उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ५५ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली देवद (पनवेल) येथील कु. गिरीजा संतोष खटावकर (वय ७ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. गिरीजा संतोष खटावकर ही या पिढीतील एक आहे !
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
आज भाद्रपद कृष्ण अष्टमी (७.१०.२०२३) या दिवशी देवद (पनवेल) येथील कु. गिरीजा संतोष खटावकर हिचा ७ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
कु. गिरीजा संतोष खटावकर हिला सातव्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !
‘वर्ष २०१९ मध्ये ‘कु. गिरीजा संतोष खटावकर उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आली असून तिची आध्यात्मिक पातळी ५३ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२३ मध्ये तिची आध्यात्मिक पातळी ५५ टक्के झाली आहे. तिच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, तिची साधनेची तळमळ आणि तिच्यातील भाव यांमुळे आता तिची साधनेत प्रगती होत आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२२.८.२०२३) |
१. पूर्वी सेवा करण्यात आवड-नावड असणे आणि आता दिलेली कोणतीही सेवा आनंदाने करणे : ‘कु. गिरीजाला पूर्वी काही सेवा करायला आवडत नव्हत्या, उदा. खराब भाज्या, तसेच कांदे आणि बटाटे वेचून बाजूला काढणे इत्यादी. एकदा तिच्या बाबांनी तिला समजावून सांगितले, ‘‘ही तुझी चूक आहे. कोणतीही सेवा चांगली किंवा वाईट नसते. देवानेच आपल्याला ही सेवा दिली आहे.’’ तेव्हापासून तिच्यातील सेवेबद्दलचा आवड-नावड हा दोष न्यून झाला आहे. ती आता तिला दिलेली कोणतीही सेवा आनंदाने करते.
२. वेळेचे महत्त्व : तिला एका साधकाने सांगितले, ‘सेवा करतांना आपल्या आधीच देव तिथे सेवेसाठी येतो.’ त्यामुळे रविवारी गिरीजा ठरलेल्या वेळेच्या आधीच सेवेला जाण्याचा प्रयत्न करते आणि मलाही सांगते.
३. स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करणे : ती शाळेला जातांना स्वतःची कामे स्वतःच करते, उदा. शाळेचा गणवेश आणि वेणी घालणे, शाळेच्या पिशवीत (बॅगेत) खाऊचा डबा, तसेच पाण्याची बाटली ठेवणे इत्यादी. नंतर नामजपादी उपाय करून शाळेत जाते. हे तिने सनातनच्या सात्त्विक वहीवर वाचले होते आणि तिने ते आचरणातही आणले. तिच्या काही वह्या सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या आणि काही इतर आहेत. ती इतर वह्यांवर आध्यात्मिक लाभ होण्यासाठी त्यांवर श्रीकृष्णाचे चित्र चिकटवते. हे तिला कुणीही शिकवलेले नाही.
४. समंजसपणा : कु. देवश्री (गिरीजाची लहान बहीण) पुष्कळ हट्टी असल्यामुळे गिरीजा स्वतःच्या वस्तू तिला देते, उदा. खेळणी, कपडे, खाऊ इत्यादी. एकदा गिरीजाला थकवा होता; म्हणून तिला तिच्या बाबांनी (श्री. संतोष परशुराम खटावकर) उचलून कडेवर घेतले. हे बघून देवश्री लगेच रुसली. त्या वेळी गिरीजा बाबांना म्हणाली, ‘‘बाबा, तुम्ही देवश्रीला उचलून घ्या. ती लहान आहे. मी चालत येते. तिला रडू देऊ नका.’’
५. तिचा हट्टीपणा आता पुष्कळ अल्प झाला असून ऐकण्याचा भाग वाढला आहे.
६. सुट्टीच्या दिवशी आश्रमात सेवेला जाता येण्यासाठी आधीच अभ्यासाचे पूर्वनियोजन करून ठेवणे : एकदा सुट्टीच्या दिवशी गिरीजा अधिक वेळ आश्रमात होती. दुपारी घरी येऊन जेवली आणि पुन्हा आश्रमात सेवेला गेली. त्यामुळे तिचा पुष्कळ अभ्यास तसाच राहिल्याने मी तिला रागावले. तेव्हापासून सेवेसाठी आश्रमात जाता येण्यासाठी ती सर्व अभ्यास शाळेतून आल्यावर संध्याकाळीच पूर्ण करून सुट्टीच्या दिवशी आश्रमात सेवेला जाते. अभ्यास पूर्ण झाला नसल्यास वही आणि पुस्तके घेऊन आश्रमात जाते.
७. ‘आश्रमातील पाणी म्हणजे तीर्थ आहे’, असा भाव असणे : आम्ही देवद आश्रमाजवळील संकुलात रहातो. एकदा ती मला म्हणाली, ‘‘आई, आश्रमात पिण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी पाणी वापरतात, तेच पाणी आपण घरी नेऊया अन् तीर्थ म्हणून पिऊया. ते स्वयंपाकाच्या पाण्यातही घालूया. ‘आपण आश्रमातलाच महाप्रसाद ग्रहण करत आहोत’, असा भाव ठेवूया.’’ ती कुठेही जातांना आश्रमातील तीर्थ (पाणी) एका बाटलीत भरून नेते.
८. सात्त्विकतेची आवड : ती शाळेत जातांना कपाळाला कुंकू लावते, तसेच हातात बांगड्या घालते. ती मंदिरात जातांना डोक्यात गजरा किंवा फूल घालते. सकाळी अंघोळ झाल्यावर तुळशीला पाणी घालते. ती प्रत्येक खोलीत उदबत्ती लावते, तसेच रात्री झोपतांनाही उदबत्ती लावते.
९. देवाबद्दल श्रद्धा आणि भाव असणे : मला काही वेळा शारीरिक त्रास होतो किंवा माझी चिडचिड होते. त्या वेळी गिरीजा भ्रमणभाषवर नामजप, तसेच मारुतिस्तोत्र लावते. मग मला म्हणते, ‘‘आई, काय झाले ? शांत हो. चिडचिड करू नकोस. तुलाच त्रास होईल. हे स्तोत्र तू ऐक, म्हणजे तुला बरे वाटेल.’’ त्या वेळी ती माझ्या जवळच बसून काहीतरी करत रहाते. मला चैतन्य मिळण्यासाठी कापूर स्वतः बारीक करून देते. मग हळूच तीर्थ देते आणि मला बरे वाटल्यावर तिथून निघून जाते. मी तिला कितीही रागावले, तरी ती माझ्याजवळ येऊन माझी काळजी घेते.
देवासाठी तुळस आणि फुले तोडतांनाही गिरीजा झाडांना त्रास न देता पुष्कळ प्रेमाने तोडते. झाडांनासुद्धा प्रार्थना करण्यास आणि आनंदाने रहाण्यास सांगते. ती तिच्या बाहुलीला आणि खेळण्यांनाही नामजप करण्यास सांगते. तिला प.पू. डॉक्टरांचा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा) छायाचित्रे असलेला ग्रंथ पहायला आणि नामजपादी उपाय करतांना जवळ ठेवायला पुष्कळ आवडतो. तिची प्रकृती बिघडल्यावर ती स्वतःहून ग्रंथ बघत बसते.
१०. संतांबद्दल आदरभाव असणे : संतांनी हात लावलेल्या वस्तू ती पुष्कळ सांभाळून ठेवते आणि आध्यात्मिक लाभासाठी घेते. आश्रमात संत भेटले आणि तिच्याशी बोलले, तर ती दिवसभर आनंदी असते. सद़्गुरु दादा (सद़्गुरु राजेंद्र शिंदे) तिचे कौतुक करतात. ते म्हणतात, ‘‘ती पुष्कळ छान आणि शांतपणे बाबांच्या (परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या) खोलीत नामजपाला बसते. ती जप छान करते.’’
पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी तिच्या गालाला हात लावला आणि पापी घेतली की, ती दिवसभर त्याच आनंदात असते. गिरीजाचा एक झगा (फ्रॉक) पू. ताईंना पुष्कळ आवडला होता. तो आता गिरीजाला लहान होतो. गिरीजाने अजूनही तो व्यवस्थित ठेवला आहे.
११. आश्रमात आल्यानंतरचा दिनक्रम : ती आश्रमात गेल्यावर सर्व प्रथम तेथील पाणी तीर्थ म्हणून घेते. मग न चुकता प.पू. भक्तराज महाराज यांच्या गाडीला प्रदक्षिणा घालते. स्वतःवर आलेले त्रासदायक शक्तीचे आवरण ‘मनोरा मुद्रा’ करून काढते. मग परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या खोलीत थोडा वेळ जप करते आणि जप लिहिते. मग वेळेनुसार सेवेला जाते, असा तिचा आश्रमातील दिनक्रम आहे. या सर्व गोष्टी तिने साधकांकडूनच शिकून घेतल्या आहेत.
१२. सूक्ष्मातील कळणे : वड, पिंपळ, औदुंबर या झाडांची नावे आणि त्यांची वैशिष्ट्ये तिला ज्ञात नाहीत, तरीही त्या वृक्षांना ती नमस्कार करते. तिला घरापेक्षा मंदिर आणि सनातन आश्रम येथे नामजप करायला आवडतो.
१३. प्रसंगावधान : चि. देवश्री (वय साडेतीन वर्षे) आणि गिरीजा या दोघींचे दातांचे उपचार (Dental Treatment) एकाच वेळी चालू होते. त्या वेळी वैद्यांनी प्रथम गिरीजाच्या दातांवर उपचार चालू केले. त्या वेळी गिरीजाला त्रास होत असूनही तिने शांतपणे उपचार करून घेतले; कारण गिरीजानंतर देवश्रीला दंत उपचार करायचे होते. मी गिरीजाला विचारल्यावर ती मला म्हणाली, ‘‘मी घाबरले किंवा रडले असते, तर देवश्रीसुद्धा घाबरली असती. तिने उपचार करून घेतले नसते; म्हणून मीच नामजप करत दुखणे सहन केले.’’ प्रत्यक्षातही तसेच झाले. देवश्रीला उपचारांच्या वेळी थोडा त्रास झाला. तेव्हा देवश्री म्हणाली, ‘‘ताई गप्प बसली; म्हणून मीही मला दुखत असतांना गप्प बसले.’’ दंत उपचारासाठी आम्हाला दवाखान्यात बरेच दिवस जावे लागले. तेव्हा एक दिवस गिरीजाला दवाखान्यातील वातावरण अकस्मात् आश्रमासारखे वाटले. ती म्हणाली, ‘‘बघ आई, देव सगळीकडे आहे. तू काळजी करू नकोस.’’
१४. आध्यात्मिक त्रास आणि अडथळे : गिरीजा समवेत चांगल्या गोष्टी घडतांना तिला बर्याचदा अनिष्ट शक्तींचा त्रास होतो आणि अडथळेही येतात. आम्ही देवदर्शनाला बाहेर गावी जातांना किंवा जाऊन आल्यावर ती आजारी पडते, रडते आणि चिडचिड करते. नेहमी ती न रडता आनंदाने नियमित शाळेत जात असे. एकदा अकस्मात् ती ३ दिवस पुष्कळ रडली. नंतर नामजपादी उपाय केल्यावर ती नियमित आनंदाने शाळेत जाऊ लागली. ३ – ४ वर्षांनी पुन्हा देवद आश्रमात रहाण्यासाठी गेल्यावर ती सतत ३ मास आजारी पडली.
ती आजारी असतांना किंवा तिला त्रास झाला की, मी सद़्गुरु डॉ. मुकुल माधव गाडगीळ यांना तिच्यासाठी नामजपादी उपाय विचारते. त्यांनी सांगितलेले उपाय केल्यावर ती बरी होते. सद़्गुरु काका म्हणतात, ‘‘हे अनिष्ट शक्तीचे आक्रमण असते. गिरीजामध्ये सात्त्विकता आणि चांगले गुण वाढत असतांना अनिष्ट शक्ती तिच्या मार्गात अडथळे आणतात.’’
१५. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सव सोहळ्याच्या वेळी गिरीजाला आलेल्या अनुभूती
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाला जाण्याच्या २ दिवस आधी गिरीजाला पोटदुखी आणि उलटी होण्याचा त्रास झाला. मिरजेतून रामनाथी आश्रमात जाण्यास निघाल्यावर तिला बरे वाटले.
२. रामनाथीला जाण्यास निघाल्यापासून तिला प.पू. डॉक्टरांना बघण्याची ओढ लागली होती. प्रकृती बरी नसल्यामुळे तिला मरगळ आली होती. गाडीत काही वेळ झोपून उठल्यावर ती मला म्हणाली, ‘‘आई, गाडी चालवणारे काका आणि साधक यांच्यामध्ये परम पूज्य बसले आहेत. पुष्कळ प्रकाश दिसत आहे. आता मलाही बरे वाटेल; कारण परम पूज्य स्वतः आपल्या गाडीत आहेत.’’ प्रत्यक्षात गुरुदेव दिसल्यावर तिच्या डोळ्यांत अश्रू आले.
१६. आपत्काळाबद्दल गिरीजाचे विचार
अ. आपत्काळात औषधे नसतील; म्हणून ‘कोणत्या आजारावर कोणता नामजप करावा’, याबद्दल ती आश्रमातील वैद्यांना विचारते. तिला ते उपाय लक्षात रहात नाहीत.
आ. आपत्काळाचा विचार माझ्या मनात आल्यावर मला काळजी वाटते. तेव्हा गिरीजा म्हणते, ‘‘देवानेच आपल्याला बनवले आहे, तर रक्षणही देवच करेल.’’
इ. ती कधीच अन्न वाया घालवत नाही. तिला तिखट पदार्थ आवडत नाहीत. काही ठराविक भाज्या ती खाते. आपत्काळात खायला काही मिळेल न मिळेल; म्हणून ती तिखट आणि आवडत नसलेले पदार्थ खाण्याचा प्रयत्न करते.
१७. कु. गिरीजाचे स्वभावदोष
अ. स्वतःला न्यून लेखणे
आ. भित्रेपणा
इ. नवीन व्यक्तींमध्ये न मिसळणे, अबोलपणा
ई. स्वतःच्या विश्वात, मनोराज्यात रमणे
उ. अस्थिरपणा.
कृतज्ञता : आधी मला गिरीजाच्या हट्टीपणामुळे पुष्कळ त्रास होत असे; पण आता तिच्या स्वभावात पालट झाला आहे. ही ईश्वराचीच कृपा आहे. असे गुणी बाळ आम्हाला ईश्वरी कृपेनेच लाभले आहे. त्यामुळे ईश्वर चरणी कोटीशः कृतज्ञता.’
– सौ. सुप्रिया संतोष खटावकर (कु. गिरीजाची आई), सनातन संकुल, देवद, पनवेल. (२२.५.२०२३) ०
कु. गिरीजाच्या आजीला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये१. ‘पंढरपूरला पाहिलेली विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती कु. गिरीजाला पुष्कळ आवडली. ती आम्ही विकत घेतली. आता ती तिची भावपूर्ण पूजा करते. २. देवश्री आणि गिरीजा बर्याचदा एकाच दिशेने तोंड करून एकसारख्याच झोपतात. ‘झोपेतही त्यांचा नामजप चालू आहे’, असे मला जाणवते.’ – श्रीमती गीता गोरख खटावकर (वय ४५ वर्षे) (गिरीजाची छोटी आजी), मिरज (२६.६.२०२३) |
|