमार यांचे विधान !

  • माकपने विधान फेटाळले, तर अन्य राजकीय पक्षांचा विरोध !

(हिजाब म्हणजे मुसलमान महिलांनी डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेले  वस्त्र)

केरळमधील माकपचे नेते अनिल कुमार

थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळच्या मलप्पूरम् येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते अनिल कुमार यांनी ‘मुसलमान मुली आता हिजाब घालण्यास नकार देतील’, असे विधान केल्यानंतर राजकारण तापले आहे. माकपकडून हे विधान फेटाळण्यात आले असले, तरी मुसलमानांच्या संघटना, राजकीय पक्ष यांनी यावर टीका केली आहे.

अनिल कुमार यांनी म्हटले की, मलप्पूरम्मध्ये होत असलेल्या पालटाचे स्वरूप महिलांकडे पहाण्यातून लक्षात येईल. आम्हाला वाटते की, येथे आता अशा मुली आहेत ज्या डोक्यावर ‘थट्टम’ (हिजाब) वापरण्यास नकार देतील.

अनिल कुमार यांच्या विधानावर माकपने म्हटले आहे की, प्रत्येकाला स्वतःच्या आवडीनुसार कपडे घालण्याचा मूलभूत अधिकार आहे. याविषयी पक्षाकडून कोणतेही मत व्यक्त करण्याची आवश्यकता नाही.

संपादकीय भूमिका

साम्यवाद्यांचे खरे स्वरूप ! केरळमधील शबरीमला मंदिरात हिंदूंचा विरोध डावलून सर्व वयोगटांतील महिलांना प्रवेश मिळण्यासाठी साम्यवादी आटापिटा करतात. हेच साम्यवादी बळजोरीने बुरखा किंवा हिजाब घालणार्‍या मुसलमान मुलींना त्यांतून मुक्ती हवी असल्यास त्यांच्या मागे उभे रहाण्यास टाळाटाळ करतात, हे जाणा !